'टेंडरनामा'च्या तपासात फुटले 'त्या' अधिकाऱ्यांचे बिंग! टेंडर विनाच दिले 10 लाखांचे काम

Tender Scam
Tender ScamTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाची गती समाधानकारक नाही. त्यात महानगरपालिकेने भुयारी मार्गात बाधीत मलनिःसारण वाहिनी स्थलांतरासाठी विना टेंडर (Tender) दहा लाखाचे काम एका मर्जीतल्या कंत्राटदाला (Contractor) दिल्याचे 'टेंडरनामा'च्या तपासात समोर आले आहे.

यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला 'टेंडरनामा'ने विचारणा केली असता सदर काम हे सातारा देवळाईतील अमृत योजनेंतर्गत अंकिता एजन्सीकडूनच करत असल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत फालक यांनी सांगितले.

मात्र शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे तातडीने काम करणे गरजेचे होते, असे म्हणत कोणातरी खान नावाच्या कंत्राटदाराला हे काम विनाटेंडर दिल्याचे उप अभियंता अनिल तनपुरे यांनी सांगितले. यासंदर्भात कंत्राटदार मोईनोद्दीन खान यांनी मात्र तोंडावर बोट ठेवत महानगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवले. एकूणच या कामात नेमके गौडबंगाल काय आहे, हे महानगरपालिका प्रशासकांनी शोधने गरजेचे आहे.

Tender Scam
Online Exam Scam : परीक्षा केंद्र चालकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच मॅनेज झालेत का?

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गातील कामाची गती अजिबात समाधानकारक नाही. त्यात आता महानगरपालिकेचे "जाऊ तिथे खाऊ" हे धोरण येथील मलनिःसारण वाहिनी स्थलांतरासाठी वापरले गेल्याचे समोर आले आहे. येथील शिवाजीनगर भुयारी मार्गात जोड रस्त्यासाठी बाधीत ठरणारी मलनिःसारण वाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी ना अंदाजपत्रक तयार केले, ना कामाचे मोजमाप घेतले ना टेंडर काढले.

अत्यावश्यक बाब म्हणत विना टेंडर सदर काम अधिकाऱ्यांनी नेहमीच्याच मर्जीतल्या कंत्राटदाराला दिले. या कामावर खर्च किती, असे 'टेंडरनामा'ने ड्रेनेज विभागाचे उप अभियंता अनिल तनपुरे यांना विचारले असता त्यांनी ढोबळ मानाने दहा लाख सांगितले. परंतु संबंधित काम ज्या कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे, त्याच्या एजन्सीचे नाव व त्याचे नाव देखील तनपुरे यांना सांगता येत नव्हते.

इतक्या मोठ्या रकमेचे विना टेंडर काम होत असताना कामाची पाहणी करणे हे तनपुरे यांची जबाबदारी असताना हे काम योग्य रितीने होतेय की नाही याची पहाणी देखील तनपुरे करत नसल्याचे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

Tender Scam
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे : मार्ग बदलल्याने भूसंपादन केलेल्या 45 हेक्टर जमिनीचे करायचे काय?

या प्रकरणी  प्रतिनिधीने प्राप्त तक्रारीनुसार रविवारी पाहणी केली असता कार्यकारी अभियंता हेमंत फालक यांनी सदर काम हे सातारा - देवळाईतील अमृत योजनेंतर्गत होत असलेल्या ड्रेनेज प्रकल्पातूनच पूर्ण करत असल्याचे सांगितले. मात्र सदर कामासाठी वेगळा कंत्राटदार नेमल्याचे उप अभियंता तनपुरे यांचे म्हणणे आहे, असे प्रतिनिधीने सांगितल्यानंतर फालक यांची बोबडी वळाली. नंतर त्यांनी हे काम अंकिता एजन्सीचे नसल्याचे कबूल केले.

हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणताच महानगरपालिकेत वृत्त प्रकाशित करण्याआधीच खळबळ उडाली आहे. आता प्रकरण दडपण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत. विना टेंडर कामाशी संबंधित दस्तावेज तयार करण्याचे काम चालू केले आहे. जेणेकरून त्याचा हवाला देऊन आता विना टेंडर झालेल्या कामाचे पैसे काढता येतील.‌

महानगरपालिकेत "अत्यावश्यक बाब" या नावाखाली नेहमीच मर्जीतल्या कंत्राटदाराला विना टेंडर कामे दिली जातात. काम झाल्यानंतर कंत्राटदाराकडून कच्चे मोजमाप करून कंत्राटदारांची झोळी भरली जाते. टेंडर न काढता नियमाच्या बाहेर जाऊन काम देण्याचा या प्रकारामुळे नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग करून अधिकारी आणि कंत्राटदार दिवाळी साजरी करतात, असा आरोप केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com