औरंगाबाद (Aurangabad) : शहरात २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान G-20 परिषदेसाठी विविध राष्ट्राचे प्रतिनिधी येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी शहरातील उड्डाणपुलांच्या भिंतीवर रंगरंगोटी आणि आकर्षक चित्रे काढण्यात आली होती. यामुळे उड्डाणपुलांची कधी नव्हती ती शोभा वाढली होती. मात्र, रंगरंगोटी आणि चित्र काढल्यानंतर औरंगाबादच्या रस्त्यांची वाट लावणाऱ्या 'जीएनआय' इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा नेहमीप्रमाणे हलगर्जीपणा भोवला आणि या चांगल्या कामाचीही वाट लावली.
टेंडरनामाच्या वृत्तानंतर संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले. मात्र, भर उन्हात नव्याने रंगरंगोटी करणाऱ्या व चित्र रेखाटणाऱ्या कलावंतांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. शिवाय रंगरंगोटी करणाऱ्या दुसऱ्या ठेकेदाराला देखील मोठा आर्थिक फटका बसला असून, मानसिक ताप सोसावा लागत आहे.
G-20 निमित्त रस्त्याचे काम करणाऱ्या जीएनआय कंपनीने रंगरंगोटी झाल्यावर डांबरीकरणाचे काम सुरू केले. काम करताना सुरक्षेचा उपाय म्हणून रंगरंगोटी खराब होऊ नये यासाठी भिंतींच्या कठड्यांवर पाॅलिथीन अथवा कपडा झाकला नाही. त्याच्या हलगर्जीपणामुळे रंगरंगोटी आणि चित्रांवर डांबराचे काळे फासल्याने शोभा घालवली जात होती. याबाबत ‘टेंडरनामा’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने नव्याने रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे.
महानगरपालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना ही बाब प्रतिनिधीने लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेऊन घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त व नोडल अधिकारी सोमनाथ जाधव यांना नव्याने रंगरंगोटीचे आदेश दिले. जाधव यांनी ठेकेदार प्रशांत पवार यांची विनवनी करत नव्याने रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. सध्या रंगरंगोटीचे काम नव्याने जोमात सुरू असले तरी डांबरीकरणामुळे दुभाजकाची देखील रंगरंगोटी खराब झाली आहे, तेथे कोण दुरूस्ती करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रस्त्याच्या डांबरीकरणासह दुभाजक रंगरंगोटीचे काम जीएनआयकडे आहे. तर पुलांवरील भिंती रंगविण्याचे काम महापालिकेच्या वतीने प्रकाश पवार यांच्याकडे आहे.
चुक जीएनआयची; चटके कलावंतांना
जीएनआयच्या चुकीमुळे पवार कंपनीच्या कलावंतांना भर उन्हात नव्याने काम करावे लागत आहे. यात पवार यांना मोठ्या आर्थिक फटक्यासह मानसिक तापही सोसावा लागत असून, जीएनआयच्या हलगर्जीपणाची शिक्षा कलावंतांना भोगावी लागत असल्याने कलावंतांचे भर उन्हात काम पाहुन औरंगाबादकर संताप व्यक्त करत आहेत.