औरंगाबाद (Aurangabad) : शहरात महापालिकेत कायमस्वरूपी तसेच १३ बचतगटातील कर्मचारी तसेच राणा एजन्सी, पी. गोपीनाथ रेड्डी या ठेकेदारामार्फत असे जवळपास साडेचार हजार स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. या सर्व स्वच्छताधुतांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे. शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी पहाटेपासून भर पावसात दुर्गंधीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकुन शहर स्वच्छतेसाठी धावतात. मात्र, स्वतःच्या जीवासाठी कोणतीही खबरदारीची उपाय योजना त्यांच्याकडे नाही.
सुरक्षासाधने नेमकी जातात कुठे
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी महापालिका दरवर्षी आवश्यक त्या साधनांची खरेदी करण्यासाठी पुरवठाधारकांकडुन दरपत्रके मागवते. त्यानुसार अंदाजपत्रक तयार केले जाते. टेंडर प्रसिद्ध करून पतपुरवठाधारक पुरवठा देखील करतात. यासाठी वर्षाकाठी एक ते सव्वा कोटी रूपये देखील दिले जातात. मग ही सुरक्षासाधने जातात कोठे? असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे खाजगी ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील संबंधित ठेकेदारांकडुन सुरक्षासाधने मिळवून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. टेंडरमध्ये आणि वर्क ऑर्डरमध्ये तसा उल्लेख असताना महापालिका प्रशासन अर्थपुर्ण दुर्लक्ष करते.
महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
त्यामुळे त्यांच्या इतक्या गंभीर विषयाकडे औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी कसे दुर्लक्ष केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात कामगार शंक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधना संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र आयुक्तांसह अधिकार्यांनी चालढकल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तूम जीयो हजारो साल और हमारी आयु ४५ साल
महापालिका क्षेत्रात पहाटेपासून कार्यरत होणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. कारण, शहराच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी टाकलेल्या उकिरड्यात ते काम करत असतात. संपुर्ण शहरातील कचरा संकलन करणे, रस्त्यातील उकिरडे उचलून वाहनात टाकुन त्याची कचरा प्रकल्पापर्यंत विल्हेवाट लावणे एकूनच शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र, सुरक्षा साधनांशिवाय ते काम करत असल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. शहर स्वच्छतेत मोलाचे काम करणाऱ्या या सर्व घटकांच्या आरोग्याची काळजी युद्ध पातळीवर घेतली जाणे फार गरजेचे होते. त्याबाबत महापालिका व कोणतेही पाऊल उचलत नाही. परिणामी या लोकांचे आयुष्य ४५ वर्ष देखील राहत नाही. त्यामुळे हे स्वच्छता कर्मचारी जेव्हा तक्रारी घेऊन येतात तेव्हा एका सुरात तूम जीओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, और हमारी आयु ४५ साल असे गीत गातात, हे अधिक धक्कादायक आहे.
या लोकांना सर्वात आधी हातमोजे, पावसाळ्यात रेनकोट, छत्री, साबन, गमबुट, मास्क, हेड कॅप, हिवाळ्यात स्वेटर आणि सॅनीटायझर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला सुरक्षा साधने देणे बंधनकारक आहे. मात्र, औरंगाबादेत बहुतांश कर्मचाऱ्यांना ते बघायला देखील मिळत नाहीत. सॅनीटायझरबाबत कोणतीही स्पष्टता नाही. गमबूटची मागणी तर जुनीच आहे.
महापालिका जबाबदार
स्वच्छता कामगारांची काळजी घेण्याबाबत मी महापालिकेला सातत्याने सांगितले आहे. पण काहींना मिळतात काहींना मिळत नाहीत, खूप लोक यापासून वंचित असतात. कायम, कंत्राटी, बदली असला कोणताही भेदभाव न करता हातमोजे, गम बूट, मास्क आणि सॅनीटायझर द्यायला हवेत. काही अघटित घडल्यास महापालिका जबाबदार असेल.
- गौतम खरात, संस्थापक अध्यक्ष, कामगार शक्ती संघटना