औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन - 2 कडून हाॅटेल दिपाली ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यात संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप माजी नगरसेवक बालाजी मुंढे यांनी केला आहे. विशेष म्हणजे पावसाळा तोंडावर असताना या रस्त्याच्या बांधकामातील टेंडरमध्ये भूमिगत गटारीचा समावेश असताना ठेकेदाराने त्या कामास मुहूर्त न लावल्यामुळे जयभवानीनगर वासियांना पूराचा धोका असल्याचे मुंढे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता राजीव संधा यांना विचारणा केली असता काही तांत्रिक कारणामुळे कामात विलंब झाला असेल, पण आता काम प्रगतीपथावर आहे. फूटपाथचे काम झाल्यावर भूमिगत गटारीचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्ता बांधकामासाठी शासन अनुदानातून मिळालेल्या १५२ कोटीतून १४ कोटी रूपये मंजुर झाले आहेत. २०२१मध्ये सदर रस्ता बांधकामाचा ठेका औरंगाबादच्या गुरूनानक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने योग्य जागी योग्य फलक लावले नसल्याने रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आठ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार घरी जाण्यासाठी जयभवानीनगरकडुन विश्रांतीनगरकडे निघाला असताना येथील रस्त्याच्या मधोमध दुभाजकाच्या खोदलेल्या कामात पडल्याने तो जखमी झाल्याचे येथील मारोती सुदामे यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण काम होत आहे. या मार्गावर पावसाचे पाणी साचू नये यासाठी एका बाजूने पालस्टे हाॅस्पीटल ते शिवाजी चौक जयभवानीनगर नाला, तसेच मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन ते जयभवानीनगर नाल्याला जोडणाऱ्या भूमिगत पाईपलाइनच्या कामाचा टेंडरमध्ये समावेश आहे. मात्र,पावसाळा तोंडावर असताना अद्याप ना पाईप आणले, ना खोदकाम केले. परिणामी रस्त्याची उंची वाढल्याने आणि दोन्ही बाजूने उतार असल्याने अनेक वसाहतीतून वाहत येणारा पूराचा लोढा जयभवानीनगरातील गल्लीबोळात शिरल्यास धोका निर्माण होईल, असे माजी नगरसेवक मुंढे यांचे मत आहे.
त्यात सिडको एन - २ आणि एन - ३ , एन - ४ च्या मध्यभागातून गेलेल्या या रस्त्याला जोडणाऱ्या अनेक अंतर्गत वसाहतींच्या जोड रस्त्यांचे काम देखील बाकी आहे. ज्याठिकाणी काम केले तेथे नव्या आणि जुन्या रस्त्याची लेव्हल न जोडता ढोबळमानाने काम करून टेमकाडे तयार केली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे तळे साचणार असल्याचा आरोप मनोज बोरा यांनी केला आहे.
रस्त्याला योग्य उतार न दिल्याने व काँक्रिटीकरण करताना व्हायब्रेशनने पुरेशी दबाई केले नाही. यामुळे नेहमीप्रमाणे पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे, असे राहुल इंगळे यांनी सांगितले. त्यातच फूटपाथच्या सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावले नसल्याने ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेेल्या चार महिन्यात दहाहून अधिक अपघात झाले आहेत. काही ठिकाणी भूमिगत पाईपांचे चेंबर तयार करण्यात आले आहे. पण त्यावर अद्याप ढापे टाकले नसल्याने अपघाताचा दुहेरी सामना करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्याचे संपूर्ण सर्वेक्षण करून, संबंधित ठेकेदाराला तातडीने अपघात होऊ नयेत यासाठी जेथे काम सुरू असेल तेथे बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात येतील व आवश्यक तेथे उपाययोजना केल्या जातील, असे कार्यकारी अभियंता राजीव संधा यांनी सांगितले.