Aurangabad: एकीकडे गाजावाजा अन् दुसरीकडे क्रीडा संकुलाचा खेळखंडोबा

गरवारे क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचा गाजावाजा
Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : ‘स्मार्ट सिटी आणि पर्यटन नगरीच्यादृष्टीने औरंगाबाद शहरातील क्रीडा सुविधा अत्याधुनिक असणे गरजेचे आहे. त्यादृष्टिने गरवारे क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. रणजी ट्रॉफीच नव्हे तर आयपीएलसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचे सामने औरंगाबादेत होतील असे क्रिकेट स्टेडियम उभारू,’ अशा बाता देखील मारल्या गेल्या. मात्र, याच क्रीडासंकुलाच्या पॅव्हेलियन आणि त्याखालील असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारत, इनडोअर हाॅलसह वस्तीगृहाची झालेली बकाल अवस्था पाहता, हेच का तुमचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल असा प्रश्न टेंडरनामा पाहणीत उपस्थित होतो.

Aurangabad
Exclusive : मास्टरमाईंड सुनिल कुशिरेला कोणाचा वरदहस्त?

गरवारे क्रीडा संकुलाची भयाण अवस्था झाली असून, संपूर्ण स्टेडियममध्ये गाजरगवताची शेती बहरली आहे. क्रिकेट मैदान वगळता इतरत्र जागोजागी खड्डे पडले आहेत. क्रीडा संकुलातील मुख्य प्रशासकीय इमारत, पॅव्हेलियन, वसतिगृहाची दैना झाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल बनिवण्याचे स्वप्न हवेतच विरले असून, महापालिकेच्या प्रस्तावांच्या नवनवीन फायलींमुळे जलतरण तलावाचाही खेळखंडोबा सुरू झाला.

Aurangabad
EXCLUSIVE : 'मनी'संधारण भाग 1; महाराष्ट्रातील अलीबाबा आणि 40...

२६ वर्षांचा वनवास

1 लाख 11 हजार 980 चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाचे 6 ऑगस्ट 1997 रोजी औरंगाबाद शहराचे माजी पालकमंत्री तथा परिवहनमंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले होते. या संकुलामुळे औरंगाबादच्या क्रीडाविश्वात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते; परंतु नंतर संकुलाच्या नशिबी वनवास आला आहे. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मैदानात गाजरगवत व रानटी झुडपांची शेतीच जणू बहरली आहे. त्यात पावसाळ्यात पाणी व दलदल वाढल्याने साप, विंचू-काटे, सरडे व बेडके आसपासच्या वसाहतीत शिरतात असे याभागातील नागरिकांनी सांगितले. मैदानावर अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्याने येथे कुठलाही खेळ खेळणे मुश्कील झाले आहे. त्यात क्रीडासंकुलाच्या उर्वरित जागेवर जलकुंभाचे बांधकाम सुरू केल्याने खेळाच्या मैदानाची व्याप्ती कमी झालेली आहे. 

Aurangabad
Aurangabad : जनतेसाठी झटणाऱ्या पीडब्लूडी अधिकाऱ्यांना शिक्षा?

जलतरण तलावाच्या गटांगळ्या

2007-08 मध्ये क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्याच्या प्रस्तावावर टेंडर काढण्यात आली. तब्बल अडीच कोटी रुपयांचे बजेट या तलावासाठी ठरविण्यात आले. 78 लाख रुपये बांधकाम करण्यात घालवण्यात आले; परंतु त्यानंतर मध्येच मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढून व मनपाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण सांगून पुढील काम थांबवण्यासाठी एक परिपत्रक काढले. तेव्हापसून हा जलतरण तलाव अर्धवट राहिला आहे.

मुख्य प्रशासकीय इमारत ‘बाद’

संकुलात पॅव्हेलियनखाली असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीची दुर्दशा झाली आहे. येथील मुख्य अतिथी सभागृहाची व अन्य खोल्यांची दारे तुटली आहेत. खिडक्यांच्या काचा फुटून त्याची खच तिथेच कित्येक दिवसांपासून पडून आहे. याशिवाय धूळ आणि कचऱ्याचा ढीगही येथे कायम असतो.

Aurangabad
Aurangabad : डीपीआरच्या बिलासाठी प्रकल्प सल्लागाराचे उपोषणास्त्र

वसतिगृह झाले भंगाराचे गोडाउन

शहराबाहेरील स्पर्धकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून बहुमजली वसतिगृह उभारण्यात आले. मात्र, येथील दारे-खिडक्याही शाबूत राहिलेल्या नाहीत. वसतिगृहाची संपूर्ण इमारत गाजरगवताने घेरली आहे.त्यात महापालिकेच्या विद्युत विभागाने आत-बाहेर भंगाराचे गोडाऊन केले आहे. हे कमी म्हणून की, काय शहरभरातून जप्त केलेल्या भंगार वाहनांचा ताबा मैदानाची शोभा घालवत आहे. वसतिगृहाच्या आणि रखडलेल्या जलतरण तलावाच्या चौफेर अशी स्थिती असल्याचे  खेळाडूंना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिणामी पार्किंगच्या जागेवर खेळाडूंना प्रॅक्टिस करावी लागत आहे.

पॅव्हॅलियनवर खड्डे

संकुलातील दोन्ही बाजूला असलेले पॅव्हेलियनचीही खड्डेमय अवस्था झाली आहे. पॅव्हेलियनच्या खालील चेंजींग रूमची तर व्यथा मांडायलाच नको. येथील स्वच्छतागृहांची दारे-खिडक्या गायब झाल्या आहेत. या स्वच्छतागृहांना भगदाडे पडली आहेत. या ठिकाणी सर्वत्र कचराच कचरा पडलेला असतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com