छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेतील उद्यान विभागाच्या कारभाऱ्यांनी रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली वाहनतळ आणि हाॅकर्सझोन उभारण्यासाठी टेंडर काढले. मर्जीतल्या कंत्राटदार निश्चित केला. त्याने चारही बाजूंनी लोखंडी जाळी लावली. तीन मुख्य प्रवेशद्वार उभारले. मोकळ्या जागेत पॅव्हरब्लाॅक बसवले. यासाठी जनतेच्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करून कारभाऱ्यांनी कंत्राटदाराची झोळी भरली. मात्र एकदा बांधकाम झाल्यानंतर संबंधितांचे विकासकामांकडे दुर्लक्ष झाले. गत दोन वर्षांपासून येथील वाहनतळात तसेच हाॅकर्स झोनपासून महापालिकेच्या तिजोरीत फुटीकवडी देखील पडली नाही. याउलट वाहनतळाच्या जागेवर फुकट्यांनी बस्तान मांडले असून हाॅकर्स झोनमध्ये कचऱ्याचा बाजार भरला आहे.
कोट्यावधीच्या टेंडरचा कचरा होणार का?
त्यामुळे महापालिकेने दोन दिवसांपुर्वीच हडकोतील नवजीवन काॅलनीतील खुल्या जागेवर भाजी मंडईसाठी एक कोटी ८४ लाख ६६ हजार रुपये खर्च करून १४० गाळे, शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी दोन दिवसांपुर्वी टेंडर प्रसिद्ध केले. महापालिकेने यापुर्वीही कोट्यवधी रुपये खर्च करून जवाहर काॅलनी परिसरातील त्रिमूर्ती चौकाच्या पाठीमागे महापालिका आरोग्य केंद्रासमोर सावित्रीबाई फुले भाजी बाजारचा देखील गत पंधरा वर्षांपासून असाच कचरा केला. त्यामुळे मागचा अनुभव पाहाता नवजीवन काॅलनीतील भाजी मंडईचा असाच कचरा होणार काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
न्यायालयाचे आदेश धाब्यावर
उड्डाणपुलाखाली वाहनांची पार्किंग करू नये, असे हायकोर्टाचे आदेश आहेत. मात्र या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करून महापालिकेच्या कारभाऱ्यांनी रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली वाहनतळ व हाॅकर्स झोनची निर्मिती केली. या उड्डाणपुलाखाली दुचाकी चारचाकी वाहनांच्या पार्किंगसोबतच दोनशे हातगाड्यांची सोय म्हणून हाॅकर्स झोनची निर्मिती केली. मात्र वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारणी केलेल्या या उड्डाणपुलांच्या आजुबाजुला नागरी वसाहतीसोबत व्यापारी प्रतिष्ठाने देखील आहेत.
दोन्ही बाजूंना उड्डाणपुलांखालून जोड रस्ते आहेत. शिवाय हाकेच्या अंतरावर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक - ५२ आहे. दिवसातून ३६ वेळा रेल्वेची जा - ये सुरू असल्याने गेट वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागते. दरम्यान येथे वाहनांच्या रांगा स्टेशनपर्यंत लागतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील कोणत्याही उड्डाणपुलांखाली पार्किंग व हाॅकर्स झोनची निर्मिती नको, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत.
तसेच उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचा कोणी अनधिकृतपणे वाहनतळासाठी वापर करत असतील तर अशा वाहनांवर कारवाई करण्याचे वाहतूक शाखेला निर्देशही आहेत. मात्र, संभाजीनगर महापालिकेच्या कारभाऱ्यांना न्यायालयाच्या या आदेशाची माहिती असताना देखील जनतेच्या कोट्यवधी रुपयांची तरतूद करून तेथे नको तो उपद्व्याप करण्यात आला. भविष्यात येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्गाचा प्लॅन असताना महापालिकेच्या कारभाऱ्यांनी नियोजन शून्य कारभार केला.
वाहनतळ, हाॅकर्सझोनची दुरावस्था
रेल्वेस्टेशन पुलाखाली उभारण्यात आलेल्या बेकायदा वाहनतळ व हाॅकर्स झोनमध्ये फुकट्यांचे व कचराकोंडीचे साम्राज्य पसरले असून यामुळे वाहनधारकांना दुर्गंधी टाळण्यासाठी उड्डाणपूल लागताच वेगाने वाहन पळवावी लागत आहेत. रेल्वे गेट बंद होताच कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांना कचराकोंडीत दम छाटला जात आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला मोठी नागरी वसाहत आहे. चारचाकी वाहनधारकांची संख्या देखील रस्त्यावरून लक्षणीय आहे. या वाहनधारकांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न तर पुलाखालील वाहनतळामुळे सुटला तर नाहीच याउलट कोट्यवधीचा खर्च वाया गेला आहे.
का दिले न्यायालयाने आदेश?
उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. त्याचे कारण असे की एकाने यासंदर्भात न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. त्यात याचिकाकर्त्यांने समाज विघातक संघटनांकडून वेगवेगळ्या प्रकारे देशविघातक कारवाया केल्या जातात. उड्डाणपुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचा वापर करून एखादी दुघर्टना घडल्यास पुलाला क्षती होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा मुद्दा त्याने न्यायालयापुढे मांडला होता. त्यावर निर्णय घेत न्यायालयाकडून उड्डाणपुलाखाली पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलाखाली पार्किंग करणे बेकायदा आहे, असा आदेश दिलेला असताना महापालिकेतील कारभारऱ्यांनी असा कारभार केला. यात वाहतूक शाखेने ना- हरकत दिली कशी हा संशोधनाचा विषय आहे.