'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच प्रचंड भेगा, दुर्गंधीने प्रवासी त्रस्त!

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगरा (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील बीड बायपासचे काम पूर्ण होण्याआधीच सातत्याने टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे महामार्गाला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा हाॅटेल व्यावसायिक, आसपासच्या वसाहतीतील घरांचा कचरा टाकलेला दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून परिसरा- मधील वसाहतीतील नागरिकांना तसेच प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय कचराकोंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या असल्याने मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

Sambhajinagar
Devendra Fadnavis : फडणवीसांची मोठी घोषणा; 'त्या' 67 हजार उमेदवारांना देणार नोकरी

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे व छोट्या पुलांचे काम अद्याप अर्धवट आहे. जून - २०२० मध्ये रस्ता बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. त्यामुळे सातारा, देवळाई व बीड बायपास करांना  दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र या कामात प्रवाशांचा विचार कमी आणि कंत्राटदाराचा फायदा अधीक असे अंदाजपत्रक बनवल्याने अंत्यंत चुकीचे काम केले गेले. आधी मार्गावरील अंडरपास मधील तिन्ही पुलांची उंची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर खालून खोदकाम करत उंची वाढवण्यासाठी खटाटोप केला गेला. त्याची शिक्षा आता प्रवाशांना भोगावी लागत आहे.

दुसरीकडे संग्रामनगर पुलाखालून सातारा येथील आमदार रोडचा संपर्क तोडल्याने प्रवाशांना चुकीच्या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाखालून जोड रस्त्यांचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. छोट्या पुलांची तीच स्थिती आहे. आयआरसीचे नियम धाब्यावर बसवत दुभाजकाचे काम केले गेले. धक्कादायक म्हणजे रस्त्याचे काम बाकी असताना दोष निवारण कालावधी संपण्याआधीच रस्त्यात आरपार भेगा पडल्याने कामात घोळ असल्याचे दिसत आहे.

शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्तावर गत दहा वर्षांत दोनशे पेक्षा अधीक बळी गेल्याची आकडेवारी आहे. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने हा रस्ता नव्हे, मृत्युचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याची ओळख झाली होती. रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण व्हावे यासाठी बऱ्याच वर्षांपासून सातारा - देवळाई व बीड बायपासकरांनी लढा केला. शेवटी अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकार पावले आणि २९२ कोटींना मंजुरी दिल्याने  हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला.

टेंडर प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले. महानुभाव चौक आश्रम ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौकपर्यंत तसेच झाल्टा फाटा ते आडगाव फाटा, अंबिका ढाबा ते सोलापूर - धुळे हायवे रस्ता काँक्रिटचा काॅंक्रिटचा करण्यात आला. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारले गेले.

Sambhajinagar
Karjat CSMT via Panvel : पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुसाट; 'हा' आहे मुहूर्त

महानुभाव चौक ते झाल्टा फाटा ते निपानी फाटा, झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज असा एकूण जवळपास १६ किलोमीटरचा रस्ता बीड बायपास म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -  २११चा एक टप्पा शहरातून (जालना रोड) जातो. या रस्त्यावरून जड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरून वळविण्यासाठी बीड बायपासची निर्मिती केली गेली. त्यामुळे नांदेड, जालना तसेच बीडकडून येणारी वाहने शहराबाहेरून पुणे, मुंबई, नाशिककडे जातात. त्या वाहनांमुळे रस्ता ओलांडून जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत होत्या.

रस्ता मजबुतीकरणानंतर हा त्रास कमी होणार आहे. म्हणून 'हायब्रीड ॲन्यूटी' प्रकल्पातून हा रस्ता मजबूत केला जात आहे. 'हायब्रीड अन्यूटी' या प्रकल्पातून  रस्त्याची एकूण जी किंमत असते त्यापैकी ६० टक्के रक्कम राज्य सरकार संबंधित कंत्राटदाराला कामाच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार देत आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम आठ वर्षांत २० टप्पे करून दिली जाणार आहे.

रस्ता नवा, लूक जुना

पैठण रोडवरील महानुभाव आश्रम ते निपानी फाटा , झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक अशा महापालिका हद्दीत हा रस्ता आहे. महामार्गालगतच्या कमलनयन बजाज रूग्णालय, सातारा एमआयडीसी वळण मार्ग, देवळाई चौक, गांधीली, बाळापूर, झाल्टा फाटा, सुंदरवाडी अशा विविध ठिकाणी महामार्गांलगत सध्या कचर्‍याचे मोठाले ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. हा कचरा अनेक दिवस येथे पडून आहे. ना महापालिकेच्या गाड्या येऊन हा कचरा उचलतात, ना अनधिकृतपणे कचरा टाकणार्‍यांना पकडून महापालिका अधिकारी त्यांना तो कचरा उचलायला भाग पाडत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com