छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील सातारा - देवळाई परिसरात भूमिगत गटार योजनेचे बांधकाम महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या भूमिगत गटारीसाठी २५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. आलेल्या निधीनुसार टेंडर मंजूर केले आहे. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व नको त्या पाइपांचा वापर करीत असल्याचा या भागातील शेकडो नागरिकांचा आरोप आहे.
वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जेदार नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी केंद्रीय गुणनियंत्रण पथकाकडून व्हावी, अशी या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा - देवळाई येथील भुमिगत गटारीचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात अनियमितता असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे. सातारा - देवळाई परिसरात भुमिगत गटार योजनेचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.
सातारा-देवळाई या दोन वॉर्डांसाठी २३१ कोटी खर्चाच्या ड्रेनेज प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ई-टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यात केंद्र सरकारच्या अमृत २.० अंतर्गत योजना राबवली जात आहे. यात केंद्र सरकारचे २५ टक्के प्रमाणे ६९ कोटी ९२ लाख रुपये अनुदान मिळाले आहे.
तसेच राज्य सरकारचे ४५ टक्के म्हणजेच १२४ कोटी ०६ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. यासाठी महापालिकेला ३० टक्के प्रमाणे ८२.७० टक्के अनुदान द्यावे लागणार आहे. याप्रमाणे सातारा-देवळाईतील या प्रकल्पावर एकूण २३१ कोटी २५ लाख ५९ हजार ८११ रुपयाचे टेंडर काॅस्ट नुसार काम करण्यात येत आहे. गुजरातच्या अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र टेंडर मधील ठरविण्यात आलेल्या अटी - शर्तीनुसार काम होत नाही. चेंबरमध्ये सिमेंट विटांचे प्लास्टर केले जात नाही.
सातारा - देवळाई भागातील नागरिकांच्या तक्रारीवरुन टेंडरनामा प्रतिनिधीने शहरातील काही नामवंत स्थापत्य अभियंत्यांसह. सातारा - देवळाई भागातील नाइकनगर, आलोकनगर, म्हाडा काॅलनी देवळाई परिसर, उर्जानगर, बीड बायपास, सातारा पोलिस स्टेशन परिसर, नुरानी मस्जिद परिसर, विजयंतनगर, केशवनगरी, शाहनगर,ज्योतीनगर, भाग्योदय नगर, लक्ष्मी काॅलनी, सप्तक्षृंगी नगर, द्वारकापुरीनगर, वसंत विहार, छत्रपती नगर, राजेश नगर, पृथ्वी नगर, रेणुका पुरम येथे सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेची पाहणी केली.
दरम्यान या संपुर्ण भागात काळी माती आहे, अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते येथे फ्लॅक्जीबल रबरी बांगडी पाइप टाकणे चुकीचे असल्याचे म्हणत सदर कामात ॲस्बेस्टोस अर्थात ए.सी. म्हणजे सिमेंट एसी पाइप किंवा चीनी मातीचे पाइप टाकणे गरजेचे होते. जमिनीतील या पाइपांवरून गाडी गेली तर, पाइप हमखास दबतील, त्यामुळे अधिक वर्ष टिकतील याचा विचार करून येथे एसी अथवा चिनी मातीचेच पाइप असायला हवे होते. एसी अथवा चीनी मातीचे पाइप चोकप झाले, फुटले तर तसे बदलता येतात पण हे पाइप फुटले अथवा चोकप झाले तर दुरूस्ती करणे अवघड असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यामुळे ही योजना फार साथ देणार नसल्याचेही स्पष्ट मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सदर कंत्राटदाराने हैद्राबाद येथील महानगरपालिकेतील एका अभियंत्याच्या मर्जीतल्या कंपनीकडून सदर पाइप खरेदी केल्याचा आरोप देखील नागरीकांनी सबळ पुराव्यासह केला आहे. सदर भूमिगत गटार योजनेवरून एखादे जड वाहन गेले तर ही पाइप लाइन फुटेल. निकृष्ट दर्जाचे पाईप टाकले जात आहेत. खोदकामात सिमेंटचे बेड काॅंक्रिट न करता तसेच पाइप टाकले जात आहेत. पाइप जाॅईंट करताना सिमेंटचा गिलावा दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या २५० कोटींचा चुराडा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कंत्राटदार चेंबरच्या बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे. याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्तांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीतून बांधकामाची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाऐवजी आयआयटी अथवा केंद्रिय गुणनियंत्रण विभागामार्फत त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करावी, अशीही मागणी केली. सातारा - देवळाईतील महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुजरातच्या अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीच्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामात दिरंगाई होत असून सर्वत्र कच्चे व पक्के रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह दुचाकी तसेच रिक्षा चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदार कंपनीला आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कंपनी कंत्राटदारास रस्ते दुरूस्त केल्याशिवाय कामाचे देयक अदा करू नये, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.