औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या अडीच वर्षांपासून झाल्टा फाटा ते पैठण जंक्शनपर्यंत बीडबायपास रस्त्याचे काम ठेकेदाराचा हलगर्जीपणा व अधिकार्यांची उदासीनता यामुळे संथगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कासवगती कारभारामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे येथील नागरिकांचा आरोप आहे.
गुरू लाॅन्सलगत जोड रस्ता आणि पुलाचे काम अर्धवट सोडले आहे. याचा फटका वाहनधारकांना अधिक बसत आहे. अर्धवट धोकादायक कामाच्या स्थळी सावधानतेचे सुचना फलक देखील न लावल्याने अनेक ठिकाणी अपघाताचा धोका आहे. झालेही तसेच शनिवारी (७ जानेवारी) साडेतीनच्या सुमारास गुरूप्रसाद लाॅनलगत पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या सहाफुट खड्ड्यात कार जाऊन पडली. यात कारचा चुराडा झाला. दैवबलवत्तर चालकास कुठलीही इजा झाली नाही. वाहन खड्ड्यात कोसळण्याचे फोटो सोशल मेडियावर व्हायरल होताच याभागातील नागरिकांनी अर्धवट जोडरस्ते आणि उड्डाणपुलांसह छोट्यापुलांचे काम तातडीने पूर्ण करा, जिथे काम सुरू आणि जिथे काम बंद असेल तिथे सावधानतेचा इशारा देणारे फलक, रेडियम पट्टे आणि सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी पुढे आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीडबायपासवरील वाढती अपघाताची मालिका लक्षात घेता. तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपूरावा करून ३८६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आणि पैठण जंक्शन ते झाल्टाफाटा ते कॅम्ब्रिज चौकापर्यंत जवळपास १७ किमी रस्त्याचा मार्ग निकाली लागला. सरकारच्या हायब्रिड युनिटीअंतर्गत या संपूर्ण ३० मीटर लांबीत काँक्रिटीकरण, तीन मोठे उड्डाणपूल आणि आठ ठिकाणी छोट्यापुलांचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. या रस्त्याचे काम औरंगाबादेतील अनेक रस्त्यांची वाट लावणाऱ्या जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीला देण्यात आले आहे .मात्र काम घेतलेला ठेकेदार सध्या संग्रामनगर चौकातील एका सदोष उड्डाणपुलाच्या डिझाईनमुळे चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. त्यात पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा दरम्यान छोट्यामोठ्या पुलांचे आणि जोडरस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ठेकेदाराने वाहतूकीसाठी तयार केलेला रस्ता आणि त्याच्या बाजुने असलेल्या सेवा रस्त्यांच्या मधोमध खिंडारात अद्याप मुरूम माती भरली नाही. यात दोन्ही बाजुने पथदिव्यांचे काम सुरू आहे. मात्र, खटक्यांच्या शेजारी सावधानतेचे सुचनाफलक लावने बंधनकारक असताना लावले नाहीत. परिणामी तेथे दररोज अपघाताची मालिका सुरू असल्याचे उद्योजक पद्मसिंह राजपुत , आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी खडीचे ढिग पसरलेले आहेत. दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडत असल्याचे गोपिचंद पाटील यांनी सांगितले.
या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने छोटे-मोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. रेणुकामाता मंदिर कमान सातारा येथील स्मिता पठारे या महिलेचा रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकीला अपघात झाला. गेल्या महिन्याभरापासून त्या अंथरूणावर खिळून आहेत. त्यांच्या पायाचे मोठे ऑपरेशन करावे लागले. दोन दिवसांपूर्वी झाल्टा फाटाजवळ भल्यामोठ्या रॅम्पवरून उतरतांना दुचाकीस्वारास खड्डे चुकविण्याच्या नादात चारचाकी वाहनाने उडवून दिले. त्यात तो दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे सुदाम पाटील म्हणाले. या कामाबाबत नागरिक वारंवार तक्रार करत आहेत. मात्र, अधिकार्यांनी ठेकेदाराला कोणतीही तंबी दिली नसल्याचे कामावरून दिसत आहे. एकीकडे नागरिक अपघातात जखमी होत आहेत. दुसरीकडे ठेकेदाराला कामाचे पैसे अनेकांच्या मेहेरबानीमुळे अगोदरच हातात पडत असल्याने त्या आडमुठ्या ठेकेदाराची कामाबाबत चालढकल सुरूच असल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कासवगतीने काम करणारा ठेकेदार हा स्थानिक व सक्रिय राजकारणी लोकांचा लाडका असल्याने स्थानिक नेतृत्वाचा त्यास आशीर्वाद असल्याने कितीही नंगानाच घातला तरी काहीच होऊ शकत नाही, या अविर्भावात तो वागत आहे. स्थानिक नेतृत्वाने याबाबत मौन पाळल्याने ठेकेदाराची मगरुरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या आडमुठ्या ठेकेदाराला पाठीशी घालणार्या संबंधित नेत्यांनी त्या ठेकेदाराची कानउघाडणी करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.