औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराला किमान चार दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत जलतज्ज्ञांनी विविध प्रकारच्या कंट्रोल व्हॉल्वच्या वापराबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आता शहरात समान पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी महापालिका स्काडा तंत्रज्ञानाचा आधार घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सालाबादप्रमाणे औरंगाबादकरांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत बोर आटल्याने पुन्हा संकटात भर पडते. शहरातील तीव्र पाणी टंचाई आणि त्यामुळे होत असलेली औरंगाबादकरांची होरपळ यावर 'टेंडरनामा'कडून सातत्याने प्रकाश टाकला जात आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावरही 'टेंडरनामा'ने ताशेरे ओढले.
ठाकरे सरकारने संबंधितांचे कान टोचल्यावर राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी तातडीने औरंगाबादेत धाव घेत अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दृष्काळी परिस्थिती दूर करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना निर्देश दिले.
देसाई यांनी केलेल्या सूचनांचे पालन करत पाण्डेय यांनी बहुआयामी रणनीती राबवण्यास सुरवात केली आहे. यात पाण्याची उचल वाढवणे, पाण्याचा अपव्यय, चोरी व गळतीला आळा घालणे, उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे इत्यादी उपाय आखले जात आहेत. त्या अंतर्गत स्मार्ट सिटी कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांसाठी एका विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.