औरंगाबाद (Aurangabad) : संग्रामनगर उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे पुलाचे काम चुकल्याची चर्चा ही समाजमाध्यमांवर अफवा असल्याचा आरोप करत सातारा-देवळाईकरांच्या भावनेशी आणि त्यांच्या रास्त मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेतील काही कारभाऱ्यांनी थट्टा केल्याने सातारा-देवळाई परिसरात संतापाची लाट पसरली आहे. यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
मुळात आमची मागणी ही अफवा किंवा संभ्रम निर्माण करणारी नसून रास्त असल्याचे सातारा-देवळाईकरांनी टेंडरनामाशी बोलताना स्पष्ट केले. स्वामी हंसराज तीर्थ चौकात होत असलेल्या बायपासच्या नव्या पुलाखालून अस्तित्वातील जुन्या रस्त्याची उंची पुलाच्या बीमपर्यंत साडेपाच मीटरच असायला हवी होती. इतक्याच उंचीचा आमदाररोड समोर दुसरा एटरंन्स असायला हवा होता. या भूमिकेशी आम्ही कायम ठाम असल्याचे सातारा-देवळाईतील शंभर टक्के नागरिकांचे मत आहे. यासंदर्भात सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती व संघर्ष समितीच्या वतीने मुख्य अभियंत्यांना येथील पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याबाबत निवेदन दिले जाणार असल्याचे जनसेवा समितीचे तसेच संघर्ष समितीचे बद्रीनाथ थोरात, सोमिनाथ शिराणे, आबासाहेब देशमुख, ॲड. शिवराज कडू पाटील आणि असद पटेल यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.
बीडबायपासवरील संग्रामनगर तथा जगद्गुरू स्वामी हंसराजतीर्थ महाराज चौकात नव्याने होऊ घातलेल्या पुलाची उंची जुन्या अस्तीत्वातील रस्त्यांपासून ते पुलाच्या बीमपर्यंत केवळ ३.८ मीटर घेतली. मात्र यातून अवजड वाहने थेट पुलाच्या बीमला खेटत असल्याचे लक्षात आल्यावर सातारा-देवळाईकरांनी सचित्र पुलाच्या सदोष बांधकामावर विविध समाजमाध्यमांवर टीकास्त्र सोडले. शहरभर जागतिक बँक प्रकल्पातील कारभाऱ्यांचा सदोष कारभार उघडा पडला. यानंतर कारभाऱ्यांनी या ठिकाणी १.७ मीटर खोलीचा व्हेईक्युलर अंडरपास बांधण्यात येत असल्याचा दावा करत त्यासाठी पुलाखालील रस्त्यांचे खोदकाम करत १.७ मीटर खोलीचा भुयारी मार्ग खोदण्याचा खटाटोप केला. मात्र हे करताना सातारा-देवळाईची गुलमंडी समजल्या जाणाऱ्या आमदाररोडचा बायपासवर ये-जा करण्याचा एटरंन्स बंद झाला. परिणामी सातारावासियांना आमदाररोडकडुन देवळाई चौकाकडे जातांना मोठा वळसा घालुन जावे लागणार आहे. दुसरीकडे शहानुरमियाँ दर्गाकडून आमदाररोडकडे येतांना चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे भुयारीमार्गातून अवजड वाहने चढणार कशी? हा देखील चिंतेचा विषय असल्याचे मत येथील प्रतिष्ठीत नागरिकांनी व्यक्त केले. एकूणच सदोष डिझाईन ही पहिली चुक लपविण्यासाठी व्हेईक्कुलर अंडरपास बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा जरी बांधकाम विभाग करीत असला, तरी यात अनेक चुका येत्या काही दिवसात पुलाखालुन वाहतूक सुरू झाल्यावर समोर येतीलच असा ठाम विश्वास सातारा-देवळाईकरांनी व्यक्त केला आहे.
बीड बायपासवरील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उंचीबाबत विनाकारण चुकीची चर्चा करून अनेक संभ्रम निर्माण करण्याचे काम काही समाजमाध्यम करत असल्याचा थेट आरोप करत सार्वजनिक बांधकाम खात्यातील जागतिक बँक प्रकल्प शाखेतील कारभाऱ्यांनी सातारा-देवळाईकरांच्या ओल्या जखमेवर मीट चोळण्याचा प्रताप केला आहे. दुसरीकडे पुलाखालील रस्त्यापासून पुलाची उंची साडेपाच मीटर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे जमीनस्तरापासून पुलाची उंची ३.८ मीटर असल्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे. मात्र, हीच उंची जुळण्यासाठी कारभाऱ्यांनी पुलाखालुन अस्तित्वातील जुन्या रस्त्यांपासून १.७ मीटर खोल भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र आधीचे रस्ते समान पातळीवर व उंच असताना येथे भुयारी मार्गाची गरजच नव्हती, असे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ आधीच्या रस्त्यांपासून उड्डाणपूलाच्या बाॅटमपर्यंत ही उंची ५.५ मीटर असायला हवी होती. मात्र पुलाचे सदोष डिझाइन लपवण्यासाठीच सध्या भुयारी मार्गासाठी पुलाखाली आणि पुलाच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम सुरू केल्याचा खटाटोप केला जात असल्याची ही अफवा अथवा विनाकारन चर्चा नसून विभागातील कारभाऱ्यांनी आमच्या ओल्या जखमावर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची भावना सातारा-देवळाईकरांनी टेंडरनामाशी बोलताना व्यक्त केली आहे.
असा आहे कारभाऱ्यांचा दावा
डिझाइननुसारच पुलाचे काम सुरू आहे, भुयारी मार्गात पाणी साचणार नाही यासाठी खास ड्रेनेजची व्यवस्था केली आहे, रेल्वे पटरीकडील नाल्यात अंडरग्राउंड पाइप टाकुन पावसाच्या पाण्याचा निचरा करणार असल्याचा दावा येथील कारभारी करत आहेत.
असा खोडुन काढला नागरिकांनी दावा
मात्र, आधीच येथील जमीनस्तर दक्षिणेकडून उत्तरेकडे उतारावर आहे. पावसाचे पाणी जुन्या रस्त्यांवर कधीच साचत नव्हते. बायपासपासकडुन रेल्वे पटरीच्या दिशेला आधीच नैसर्गिक ढाळ असल्याने पाणी साचण्याचा प्रश्नच येत नव्हता. केवळ भुयारी मार्गाचा घाट घातल्याने आता साइड ड्रेनमधून पटरीजवळील नाल्यात पाणी सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा पूल वाहनचालकांना मोठा त्रासदायक जाणवणार आहे. पुलाखालून मोठे खड्ड्यातून पहिल्या गेरवर चढणार कसे? या प्रश्नाचे उत्तर येथील कारभाऱ्यांनी द्यावे असे मत ॲड. शिवराज कडू यांनी मांडले. दुसरीकडे जर यांना भुयारी मार्ग करायचाच होता तर उड्डाणपुल बांधला कशाला? असा सवाल शहरातील उद्योजक मनोज बोरा यांनी उपस्थित केला आहे. सदोष डिझाइन बनवणाऱ्या कारभाऱ्यांच्या पगारातून शासनाने पैसा वसुल करावा अशी संतप्त प्रतिक्रीया शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक चंद्रकांत मालपानी यांनी देत संताप व्यक्त केला आहे.