औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटीप्रकल्पांतर्गत ३१७ कोटींच्या १०८ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते कसे तयार करावेत, त्याची गुणवत्ता तपासणीचे काम मुंबईच्या आयआयटी संस्थेला देण्यात आले आहे. यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीप्रकल्पातून जीएसटीसह तब्बल एक कोटी ६६ लाख रूपये खर्च होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या टेंडरनामाशी बोलताना सांगितले.
औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील १०८ रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार ए. जी. कन्सट्रक्शनची निवड केली आहे. कंपनीला वर्क ऑर्डरसुध्दा देण्यात आली आहे. कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात ड्रोन कॅमेरा आणि गुगल मॅपिंगद्वारे रस्त्यांची मोजणी केली आहे. स्मार्ट सिटीचे सीईओ तथा महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्ते बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबईच्या आयआयटीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी जवळपास एक कोटी ६६ लाख रूपये स्मार्ट सिटी प्रकल्पातून खर्च होणार आहे.
प्रकल्प सल्लागार कोण?
मात्र या रस्त्यांच्या डे टू डे तपासणीसाठी प्रकल्प सल्लागार अर्थात पीएमसीची अद्याप नियुक्ती केलेली नसल्याचे टेंडरनामाच्या तपासात पुढे आले आहे. नेहमीप्रमाने समीर जोशी यांच्या यश इनोव्हेटीव्ह प्रा. लि. यांनीच शहरातील भूमिगत गटार योजना तसेच जवळपास साडेतीनशे कोटींच्या कामाची जबाबदारी पार पाडली असल्याने या कामासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून त्यांचीच नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास यावर देखील तीन ते चार कोटी खर्च स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करावा लागेल असा अंदाज वर्तविला जात आहे.