Sambhajinagar : मुकुंदवाडी स्थानकावरील प्लॅटफाॅर्मचे निकृष्ट काम

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दोन वर्षांनंतर मुकुंदवाडी रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे काम दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भेट दिल्यानंतर हाती घेण्यात आले. हे काम हाय लेव्हल प्लॅटफॉर्म दर्जाचे असताना देखील संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर करण्याचा सपाटा लावण्यात आला. त्यामुळे काही जागरुक प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रतिनिधीने रविवारी या कामाची पाहणी केली. दरम्यान, सुमार दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळताच प्रतिनिधीने दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएम नीता सरकार यांना थेट सवाल करताच त्यांनी रेल्वे स्थानकातील सर्वच कामाबाबत चौकशीचे आदेश दिले.

Sambhajinagar
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

यासंदर्भात प्रतिनिधीने रेल्वेचे अधिकारी पंकजकुमार यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे याकामावर होत असलेला खर्च आणि ठेकेदाराचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. दुसरीकडे कामावर हजर असणाऱ्या आरेफ पठाण या सब ठेकेदाराने मी केवळ ११५ काँक्रिट टाॅपिंग ब्लाॅक तयार करायचे काम काळे नामक ठेकेदाराकडून घेतले आहे. प्रत्येक ब्लाॅकसाठी तीनशे रूपये मजुरीने मी काम करत असल्याचे म्हणत त्याने काळे यांच्याकडे बोट दाखवले. काळेंनी सदर काम हे जालन्याच्या संगिता कन्स्ट्रक्शनचे असल्याचे सांगत माझ्याकडे केवळ निरिक्षणाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मात्र, संबंधित ठेकेदाराचा संपर्क क्रमांक देण्यास नकार देत उद्या कामावर येऊन भेटा नंबर देतो म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे या कामाचा खरा ठेकेदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : प्रशासक गरजले अन् ठेकेदार बदलले, पण...

डीआरएम यांच्याकडून गंभीर दखल

अधिकारी आणि सब ठेकेदारांची बनवाबनवी लक्षात येताच प्रतिनिधीने थेट दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएम नीती सरकार यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या विनंतीवरून होत असलेले निकृष्ट काम आणि स्थानकावरील समस्यांबाबतची माहिती पाठविल्यानंतर त्यांनी सदर कामाची चौकशी मी स्वतः करणार असल्याचे म्हणत इतर सुविधांवर देखील लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Sambhajinagar
Sambhajinagar : प्रशासकांकडून कानउघडणी अन् २४ तासात बुजविले खड्डे

काय आहे नेमके प्रकरण

दक्षिण मध्य रेल्वेकडून मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावरील जुन्या  प्लॅटफाॅर्मला लागूनच पुर्वेला ११० मीटर लांब आणि सहा मीटर रूंदीचा प्लॅटफाॅर्म वाढवायचे काम सुरू आहे.यानंतर सुरक्षाभींतीचे काम देखील केले जाणार आहे. मात्र मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात काळी माती असल्याने मजबुत प्लॅटफाॅर्मसाठी जमीनस्तरापासून किमान चार फुट खोदकाम करून त्यात कमीजास्त आकाराची खडी व मुरूमाचा भराव करून मजबुतीकरण करणे आवश्यक होते. मात्र या कामाला फाटा देत पुरेसे खोदकाम व भराव न करता ओबडधोबड पध्दतीने काँक्रिटचा पहिला थर टाकण्यात आला. त्यावर पुरेशा प्रमाणात क्यूरीन देखील केली जात नसल्याने त्यातून खडी बाहेर आलेली दिसली. विशेष म्हणजे प्लॅटफाॅर्मवर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने लावले जाणारे काँक्रिटचे टाॅपींग ब्लाॅकवर देखील क्युरीन न केल्यामुळे त्यांच्या कडा निखळलेल्या दिसल्या.

वाढत्या प्रवासी संख्येचा आकडा विचारात घेऊन सदरचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून हाय लेव्हल प्लॅटफार्मचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. आजघडीला येथील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, त्यावर दबाई न करताच काँक्रिटीकरण केले जात आहे. थातूरमातूर भरावात थेट माती मिश्रित मुरूम टाकून सिमेंट काँक्रीट केले गेल्याचा आरोप प्रवाशी करत आहेत. यामुळे सरकारच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे  काम केले जात असल्याचे देखील प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान 'टेंडरनामा'कडून सवीस्तर माहिती मिळताच चौकशीसाठी डीआरएम नीती सरकार येणार म्हणून हाय लेव्हल प्लॅटफॉर्मचे काम अत्यंत जलद गतीने करण्यात येत आहे.

Sambhajinagar
Nashik : अखेर घंटागाडी अनियमिततेची चौकशी सुरू; दंडात्मक कारवाई...

केवळ एक खासगी लेबर काॅन्ट्रॅक्टर लावून काही मिस्त्रींच्या हस्ते काम
'टेंडरनामा' प्रतिनिधीने स्वतः रेल्वे स्थानकांच्या कामावर भेट देऊन विचारपूस केली. या वेळी येथे एकही सेक्शन इंजिनिअर उपस्थित नव्हता. केवळ आरेफ पठाण नामक व्यक्ती एक खासगी लेबर लावून हर्सुल येथील काही मिस्त्रीच्या हस्ते हे काम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरचे होत असलेले निकृष्ट कामाची प्रतिनिधीने चौकशी केली. मात्र रेल्वेचा अभियंता फंकजकुमार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ठेकेदारांनी एक दुसर्याकडे बोट दाखवली. त्यामुळे प्रतिनिधीने थेट डीआरएम नीती सरकार यांच्याकडे या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्या स्वतः कामाची पडताळणी करणार आहेत.

वर्षानुवर्ष सुविधांची बोंबाबोंब

मागील काही वर्षांपासून मुकुंदवाडी  येथील 'ड' दर्जाचे रेल्वे स्थानक सुविधेच्या गर्तेेत सापडले आहे. स्थानकावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गासह वृद्ध आणि महिला, मुलींना याचा फटका सहन करावा लागत आहे. मराठवाड्यालाच केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल गेल्याने मोठ्या कठीण परिस्थितीत प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली. धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या भाविक भक्त, गोर-गरीब नागरिक, प्रवासी व्यापारी वर्गांना ठिकाण गाठण्यासाठी अनेक रेल्वे बदलाव्या लागत आहेत. तसेच महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर थांबा नाही, स्थानकावरील अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी प्रवासी वर्ग त्रस्त आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com