औरंगाबाद (Aurangabad) : शहानुरमिया दर्गाचौक, संग्रामनगर उड्डाणपूल ते गोदावरी-टी (Sangram Nagar To Godavari Tea Point) हा बीड वळण रस्त्याला जोडणारा एकमेव महत्त्वाचा पर्यायी मार्ग ६ फेब्रुवारी पासून पुढील महिनाभर बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलिस आयुक्तांनी काढली आहे. या निर्णयाचा फटका नागरिकांना तर बसणारच आहेच, पण दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे.
बीड बायपासवरील हायब्रीड ॲन्युईटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेले सदोष डिझाईननुसार होत असलेले रुंदीकरण, सेवा रस्ते व अंडरपासच्या बांधकामावर 'टेंडरनामा'ने सातत्याने प्रहार केला. विशेष म्हणजे गोदावरी-टी जवळील सदोष उड्डाणपुलाबाबत सातत्याने वाचा फोडली. मात्र 'झाकली मूठ कोट्यवधीची' अशा यंत्रणेच्या कारभाराने गत शनिवारी गोदावरी टी पाॅईंट उड्डाणपुलाखाली मोठा चक्काजाम झाला होता. यावर वाचा फोडताच आता कारभाऱ्यांनी ऐन परिक्षेच्या काळातच चुकीची शिक्षा सातारा - देवळाई - बीड बायपाससह औरंगाबादेतील दहावी - बारावीच्या विद्यार्थांना दिली आहे.
त्यामुळे देवळाई चौक, संग्रामनगर एमआयटी उड्डाणपुलाखालील रस्त्यांचे एका बाजुने कामे करा दुसरी बाजु खुली ठेवा, अन्यथा परिक्षाकाळानंतर कामे सुरू करा , पोलिस आयुक्तांनी अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी औरंगाबादकर करत आहेत.
संग्रामनगर उड्डाणपुलाच्या सदोष डिझाईननुसार होत असलेल्या अंडरपासमुळे गत शनिवारी येथे मोठा चक्काम झाला होता. यानंतर संबंधित यंत्रणेला सवाल करताच सां. बां. विभागांतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखेचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांनी थेट पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांना थेट पत्र दिले. पत्रात भंडे यांनी हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत सुरू असलेल्या बीड वळण रस्त्याचे रुंदीकरण, सेवा रस्ते, व्हेईकल अंडरपाससह बांधकाम तसेच गोदावरी टी जवळील उड्डाणपुलाखाली व संग्रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण करणे असल्याने सदर उड्डाणपुलावरील वाहतूक वळविण्यासाठी विनंती केली.
नागरिकांची सुरक्षा; परिक्षेचे काय
प्राप्त झालेल्या पत्रानुसार भंडे यांचे मुद्दे जोडत पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी नागरिकांची सुरक्षितता, जिवितास धोका, वाहतुकीला अडथळा किंवा कोंडी होऊ नये म्हणून सेवारस्ते, उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद करण्याची खात्री त्यांना पटली. यावर महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ अधिनियम २२ चे कलम ३३८ (१) (ब) तसेच सह मोटार वाहन कायदा १९८८ (५९) ११५ व प्राप्त अधिकाराने वाहतुकीची अधिसूचना काढली. त्यानुसार शहानुरमिया दर्गाचौक, संग्रामनगर उड्डाणपुल ते गोदावरी टी हा बीड वळण रस्त्याला जोडणारा एकमेव महत्त्वाचा पर्यायी मार्ग ६ फेब्रुवारी पासून महिनाभर बंद राहण्याची सक्ती केली.
मात्र ही अधिसूचना काढताना येत्या काही दिवसात दहावी , बारावीच्या परिक्षा आहेत. दरम्यानच्या काळात या भागातील विद्यार्थांना बीड वळण मार्गावरून शहरासह आसपासच्या भागात ये - जा करावीच लागणार आहे. त्यामुळे ऐन परिक्षांच्या काळात यंत्रणेच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना का असा सवाल आता पालकांमधून होत आहे.
अशा केल्या सूचना
- यात सातारा - देवळाई व बीड बायपासकरांनी देवळाई चौकापासून शिवाजीनगर रेल्वेगेटमार्गे शहानुरमिया दर्गाहकडून शहरात ये - जा करावी अशी सूचना केली. मात्र बीड वळण मार्गाकडून शहरात ये - जा करण्यासाठी संग्रामनगर आणि रेल्वेस्टेशन उड्डाणपूल हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फाटकावर आता लाखो लोकांचा कोंडी वाढणार
- बीड वळण मार्गावरील हाॅटेल रेडूनस्क्युज शेजारून संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाशेजारील देवानगरी भुयारी मार्गाने ये - जा करावी
- बीड वळण मार्गातील महुनगर टी पाॅईंट - उस्मानपुरा -शहानुरमिया दर्गाह चौकाकडे जातील
- महानुभाव आश्रम - रेल्वेस्टेशनचौक - हाॅटेल विट्सचौकाकडून उस्माणपुर्याकडे वाहने जातील. यात मात्र पोलिस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.
असा होईल परिणाम
तब्बल एक महिना निम्मा बीड वळणमार्ग बंद ठेवल्याचा फतवा काढल्याने याभागातील कामगार, नौकरदार वर्गावर याचा मोठा परिणाम होऊन जीवनावश्यक गरजा पुरवणारा व्यापारवर्ग यावर देखील मोठा परिणाम होणार आहे. हक्कासाठी लढणाऱ्या सातारा - देवळाईकरांना सदोष कामातून इतकी मोठी शिक्षा देणारा कोण? याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन पुढे मतदानाचा हक्क बजावतांना विचार करावा, अशी चर्चा या भागात जोर धरू लागली आहे.
दोन्हीही मार्गांकडे पालिकेचे दुर्लक्ष
● बीड वळण मार्गावरील सातारा - देवळाई , बाळापुर गांधेली , चिकलठाणा, मुकुंदवाडी शिवारातील नागरिकांना रेल्वेरूळाचा मोठा अडसर आहे. वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत आणि या भागातील रहिवाशांचा दक्षिण - उत्तर प्रवास सुसह्य व्हावा , यासाठी रेल्वेरूळवरून पादचारी पुल, भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांची संख्या वाढविने गरजेचे आहे. या बांधकामासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारचा नियोजनशुन्य कारभार आणि समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
● जयभवानीनगर चौक ते बीड वळण मार्ग, झेंडा चौक ते विश्रांतीनगर , झेंडाचौक ते बाळापुर रेल्वेगेट ते बीड वळण मार्ग , बीड वळण मार्ग ते खडीरोड - देवळाई - सोलापुर - धुळे हायवे, जालनारोड ते शहानुरमिया दर्गाह ते सातारा - विटखेडा - पैठण डीपीरोड , देवगिरी महाविद्यालयासमोरून ते थेट निर्लेप कंपनी दरम्यान रेल्वे उड्डाणपुल ते बीड वळण मार्ग, बाळापुर, चिकलठाणा, शिवाजीनगर, फुलेनगर, पैठणरोड भुयारी मार्ग, चिकलठाणा रेल्वेस्टेशन ते औरंगाबाद मुख्य रेल्वेस्टेशन दरम्यान रेल्वे रूळानजीक असंख्य वसाहतींचा बोजवारा वाढलेला आहे. त्यासाठी पादचारी पुलांची मोठी आवश्यकता आहे.
घोषणांचा पाऊस , अंमलबजावणीचा दुष्काळ
चाळीस वर्षात कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याच्या घोषणांचा पाऊस आजी - माजी लोकप्रतिनिधींकडून पाडला गेला. मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ दिसतो. महापालिका, रेल्वे आणि केंद्र व राज्य शासन या - भागातील नागरिकांच्या अडचणी बघण्यास तयार नसल्याने दक्षिणेकडून उत्तरेकडे जुन्या व नव्या शहराला जोडणारी वाट अजूनही बिकटच आहे.