छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : साताऱ्यातील खंडोबा मंदिराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे खंडोबा मंदिराची यात्रा तोंडावर असताना सुरू केले. दरम्यान बांधकामासाठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यात्रा आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना काही रस्त्यांवर खडी अंथरने सुरू केले आहे. काही रस्त्यांची कामे अर्धवट करून ठेवलेली आहेत. जिकडे तिकडे खाच खळगे, अंथरलेली खडी आणि खड्ड्यांची जत्रा भरल्याने यात्रेनिमित्त येणाऱ्या देशभरातील भाविक, भक्त आणि पर्यटकांची गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे.
या रस्त्यांवरून जाण्या - येण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आता आठ दिवसांत रस्त्यांची कामे होणे अशक्य असल्याने भाविक आगीतून फोफाट्यात पडणार असल्याचे लक्षात येताच साताऱ्यातील खंडोबा मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सोमीनाथराव शिराणे यांनी फुलेनगर रेल्वे गेट ते निर्लेप रस्त्याचे बांधकामासाठी सुरू केलेले खोदकाम स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला बंद करायला लावले. दुसरीकडे बीड बायपासवरील एमआयटीकडून सातारा खंडोबा मंदिराकडे जातानाच एमआयटीलगत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन उतारावर काॅंक्रिटचे काम करून घेतले. असे असले तरी भाविकांची गैरसोय होणार, अशी चर्चा गावात पसरली आहे. महापालिका, स्मार्ट सिटी कार्पोरेशन आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्या नियोजनशून्य कारभारावर साताऱ्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रस्ता क्रमांक : १
सातारा गाव खंडोबा मंदिराला पैठणरोडपासून कांचनवाडी-सातारा-देवळाईला जोडणाऱ्या नाथव्हॅली ते सातारा खंडोबा मंदिर या रस्त्याचे सहा महिन्यांपासून काम अर्धवट असल्याचा आरोप सोमिनाथ शिराने यांनी केला आहे. या कामासाठी १ कोटी ६८ लाख ६४ हजार १८ रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्याप रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरातील रंगनाथराव बाबुराव वरकड यांच्या रुद्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते.
टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी १.०४ इतक्या कमी टक्के दराने सहभाग नोंदवल्याने त्यांना या कामाचा ठेका देण्यात आला होता. या कामासाठी त्यांना १० मे २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. महापालिकेने याकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. कंत्राटदाराने नाथव्हॅली ते सातारा रोड दरम्यान अंदाजपत्रकात डांबरी रस्त्याचा समावेश असताना या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून येथे सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याने १२५ मीटर लांबीचा सिमेंट रस्ता केला. पुढे नाथव्हॅली ते सातारा बटालियनपुलापर्यंत ३.२५ मीटर रूंदीकरण केले आहे. परंतु रस्त्यांचे कामे सुरू असतानाच पावसाळा लागला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर कंत्राटदाराने काम केले मात्र काम अर्धवट अवस्थेतच आहे.
रस्ता क्रमांक : २
दुसरीकडे देवळाई गावातून म्हाडा काॅलनीमार्गे होळकर चौक ते साताऱ्यातील खंडोबा मंदिराला येणारा रस्ता आठ वर्षांपुर्वी कालिका कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आला होता. यासाठी जवळपास सात कोटींचा निधी खर्च करण्यात आला. या मार्गावर तीन पुलांपैकी दोन पुलांचे काम मार्गी लागले. पण एका पुलाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने काम रखडले आहे. आठ वर्षांपूर्वी झालेल्या कामानंतर रस्त्याचे काम पुन्हा झाले नाही. परिणामी हा रस्ताही होत्याचा नव्हता झाला आहे. त्यात आहे त्या रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीने जलवाहिनीसाठी उकरून ठेवल्याने त्रासात भर पडणार आहे.
औरंगाबाद - सातारकरांचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा दीड महिन्यावर आली आहे. त्यापुर्वी गावाचा मुख्य रस्ता असलेल्या एमआयटी महाविद्यालय ते सातारा गाव रस्त्याचे काम व्हावे, यासाठी मनपाने ९६ लाखांची टेंडर काढून ती अंतिम केली होती. मात्र, मनपाच्या स्थायी समितीच्या मंजुरीसह कार्यारंभ आदेश दिले नसल्याने ठेकेदाराने काम करण्यास विरोध दर्शवला आहे.
रस्ता क्रमांक : ३
एमआयटी महाविद्यालय ते सातारा गाव या तेराशे मीटर लांब व पाच मीटर रूंद रस्त्याचे काम सात वर्षांपूर्वी नगरपरिषदेने महापालिकेत जमा केलेल्या निधीतून ९६ लाख रुपयांतून झाले होते. गौतम कटारिया यांच्या कटारीया कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले होते. ते मार्गावरील एका पुलाचे काम ४६ लाख रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले होते. सद्यस्थितीत रस्त्याची दुरवस्था म्हणता येणार नाही. मात्र पुलावर पडलेल्या खटक्यांनी भाविकांच्या मानेला झटके बसणार तसेच वाहनांचे नुकसान होणार, अशी स्थिती आहे.
रस्ता क्रमांक : ४
उस्मानपुऱ्यातून आनंद गाडे चौक ते मिलिंद नगर - फुलेनगर रेल्वे गेट - बीड बायपास - एमआयटी - सातारा हा जुना गावठाण रस्ता आहे. या रस्त्याची भयंकर स्थिती आहे. आनंद गाडे चौक ते कबीर नगरातील छोट्याशा चिंचोळ्या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले आहे. मात्र पुढे मिलिंद नगर ते फुलेनगर रेल्वे गेट पर्यंत रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी अवस्था आहे. त्यात फुलेनगर रेल्वे गेट ते बीड बायपासपर्यंत स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. दोन वर्षांपूर्वी मंजुर झालेला हा रस्ता कंत्राटदाराने तीन महिन्यांपूर्वी काम हाती घेतले. मात्र आता ऐन साताऱ्यातील खंडोबा मंदिराच्या यात्रेला आठवडा शिल्लक असताना खडी पसारणे सुरु केले आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटदाराने फुलेनगर रेल्वे गेट ते सातारा एमआयडीकडून बीड बायपास कमलनयन रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे खोदकाम सुरू करताच खंडोबा मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सोमिनाथ शिराने यांनी यात्रेनंतर काम सुरू करा, अशी मागणी केल्यानंतर कंत्राटदाराने काम थांबवले. जर हा रस्ता खोदून ठेवला असता आणि त्यात अवकाळीने नदी भरली असती तर भाविकांना मोठा त्रास सोसावा लागला असता. असे असले तरी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे.
रस्ता क्रमांक : ५
बीडबायपास वरील देवळाई चौक व एमआयटी पुलाखालून जाताना खड्डे आणि फुफाटा सोसावा लागणार आहे. तर संग्राम नगर चौकातील चुकीच्या पुलामुळे वाहतूक कोंडी सोसावी लागणार आहे.
रस्ता क्रमांक : ६
साईटेकडी ते देवळाई या रस्त्याचे काम सहा महिन्यांपुर्वी कंत्राटदाराने हाती घेतले आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण होत असल्याने कचनेरकडून येणाऱ्या भाविकांची मोठी तारांबळ उडणार आहे.
रस्ता क्रमांक : ७
सिडको - हडकोसह गारखेडा, मुकुंदवाडी येथील भाविकांना व आसपासच्या पंचक्रोशीतील भाविकांना सातारा खंडोबा मंदिराकडे येण्यासाठी शिवाजीनगरकडून येणारा मार्ग सोयीस्कर होता. मात्र शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक - ५५ येथील भुयारी मार्गासाठी तीस फुटाचा खंडोबा करून दोन महिन्यांपासून काम कासवगतीने सुरू आहे. खड्ड्यात अवकाळी पावसाचे पाणी व फुटलेल्या ड्रेनेजलाइनच्या पाण्याची मिसळ झाल्याने कंत्राटदाराकडून संध्या मोटारी लाऊन पाणी उपसण्याचेच काम सुरू आहे. परिणामी भुयारी मार्गासाठी गेट बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे.
रस्ता क्रमांक : ८
जालनारोड अमरप्रित - शहानुरवाडी - संग्रामनगरचौक ते आमदाररोड सातारा खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना मोठा प्रशस्त व सोयीस्कर मार्ग आहे. मात्र बीड बायपासवरील संग्रामनगर चौकातील चुकीच्या पुलाने व पुढे आमदाररोड ते सातारा खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी चिंचोळ्या रस्त्यावरुन भाविकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यात यात्रेनिमित्त रस्त्यांवर नागरिकांनी व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्याच्या लगतच घराचे ओटे, पत्र्याची पडवी, घरासमोरील पायर्या व जिने, पाण्याच्या टाक्या, तसेच बेशिस्तपणे रस्त्यावर रात्रीच्यावेळी उभी केलेली चार चाकी वाहने, बांधकामासाठी आणलेली वाळू ,खडी, विटा अशी विविध प्रकारची अतिक्रमणे रस्त्यावर केल्याने चारचाकी व दुचाकीवर येणाऱ्या भाविकांची मोठी कसरत करावी लागणार आहे. याच मार्गावरील बावन्न घराची वस्ती एकतानगर ते रोहीदास नगर दरम्यान असुरक्षित नाल्यावरील पूल आणि दुर्गंधीचा सामना करत वाट काढावी लागणार आहे. पूल पार केल्यानंतर एका बाजूने सिमेंट रस्ता व दुसऱ्या बाजूने नाला असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्ता क्रमांक : ९
सातारा गावातील गट क्रमांक - ३ आदीवासी मुलांचे वस्तीगृह ते सातारा खंडोबा मंदिर रस्त्याच्या लेव्हलला मोठा नाला आहे. नाल्यावरील नळकांडी पुलाची उंची कमी आहे. तसेच खूप मोठा चढ उतार असल्याने हा मार्ग काढतांना भाविकांची मोठी दमछाक होणार आहे. हा रस्ता बाह्यवळण रस्ता म्हणून समजला जातो. याच रस्त्याच्या बाजुला मंदिराची खुली जागा आहे. यात्रेनिमित्त पानफूल व खाद्याची दुकाने याच रस्त्यावर लागतात शिवाय मोकळ्या पटांगणात खेळणी लागतात. धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम याच रस्त्याला लागूनच होतात.