औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-दोन परिसरातील जयभवानीनगर नाला बांधकामातील घोटाळा 'टेंडरनामा'ने उघड करताच या भागातील माजी नगरसेविका मनिषा बालाजी मुंढे यांनी महापालिका प्रशासक आस्तीककुमार पांण्डेय यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नाला बांधकाम अर्धवट असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी आणि शाखा अभियंता अनिल तनपूरे यांनी ठेकेदार शेख माजीद यांना कोणत्या खुशीत दोन वेळा बिल दिले. यासंपुर्ण नालेबांधकामाची चौकशी करण्यात यावी. येणाऱ्या मॉन्सूनपूर्वी नाल्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 'टेंडरनामा'ने यासंदर्भात ३० मे रोजी जयभवानीनगर नाल्याच्या कामासाठी नव्या ठेकेदाराचा शोध सुरू या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
औरंगाबादेतील सिडको एन-पाच टाऊन सेंटरमधील जळगाव रोड ते कॅनाॅट गार्डन ते जालनारोड खालुन एन-तीन, एन-४ मधुन जयभवानीनगर या गजबजलेल्या वसाहतीतून सदर नाला मुकुंदवाडी ते चिकलठाणा हद्दीतील एका ओढ्याला मिळुन थेट सुखना नदीला जाऊन मिळतो. प्रत्येक पावसाळ्यात सिडको-हडकोतील अनेक वसाहतींचे पाणी या उघड्या नाल्याला येऊन मिळत असल्याने पावसाळ्यात नाला दुधडी भरून वाहतो. नाल्याच्या काठालगत दोन्ही बाजुला शेकडो घरे असल्याने प्रत्येक पावसाळ्यात धोका निर्माण होत असे. त्यात अनेक ठिकाणी नालाच गिळंकृत केल्याने नाल्यातील पूराचे पाणी अनेकांच्या घरात शिरूण संसाराचे पार वाटोळे होत असे.
नाला बांधकामाकडे दुर्लक्ष
गेल्या अनेक वर्षांपासून याभागातील नागरिक या पडक्या नाल्याच्या सुरक्षाभिंतीचे काम करण्यात यावे, नाल्यावर ढापे किंवा लोखंडी जाळी टाकण्यात यावी, तसेच नाल्यावर पादचारी आणि वाहनांसाठी आरसीसी रहदारी पूल बांधण्यात यावेत यासाठी मागणी करत होते. मात्र त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी कधीही लक्ष दिले नव्हते.
एकाचा बळी; अधिकाऱ्यांची पळापळी
याच उघड्या नाल्यात गत चार वर्षांपूर्वी आलेल्या पूरात भगवान मोरे नामक मजुराचा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग आली. २०१७ - १८ मध्ये नाला बांधकामासाठी एक कोटी ६० लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार टेंडर काढुन बीडच्या शेख माजीद नामक ठेकेदाराला याकामासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली.
२० टक्के जादा दराने कामृ
विशेष म्हणजे दाट वसाहतीतून नाला गेल्याने अडचणीच्या ठिकाणी ठेकेदाराला मशिनरीने काम करता येणार नाही. मनुष्यबळाचा अधिक वापर होईल. परिणामी मजुरीत वाढ होईल. ठेकेदाराच्या खिशाला झळ पोहोचू नये, यासाठी वीस टक्के जादा दराने टेंडर प्रकाशित करण्यात आले होते.
ठेकेदार-अधिकाऱ्यांची मिलिभगत
मात्र जिथे जिथे नाला मोकळा व मशिनरी जाण्यास अडचण नव्हती तिथे ठेकेदाराने नाल्याचे बांधकाम केले. मात्र अडचणीच्या ठिकाणी अर्धवट बांधकाम सोडुन त्याने यंत्रणा पसार केली. असे असताना अधिकाऱ्यांनी त्याला दोन टप्प्यात ८० लाख रूपये दिले. मात्र चार वर्ष उलटल्यानंतर देखील हे काम अद्यापही अर्धवट असल्याने जयभवानीनगरला पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे भागातील नागरिकांच्या संताप व्यक्त करत आहेत.
प्रकरण 'टेंडरनामा'कडे
या नाल्याचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यावर नागरिकांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली प्रतिनिधीने गुरूवार ते शुक्रवार सलग दोन दिवस सिडको एन-३, एन-४ व जयभवानीनगरपर्यंतच्या नाल्याची परिक्रमा केली. त्यात अंदाज पत्रकामध्ये नमूद बांधकाम साहित्य वापरण्यात आले नाही. गज, सिमेंट आणि रेती हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात नाल्यातील बेड काॅक्रीट वाहून गेल्याचे दिसले. संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून याप्रकरणाची वाच्यता होऊ न देता, थातूर-मातूर दुरुस्ती करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, विकास कामामध्ये भ्रष्टाचार होऊन जनतेच्या पैशाचा अपहार केला आहे. संबंधित ठेकेदाराविरुद्ध व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही मुंढे यांनी दिला आहे.
पूर आल्यास उद्भवणार संकट
येथे चार वर्षांपूर्वी नाला बांधकाम करण्यात आले ; मात्र अर्धवट काम सोडुन ठेकेदार पसार झाला आहे. त्यामुळे यापुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर संकट कोसळणार असल्याचे बोलले जात आहे.