औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील कमल तलावाच्या (Kamal Talav) डोक्यावर आणि महापालिका (AMC) मुख्य प्रशासकीय इमारतीच्या शेजारीच असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (DR. Ambedkar Garden) व नागपुरातील दीक्षाभूमीतील घुमटाच्या प्रतिकृतीची खिंडारमय अवस्था झाली आहे.
परिसराची झालेली दुर्दशा पाहून येथे जनतेच्या खिशातून घामाचा पैसा काढून कंत्राटदाराची तुंबडी भरण्यासाठी व कारभाऱ्यांची टक्केवारी काढण्यासाठीच हा प्रकल्प राबवला गेला काय, असा सवाल औरंगाबादकरांकडून विचारला जात आहे.
एका बाजूने व्हीआयपी रस्ता, खाली कमल तलाव, शेजारी आमखास मैदान, सरकारी कर्करोग रुग्णालयाची भव्य प्रशासकीय इमारत, मागच्या बाजुला ऐतिहासिक हिमायत बाग, मकबरा आणि याच मार्गावर असलेले पानचक्की, सोनेरी महल, टाउन हाॅल या ऐतिहासिक वारसास्थळांसह विद्यापीठ मार्ग आणि शेजारीच महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत. जामा मज्जीद, जिल्हा क्षय चिकीत्सालय या सार्वबाबींचा विचार करून शहराच्या सौंदर्यात भर पडावी , यासाठी टाउन हाॅल ते हिमायतबागेच्या दरम्यान उंच टेकाडावर तब्बल साडेतीन एकर जागेत १९९७ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची निर्मिती केली गेली.
नागपुरातील दीक्षाभूमीची हुबेहुब घुमटाची प्रतिकृती येथे साकार केल्याने चर्चेचा विषय झाला होता. आता त्याची व्यथा कथन न केलेलीच बरी. उद्यान परिसरात उद्यान प्रेमींसाठी तयार केलेले पादचारी पूल, जाॅगिंग ट्रॅक आणि सुशोभिकरणासह धबधब्यासाठी बांधण्यात आलेल्या चार टाक्यांची आणि उद्यानातील सुशोभिकरणातील झाडाफुलांसह हिरवळीची अत्यंत दुर्दशा झाली आहे.
उद्यानाची संरक्षण भिंत जागोजागी पडली असून, आता या उद्यानाचा आडोसा केवळ जुगारी खेळण्यासाठी आणि विविध व्यसन करण्यासाठीच फायद्याचा ठरत आहे. डॉ. आंबेडकर उद्यानाचे अस्तीत्वच धोक्यात आले असून याबद्दल आंबेडकरी पक्ष, संघटनांनी महापालिकेला वेळोवेळी लेखी, तोंडी सूचना केल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम खरात यांनी केला आहे.
या उद्यानाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रतिनिधीने शनिवारी तब्बल चार तास पाहणी केली. संपूर्ण साडेतीन एकर परिसर नागरिकांसमवेत पिंजून काढला.
या उद्यानाची माहिती घेतली असता १९९७ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डी. एन. वैद्य यांच्या काळात जयभीमनगर वार्डाचे माजी नगरसेवक गौतम खरात यांनी शहरातील पुरातन वारसा स्थळांचा व्हीआयपी मार्ग, तसेच भव्य आमखास मैदान, याशिवाय कमल तलावासह पाठीमागे असलेला ऐतिहासिक हिमायतबाग याचा विचार करून येथे चंदिगढच्या धर्तीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची निर्मिती करावी अशी मागणी केली होती.
कोटीचा प्रकल्प आज कवडीचेही मोल नाही
वैद्य यांनी सविस्तर प्रकल्प आराखड्यानुसार वेगवेगळ्या प्रांतातले दगड आणून राॅक गार्डन देखील तयार केले होते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी खोदकामात सापडलेल्या ऐतिहासिक वस्तुंचे संग्रहालय देखील करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी २६ वर्षांपूर्वी महापालिका फंडातून एक कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र मोठा खर्च करून केलेल्या या प्रकल्पाला कवडीची किंमत नाही.
प्रकल्पाची वाट लावणाऱ्या कारभाऱ्यांकडून किंमत वसूल करावी
दीक्षाभूमीची प्रतिकृती म्हणून तयार केलेल्या घुम्मटाखाली ऐकेकाळी विपश्यना केंद्र चालवले जायचे. आज या घुम्मटाची अवस्था पाहता महापालिकेच्या कारभाऱ्यांना येथे आणून झालेल्या खर्चाची किंम्मत वसुल करावी, असा संताप व्यक्त केला जात आहे. सुरवातीला दोन चार वर्षे या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. विशेष म्हणजे या भव्य उद्यानात विद्यापीठात शिकणारे देशी - विदेशी विद्यार्थी प्रत्येक सुटीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमातून उद्यान प्रेमींचे मनोरंजन करत असत. मात्र महापालिकेतील दुर्लक्षित व कामचुकार कारभाऱ्यांनी या भव्यदिव्य प्रकल्पाची पूर्ती वाट लावल्याने औरंगाबादेत संतापाची लाट पसरलेली आहे.