औरंगाबाद (Aurangabad) : राज्यात भाजप प्रेरीत शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारच्या काळातील घेतलेल्या अनेक विकासकामांना कात्री लावण्याचे काम सुरू झाले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोट्यावधींच्या विकासकामांपाठोपाठ आता प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत विविध पर्यटन स्थळांच्या १८कोटीच्या विकासकामांना शिंदे सरकारने 'ब्रेक' लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नांचा भंग झाला असून, शिंदे सरकारच्या मनमानी कारभाराबाबत जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने ४ जुलै २०२२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (डीपीसी) २०२२ -२३ मध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कोट्यावधींच्या कामांना कात्री लावली. त्यापाठोपाठ आता प्रादेशिक पर्यटन योजनेला देखील कात्री लावली आहे.
या योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी राज्यभरातील जिल्हा स्तरावरील कामांसाठी निधी वितरित करण्यास राज्य सरकारने २८ जूनला तांत्रिक व प्रशासकीय तसेच वित्तीय मान्यता दिली होती. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, २५ जुलै रोजी शिंदे सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे.
या कामांना 'ब्रेक'
● हनुमान टेकडी येथे पाथ वे व परिसर सुशोभिकरण
● सुलीभंजन येथे रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण
● कायगाव येथील रामेश्वर मंदिर येथे घाट बांधणे, सुशोभिकरण करणे
● पाल येथील सिध्देश्वर मंदिर संस्थान येथे गिरीजा नदीवर घाट बांधकाम , संरक्षक भिंत बांधणे
● लोहगड नांद्रा येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे, गड चढण्यासाठी पायऱ्या, हायमास्ट बसविणे आदी कामांना 'ब्रेक' लावला आहे.