Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : फक्त खड्ड्यांचाच रस्ता म्हणून छत्रपती संभाजीनगर तालुक्यात कुप्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सी ते शेंद्रा वरूड रस्त्याचे भाग्य उजळले असून या रस्त्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाच्या निधी अंतर्गत करावयाच्या ११ कि.मी. रस्ता कामाचे टेंडर दोन वर्षांपूर्वी काढण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील शिवशाही कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत हा रस्ता सुसाट झाल्याने या भागातील शेकडो गावांना दिलासा मिळाला आहे. सदर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सी ते शेंद्रा ते वरूड या ११ कि.मी. रस्त्यावर खड्डा नाही, अशी एकही जागा शिल्लक. त्यामुळे हिरापुर, फत्तेपूर, आडगाव, वडखा, पळशी, सुलतानपूर, कच्चे घाटी, पोखरी, पिसादेवी, हर्सुल, गोपाळपुर, मांडकी व अन्य शेकडो गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, कामगार, नागरिक तसेच रूंग्नांना वरूडमार्गे शेंद्रा ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सी छत्रपती - जालना रोड व पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे येण्यासाठी तब्बल पाऊन तासांचा वेळ वाहनधारकांना लागत होता . या रस्त्यावरील खड्ड्यांना त्रासून अनेकांनी या मार्गे प्रवास करणे टाळून पर्यायी वाट धरली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसेच जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क या रस्त्याचे ‘मृत्युची वाट' असे नामकरण केले होते.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यासाठी तब्बल दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले होते.
त्यानुसार टेंडरप्रक्रियेत यशस्वी झालेल्या शिवशाही कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेकडो ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कंत्राटदाराने कार्यारंभ आदेश मिळताच कामाला सुरुवात केली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी जागेचा वाद निर्माण करत रस्त्याच्या कामाला ग्रहण लावले होते. त्यामुळे ग्रामस्थ विरूद्ध ग्रामस्थ अशी मोठी संतापाची लाट उसळली होती.
काही शेतकऱ्यांनी रस्त्याचे बांधकाम अडवल्याने त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या कालावधीत काम करता आले नसल्याची खंत कंत्राटदाराने व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत या रस्त्यासाठी होत असलेला अडथळा दूर करून दिल्याने काम मार्गी लागल्याचे कंत्राटदाराने सांगितले.
१२ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा कालावधी होता. मात्र शेतकऱ्यांनी जमिनीचा वाद घातल्याने दोन वर्षात या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. आता त्यापुढील पाच वर्षे केलेल्या कामाची देखभाल व दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराला करावयाची आहे. यासाठी २८ लाखाची सुरक्षा रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. या कामात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -७५३ सी ते शेंद्रा गावापर्यंत सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. शेंद्रा ते वरूड दरम्यान आठ आरसीसी पूल उभारण्यात आले आहेत. शेंद्रा ते वरूड थेट डांबराचा रस्ता तयार करण्यात आला आहे.
डांबरी रस्त्याची रूंदी ३.७५ मीटर असून दोन्ही बाजूंना दोन मीटरचे रूंदीकरण करून शोल्डर खडी व मुरुमाने मजबुत करण्यात आल्याने हा रस्ता मोठा झाला आहे. शुक्रवारी सकाळी या रस्त्याची पाहणी केली असता सुसाट रस्त्यावरून जाताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.