औरंगाबाद (Aurangabad) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या काम करताना टेंडरमधील (Tender) अनेक बाबींना फाटा देण्यात आल्याचे 'टेंडरनामा'ने समोर आणले होते. या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे वास्तव 'टेंडरनामा'ने उघड केले होते. 'टेंडरनामा'ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, ग्रामसडक योजने अंतर्गत असलेल्या या रस्त्याचे ग्रहण अखेर सुटले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहूर्त लागल्याने परदरीतील नागरिकांनी आनंद साजरा केला.
दुसरीकडे या रस्त्याच्या कामाची जबाबदारी सांभाळणारे उप अभियंता उन्मेश लिंभारे आणि कनिष्ठ अभियंता पंकज चौधरी चार दिवसांपासून डोळ्यासमोर काम करून घेत असल्याने कामाचा दर्जाही मानकाप्रमाणे होत आहे. ज्या भागात हे काम रखडले होते, तो भाग विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघात येतो हे विशेष! आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा होत असला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील परदरी (Pardari) गावाला अद्याप रस्ता नव्हता.
अधिकाऱ्यांकडून टोलवा-टोलवी
या विषयी टेंडरनामाने आवाज उठविल्यानंतर, पंधरा दिवसांत काम सुरू होईल. कंत्राटदाराला नोटीस देऊ, असे म्हणत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. मात्र प्रत्यक्षात दोन महिने उलटल्यानंतर देखील कंत्राटदाराला जागे करून अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले नाही. त्यानंतर कोरोनाचे कारण पुढे करत सरकार निधीच देत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही पंधरा दिवसांत या रस्त्याचे काम मार्गी लावणार, अशी ग्वाही अधिकारी देत होते. एकीकडे सरकारकडे पैसाच नसल्याने पंधरा दिवसांत काम कसे मार्गी लागेल, असाही प्रश्न टेंडरनामाने उपस्थित केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात दोन महिन्यांत या गाव रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त लागला.
राज्याच्या ग्रामविकास खात्यांतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येथील देवळाई ते कचनेर जिल्हा मार्ग ३५ पासून परदरी गावापर्यंत साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला ६ सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती. या कामासाठी १ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. टेंडरप्रमाणे हे काम २ सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, २०२२ उजाडले तरीही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
टेंडरनामाचा पाठपुरावा
या रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारींचा ओघ सुरूच होता. निद्रिस्त यंत्रणा आणि बेजबाबदार कंत्राटदार यांच्या खाबुगिरीत अडकलेल्या या अर्धवट रस्त्यामुळे ग्रामस्थांच्या हालअपेष्टा कशा वाढल्या, यावर टेंडरनामाने सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २०१८ मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, तीन वर्षानंतरही या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. याउलट रस्त्याचे केलेले खडीकरण आणि मजबुतीकरण उखडून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. कामाचा दर्जा नसल्याने याभागातील शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या परदरी गावात जाण्यासाठी रस्ताच नव्हता. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत टेंडरनामाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या गावातील रस्त्याचे रुपडे पालटत आहे.
'रस्ता होणार चकाचक'
काही तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले होते. सरकारकडून निधी मिळत नव्हता. कोरोनाच्या संकटामुळेही अडचणी होत्या. निधीसाठी पाठपुरावा करून आता २० एमएम जाडीचे कारपेटचे काम पूर्ण करत आहोत. त्यावर साधारणतः सहा इंच डांबराचा थर देऊन सिलकोट करणार आहोत. टेंडरमधील अटी-शर्तीनुसारच काम होत आहे. मात्र आता लोकांनी एकदा काम झाल्यावर पाईपलाईनसाठी रस्ता खोदू नये. साईड पंखे उकरू नयेत, असे आवाहन उप अभियंता उन्मेश लिंभारे यांनी केले.