औरंगाबाद (Aurangabad) : जालना रोडच्या उतरेला एकाच रांगेत असलेल्या मेरिडियन लाॅन्स, भारत बाजार आणि प्रोझोन मॉल या बड्या व्यापारी संकुलासमोर चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यात आता एमआयडीसी जलधारा हाऊसिंग सोसायटीलगत जलकुंभासमोरच महापालिकेच्या शेकडो टॅकरची भर पडली आहे. 'टेंडरनामा'च्या पाठपुराव्यानंतर पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी प्रत्यक्षात कारवाईचे नाटक केल्यामुळे या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे.
पोलिसांकडून कारवाईचा देखावा
पोलिस आयुक्त गुप्तांच्या आदेशानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेच्या वतीने भारत बाजार व्यापारी संकुलासमोर केवळ दिखाव्यापुरती वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी वाहतूक शाखेच्यावतीने तेथे 'नो एन्ट्री'चा फलक देखील लावला. मात्र, अद्यापही चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर कारवाई होत नाही. त्यात प्रोझोन माॅल आणि मेरिडीयनला अभय देण्यात येत असल्याने वाहतुकीला कायम अडथळा येत असल्याचे दिसते.
दोन लाख वाहनधारक त्रस्त
चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीच्या वाहनांची वाहतूक देखील सातत्याने सुरू असते. प्रोझोन मॉल आणि त्याच्या अलीकडे असलेल्या भारत बाजार व्यापारी संकुल आणि मेरिडीयन लाॅनसमोर सध्या पार्किंगच्या त्रासामुळे वाहनधारक त्रस्त आहेत.
काय आहे अडचण?
चिकलठाणा एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये मोठ्या अवजड वाहनांची मालाची ने-आण करण्यासाठी वाहतूक सुरू असते. मोठा कंटेनर किंवा ट्रक आल्यास रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांमुळे या अवजड वाहनाला जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. याशिवाय गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते.
पोलिसांची अर्धवट कारवाई
'टेंडरनामा'च्या पाठपुराव्यानंतर पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या आदेशानंतर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने व एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या वतीने भारत बाजारासमोर रस्त्यावर चारचाकी व दुचाकी उभी केल्यास त्यावर पाचशे रूपयाचा दंड वसुल केला जात आहे. मात्र, फुटपाथवर उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत नसल्याचे दिसून येते. याचबरोबर मेरिडीयन आणि प्रोझोन माॅल या बड्यांवर व्यावसायिक मॉलवर कुणाच्या दबाबाखाली कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.