औरंगाबाद (Aurangabad) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे 'माझी वसुंधरा अभियान २.०' अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित विकासाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धत अमृत शहरांच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल औरंगाबाद महानगरपालिकेला जागतिक पर्यावरण दिनानिमित रविवारी मुंबईतील कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (Aurangabad Municipal Corporation News)
औरंगाबाद महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित विविध प्रकल्प, कामे यशस्वीपणे करून दाखविली. महापालिकेने केलेल्या कामगिरीची दखल घेत आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक व आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी इतर अधिकारी व भागधारकांसोबत हा पुरस्कार स्विकारला.
आपल्याला उपलब्ध पर्यावरणाचे संवर्धन व भविष्यासाठी पर्यावरण पूरक पाऊल उचलणे आवश्यक बनले आहे. हे साध्य करण्यासाठी बहुआयामी रणनीती सातत्याने राबवली गेली पाहिजे. मनपा प्रशासन स्वच्छता ठेवून, ग्रीन कव्हर वाढवून, ऊर्जा आणि अन्य नैसर्गिक संसाधने वाचवून अशा विविध प्रकारे माझी वसुंधरा मोहिमेला पूरक ठरत आहे. मात्र नागरिकांचा, विविध शैक्षणिक संस्थांचा व स्थानिक उद्योगांच्या सहकार्यानेच या सर्व परिश्रमाला यश देऊ शकते. माझी वसुंधरा पुरस्कार शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त