औरंगाबाद (Aurangabad) : इपीसी हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत कोट्यावधी रूपये खर्च करून बीड वळण रस्त्याचे रूंदीकरण, सेवा रस्ते आणि तीन मोठ्याउड्डाणपुलांसह काही छोट्या पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान, संग्रामनगर चौकातील अंडरपासची उड्डाणपुलाच्या कठड्यापर्यंत उंची कमी झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत जागतिक बँक प्रकल्प शाखेने अंडरपास खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला. अंडरपासचे भुयारीमार्गात रूपांतर केले.
संग्रामनगर चौकाच्या हाकेच्या अंतरावरील आमदाररोडचा लचका तोडत तेथे अपघाताचा घाट तयार केला. पुलाखालचे मुख्य रस्ते खोदण्यात आले. त्यात संग्रामनगर चौकापासून ते थेट देवानगरी उड्डाणपुलाच्या धावपट्टीपर्यंत खोदकाम सुरू केले. सदर खोदकाम हे बेकायदेशीर होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रच औरंगाबादेतील एका ज्येष्ठ वकिलांनी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना दिले आहे. आता प्रशासक यावर काय निर्णय घेतात, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष आहे.
महापालिकेचे कोट्यावधीचे नुकसान, सामान्यांना नाहक त्रास
या खोदकामामुळे महापालिकेचे कोट्यावधीचे नुकसान व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, केंद्र सरकारच्या भारत गॅस रिसोर्स कंपनीच्या वतीने शहरात गॅसपाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम दिल्ली येथील विचित्रा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे. सरकारी प्रकल्प असताना देखील महानगरपालिकेने संबंधितांकडून खोदकामाकरिता १३ हजार आठशे रूपये पर रनींग मीटर प्रमाणे रस्ता दुरूस्ती शुल्क व सुरक्षा अनामत रक्कम वसुल केली आहे. दुसरीकडे मात्र दिवसाढवळ्या जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, उप अभियंता शैलेश सुर्यवंशी, शाखा अभियंता सुनिल कोळसे यांच्या निगराणीत कंत्राटदार जी.एन.आय कंन्स्ट्रक्शन कंपनीला विनाशुल्क कसे काय खोदकाम करत आहे, असेही त्यांचे म्हणने आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, होय आम्ही संबंधितांना परवानगी दिलेली नाही. ते विनापरवाना खोदकाम करत आहेत. यामुळे त्यांना नोटीस देखील बजावण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
अधिकारी बेफिकीर, महापालिका प्रशासकांचे दुर्लक्ष का?
बीड बायपास संग्रामनगरचौक ते देवानगरी उड्डाणपुलाच्या धावपट्टीपर्यंत काॅक्रीट रस्त्याच्या नावाखाली दोन ते तीन मीटर अर्थात दहा ते बारा फुटापर्यंत खोदकाम करून संग्रामनगर चौकातील अंडरपासची उंची वाढवण्यात इकडे देवानगरी उड्डाणपुलाकडे उतार करून उंची कमी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देवानगरी उड्डाणपुलाचा डीपीआर रेल्वे प्रशासन आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे, त्यांच्या देखील मार्गदर्शक सुचना घेतल्या नसल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रस्ते सुरक्षा समितीला देखील अंधारात ठेवले गेले. धक्कादायक म्हणजे संग्रामनगर चौकापासून देवानगरी उड्डाणपुलाच्या खोदकामानंतर अंडरपासचे काम झाल्यावर इतक्याच प्रमाणात आमदार रस्त्याचे खोदकाम केले जाणार आहे. यानंतर भुमिगत गटारीसाठी जवळपास बाराशे मीटर खोदकाम होणार आहे. सद्यःस्थितीत होत असलेले खोदकाम विनापरवाना आहे. शहरअभियंता आणि महापालिका प्रशासकांना कोणतीही कल्पना न देता इकडे खोदकाम उरकले जात असून, याकडे संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
खातरजमा करूनच तक्रार
ज्येष्ठ विधिज्ञ महेश कानडे यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना पत्र देण्याआधी त्यांनी शहरअभियंता कार्यालयात या रस्त्याच्या खोदाईची परवानगी घेण्यात आली आहे काय याची खातरजमा केली. त्यावेळी विनापरवाना या रस्त्याची खोदाई करण्यात येत असल्याचे दिसून आले. यानंतरच त्यांनी प्रशासक चौधरी यांच्याकडे तक्रार केली. त्यात या संपुर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
अपघातासाठी ब्लॅक स्पाॅट होणार
आमदाररोड या अरूंद रस्त्यापासून बीड बायपास संग्रामनगर चौक ते देवानगरी रेल्वे उड्डाणपुलापर्यंत थेट दहा ते बारा फुटाचा अंडरपासचा उतार होत असल्याने पावसाळ्यात अपघातास कारणीभूत बनणारा ब्लॅक स्पाॅट तयार होणार आहे. बीड बायपासची ३० मीटर हद्द सोडून पुढे देवानगरी उड्डाणपुलापर्यंत महापालिकेची हद्द असताना याकडे महापालिकेच्या झोन किंवा संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष का देत नाहीत, असा सवाल करत त्यांनी विनापरवाना खोदकाम करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ते करत आहे.