औरंगाबाद (Aurangabad) : विजयनगर ते नाथप्रांगण-कालीका माता मंदिर ते राज कॉर्नर या रस्त्यावर पावसाळ्यात कंबरेएवढे पाणी साचत असे. पावसाची सुरुवात होताच या परिसरातील वीज पुरवठाही खंडित होत असे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून या रस्त्याचे काम होत नव्हते. या सर्व समस्यांमधून सुटका होण्यासाठी या रस्त्याचे काम २०१८ मध्ये करण्यात आले. पण कंत्राटदार अर्धवट काम करून पसार झाल्याने नागरिकांना खड्ड्याचा नव्हेच तर आरपार नाला ओलांडण्याची अनुभुती येत आहे. या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गारखेड्यातील विजयनगर ते नाथ प्रांगण पुढे राज कॉर्नरकडून एमराॅल्डसिटी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले होते.
उत्तरेकडून विजयनगर ते कालिका मंदिर, पुर्वेकडुन कालिका मंदिर ते पहाडे कॉर्नर दक्षिणेकडून एमराॅल्ड सिटी ते नाथ प्रांगण असा हा झेड टाईप रस्ता आहे. सर्व बाजूने उतार आणि मध्येच सखल भाग असल्याने आधीच वाताहत झालेल्या रस्त्यातील खड्ड्यातून सुटका करताना नागरिकांची दमछाक होत होती. त्यात पावसाळ्यात विजयनगर-कालीका मंदिर आणि नाथप्रांगणातील सखल भागात खड्ड्यात पाण्याचे तलाव साचत असल्याने प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना तलावात उतरत रस्त्याच्या कामासाठी आंदोलन देखील करावे लागत असे.
पाऊण कोटीचा रस्ता तरिही खस्ता
अखेर या भागातील नागरिकांचा तिव्र संताप पाहून तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. विनायक निपुण यांनी या भागातील नागरिकांची व्यथा ऐकून २०१८ मधील शंभर कोटी सरकारी अनुदानाच्या यादीत या रस्त्याचा समावेश केला होता. त्यात दोन्ही बाजुने उतार असल्याने विजयनगर ते थेट राज कॉर्नर या ७ मीटर रुंदी आणि १२५० मीटर लांबीसाठी ७५ लाख रूपये मंजुर केले होते. मुंबईच्या राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीला ४ डिसेंबर २०१८ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.
कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
कंत्राटदाराराने स्वप्ननगरीत विजयनगरपर्यंत काम पुर्ण केले. मात्र विजयनगर ते कालिका मंदिर , कारगील मैदानासमोरील ७ मीटर रूंदी व १० मीटर लांबीचा पॅच तसाच सोडला. गेल्या तीन वर्षांपासून या भागातील नागरिक तगादा लावत आहेत. पण पालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम झाले नसून तो रस्ता आजही अर्धवट अवस्थेत आहे.
सालाबाद प्रमाणे साचतो तलाव
या अर्धवट रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून झालेले नाही. हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात दरवर्षी येथे पाणी साचते. मयुर टेरेस, हनुमाननगर, पुंडलीकनगर, आनंदनगर , एमराॅल्ड सिटी, बाळकृष्णनगर, विजयनगर ते स्प्वप्ननगरीकडुन थेट कालीकामाता मंदिराकडे टेकडीवरून वाहून येणारे पाणी, तसेच कारगिल मैदानाकडुन वाहून येणारे पाणी कालीकामाता मंदिरालगत वळण मार्गावर साचते.
नाल्यावर अतिक्रमण, पाणी रस्त्यावर
या भागातील पावसाळी नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याने नाल्याचा प्रवास बदलून ते पाणी रस्त्यावर येते आणि यात भर पडते. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. पाणी साचल्याने एमराॅल्ड सिटीकडुन विजयनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होते. या त्रासाला नागरिक कमालीचे त्रासले असून गेल्या चार वर्षापासून नागरिकांना संतापून उग्र आंदोलन करावे लागते.
आयुक्तांच्या आदेशावर फिरले पाणी
तत्कालीन आयुक्त डाॅ. विनायक निपुण यांनी या भागात रस्त्याचे काम झाल्यावर पाहणी केली असता कालीकामाता चौकातील अर्धवट पॅच पाहूण त्यांनी देखील ठेकेदारा येथे नळकांडीपूल करून पाण्याचा निचरा करायच्या सूचना केल्या होत्या. त्यावर तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र चार वर्ष उलटून झाले तरी येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. केवळ खडी रस्त्यावर टाकून काम सोडून देण्यात आले आहे.
पुन्हा रस्त्यावर उतरणार: नागरिकांचा इशारा
पालिका प्रशासन पुढील पावसाळ्याची वाट पाहात आहे का? हवामानातील बदलामुळे पाऊस कधी पडेल कधी नाही हे सांगता येत नाही. हे काम करण्यात कोणालाच रस दिसत नाही. स्थानिक रहिवासी.या अर्धवट रस्त्याच्या कामासाठी सातत्याने ओरड करीत आहेत. मात्र, पालिका प्रशासनास अद्यापही जाग येत नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत केवळ पाहिला जात आहे. पुढील पावसाळ्याअगोदर काम न झाल्यास नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा ईशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.