औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याआधीच नालेसफाईचा (Drainage Cleaning) गवगवा करण्यात आला. खाजगी ठेकेदारामार्फत दरवर्षी नालेसफाईवर जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये खर्च केले जात असत. त्यानंतरही पावसाचे पाणी साचून औरंगाबाद तुंबत असे. त्यामुळे नालेसफाईच्या कामात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीवर लगाम लावण्याठी महापालिका प्रशासकांनी यंदा महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच नालेसफाईचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या या उद्दात्त हेतूलाच कारभाऱ्यांनी कसा हरताळ फासला, हे जरा प्रशासकांनी स्वतःच्या कक्षाची खिडकी उघडून नूर काॅलनीच्या नाल्याकडे पाहिल्यास स्पष्ट होईल.
म्हणे दोन कोटींची झाली बचत
शहरात सर्वत्र नालेसफाई झाल्याचे सांगत यंदा एक कोटी ८७ लाख ५५ हजाराची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केल्यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने शहरातील मोठ्या नाल्यांची पाहणी केली असता नाल्यात गाळ कचरा आणि त्यात पाणी साचून नाले तुंबल्याचे चित्र दिसले. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका प्रशासकांच्या कक्षाबाहेरील नूर काॅलनीचा नाला साफ केलाच नसल्याचे चित्र अद्यापही कायम आहे. यामुळे नेहमीप्रमाणे नालेसफाईवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे 'टेंडरनामा'च्या तपासात उघड झाले आहे.
प्रशासकांच्या उद्देशाला हरताळ
औरंगाबाद महापालिकेकडून मागील वर्षी नालेसफाईवर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर या वर्षी केवळ एक कोटी ७ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागील वर्षी ३ कोटी रुपये खर्च केल्यानंतरही नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. जयभवानीनगर, बारूदगर नाला, खाम व सुखना नदीसह मुकूंदवाडी, नूरकाॅलनी भागात दरवर्षी पाणी साचते. गेल्या वर्षी गारखेडा, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, हर्सुल, नारेगाव , चिकलठाणा, विटखेडा, नक्षत्रवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, उस्मानपुरा, जवाहर काॅलनी, बेगमपूरा, जयसिंगपुरा, गरमपाणी भागातही पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही औरंगाबादेत नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचे म्हणत महापालिका कारभाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला होता.
तीन महिन्याअगोदरच नाले सफाई
मागचा अनुभव पाहता ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिलिभगत टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तीन महिन्याअगोदर अर्थातच २१ मार्च पासूनच शहरातील मोठ्या नाल्यांधील गाळ काढायला सुरवात केल्याचा दावा केला होता. कमी खर्चात अधिक चांगल्या पद्धतीने नाले सफाईला सुरवात केल्याचे प्रशासकांनी जाहीर केले होते. दरम्यान नालेसफाईच्या कामावर 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित करताच नालेसफाई संथगतीने व थातूरमातूर सुरू असल्याचे उघड करताच प्रशासकांनी जास्त मशिनरी लावण्याचे आदेश दिले होते. नालेसफाईचे काम पारदर्शक पद्धतीने केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
कोट्यवधींचा दाखवला खर्च
या वर्षी नालेसफाईच्या कामासाठी सर्व मशिनरी महापालिकेच्या मालकीची दाखवण्यात आली आहेत. त्यात ६ जेसीबी, ४ पोकलॅन, ९ टिप्पर, ३ हायवा अशी एकूण २२ वाहने दाखवण्यात आली आहेत. त्या वाहनांवर २२ वाहनचालक दाखवण्यात आले आहेत. एकूण खर्च ७६ लाख ४५ हजार ८१० रुपये लागल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. त्यानंतर प्रशासकांनी २ जून रोजी झालेल्या एका बैठकीत नालेसफाईच्या कामावर नाराजी व्यक्त केली असता कारभाऱ्यांनी मशिनरी कमी असल्याचे सांगत त्यावर पुन्हा १० ट्रॅक्टर आणि ९ जेसीबी भाड्याने घेत २१ लाखाचा खर्च वाढवला. यात शंभर दिवस सुरू असलेल्या नालेसफाईवर एकूण एक कोटी ७ लाख ४५ हजार ८१० रुपये खर्च झाल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे.
असा आहे महापालिका प्रशासनाचा दावा
एवढी मशिनरी भाड्याने घेतली असती तर टिप्पर व हायवा यांना प्रति दिवस ७ हजार रुपये भाडे द्यावे लागले असते. त्याचा खर्च १ कोटी १४ लाख ४८ हजार रुपये इतका आला असता. जेसीबीसाठी १० हजार रुपये प्रतिदिवस प्रमाणे ६१ लाख ३३ हजार ५० रुपये खर्च आला असता. पोकलॅनसाठी प्रतिदिवस २० हजार रुपये प्रमाणे ८७ लाख ६१ हजार रुपये खर्च आला असता. एकूण साधारणतः २ कोटी ६४ लाख रुपये खर्च आला असता. मात्र महापालिकेने स्वतःची यंत्रणा वापरल्याने एक कोटी ८७ लाख ५५ हजार रुपयांची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे.
किरकोळ पाऊस करतोय पोलखोल
कोट्यवधी खर्च केल्यानंतर औरंगाबादेत किरकोळ पाऊस झाला तरी रस्ते पाण्याखाली येतात. नालेसफाईच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा होतो. करदात्या नागरिकांचा पैसा नालेसफाईच्या नावाने कुणाच्या घशात घातला जातो हा संशोधनाचा विषय आहे. मुसळधार पाऊस झाल्यास औरंगाबादेत काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना न केलेलीच बरी.