औरंगाबाद (Aurangabad) : जालना रोडवरील सिडको-जळगाव टी पाॅईंट येथे हाेत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सिडको चौकातील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतर करण्याच्या हालचाली औरंगाबाद महापालिकेने सुरू केल्या आहेत.
यापूर्वी २०१४-१५ मध्ये हाॅटेल रामगिरी ते मुकुंदवाडी स्मशानभुमीपर्यंत उभारण्यात आलेल्या जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाच्या बांधकामात अडसर होत असल्याने पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पुतळा मध्यभागी न ठेवता बाजूला ठेवण्यात आला होता. परंतु आता रस्त्याच्या मधोमध पुतळा येत असल्याने चौकात वाहतूकीचा मोठा चक्काजाम होत आहे. याला पर्याय म्हणून महापालिकेने राज्य सरकार आणि शहर वाहतूक शाखा, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य व या समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन रितसर पत्रव्यवहार करूनच हा निर्णय घेतला आहे.
सव्वा कोटीतून होणार स्थलांतर
यासाठी औरंगाबादच्या धीरज देशमुख या वास्तू विशारदामार्फत सविस्तर विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.सिडको उड्डाणपुलाखाली आकर्षक उंच चबुतरा, चहूबाजुंनी हिरवळ, सुशोभिकरण आणि विद्युत रोषणाई यासाठी तब्बल सव्वा कोटीचे अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले आहे.
त्याचवेळी निर्णय झाला असता तर
पूलाच्या बांधकामादरम्यान पुतळा सौंदर्यबेटासह पुलाखाली उभारण्याची मागणी त्यावेळीच बंजारा समाजातील बांधवांनी केली होती. मात्र त्यावेळी महापालिका आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यानेच चौकातील पुतळा बाजुलाच स्थलांतर करत त्यावेळी चबुतरा, सुशोभिकरण, विद्युतीकरण आणि बांधकामावर पाऊन कोटीचा खर्च करण्यात आला होता. तेव्हाच पुतळा पुलाखाली मोकळ्या जागेत स्थलांतर केला असता, तर आज सव्वा कोटी खर्च करण्याची वेळ आली नसती.
नेमके कारण काय?
पुतळा रस्ताच्या आड येत असल्याने तो स्थलांतर करणे गरजेचे आहे. पुलाच्या बांधकामानंतर चारपदरी स्लिप सर्व्हिस रोड झाल्यामुळे हा पुतळा स्लिप रोडसाठी अडथळा ठरत आहे. उड्डाणपुलामुळे सिडकोच्या काळातील जोड रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे जालन्याकडून येणार्या वाहनांसाठी अडचण होत आहे. भविष्यात सुसाट वाहने पुतळ्याला धडकुन काही अनुचित प्रकार घडु नये, वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.