औरंगाबाद (Aurangabad) : तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्या काळात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्प जोमात सुरू झाला होता. दरम्यान शहरातील सेवाभावी संस्था, निसर्ग व पर्यावरण प्रेमी तसेच उद्योजकांसह स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पांण्डेय यांनी केलेल्या विकास कामांची पाहणी नवनियुक्त महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ.अभिजित चौधरी यांनी गत शनिवारी केली. छावनी हद्दीतील लोखंडी पूल ते पानचक्की असा तब्बल चार तासाच्या पदफेरीत त्यांनी पांण्डेय यांनी केलेल्या कामांचा बारकाईने अंभ्यास केला. दरम्यान केलेल्या विकास कामांचे कौतूक करत पांण्डेय यांचे खामनदी स्वच्छता अभियान आणि त्यासंदर्भात प्रकल्पातील अर्धवट व प्रलंबित विकास कामे अशीच पुढे नेऊयात अशी ग्वाही त्यांनी औरंगाबादकरांना दिली.
गेल्या शनिवारी प्रशासक चौधरी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव, प्रभाग क्रमांक-९ चे सहाय्यक आयुक्त असद उल्ला खान, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, इकोसत्वच्या गौरी मिराशी, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. च्या जनसंपर्क अधिकारी अर्पिता शरद व आदित्य तिवारी यांच्यासमवेत प्रकल्पाची पाहणी केली.
असे दिले आदेश
दरम्यान, झालेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष न करता ते अधिक काळ मजबूत राहावेत यासाठी त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती महत्वाची असून त्याकडे अधिक लक्ष देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने त्यासंबंधित तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आदेश त्यांनी पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना दिले.
तत्कालीन प्रशासकांचे केले कौतुक
पाण्डेय यांनी नहरी अंबरी,वाॅल पेंटींग,बटर फ्लाय गार्डन, वृक्ष लागवड, विद्युतीकरण, ओपन जीम,पिचींग, खोलीकरण, रूंदीकरण आदी कामाची पाहणी करत झालेल्या कामाचे कौतूक देखील केले. यानंतर त्यांनी पाणचक्की व परिसरासह हजरत बाबा शाह मुसाफिर दर्गाह व मुसाफीरखानाची पाहणी केली. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी खामनदी प्रकल्पातील सविस्तर विकास आराखड्याची माहिती घेतली. त्यात काही महत्वाच्या सूचना दिल्या.
अशा दिल्या सूचना
● खाम नदीची हद्द ठरवून घ्या, निळी आणि लाल रेषा निश्चित करा.
● या कामासाठी जलसंपदा (इरिगेशन )आणि महानगरपालिका नगररचना आणि महसुल विभागाची मदत घ्या.
● खाम नदीच्या विकास कामाचे डिझाईन तयार करा तसेच नदीच्या कामाचा मेंटेनन्स करण्यासाठी एसटीएफ टीम ची नेमणूक करून या कामावर अंकुश ठेवण्यासाठी एका जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करा. यासाठी व्हॅरॅक कंपनी कडून अतिरिक्त मनुष्यबळ मागून घ्या.
● नदी परिसरात लाॅन तयार करण्याऐवजी दगड, खडी किंवा मुरूमाच्या वापराकडे अधिक लक्ष द्या, इन्व्हायर्नमेंट इंजीनियरिंगचा वापर करून स्टोन पिचिंग करा.
● नदीला जोडणाऱ्या नाल्याचे पाणी नदीत येण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा वापर करून नदीत आली पाहिजे अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी युएनआयए या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने दिलेल्या सल्ल्याचा विचार करावा.
● नदीच्या विकास कामाबाबत वर्किंग कमिटीची बैठक बोलण्यात यावी, खाम नदी पुनर्जीवन विकास कामासाठी भारत सरकार व राज्य सरकार त्यांच्या काही या कामासाठी योजना आहेत का याचीही पडताळणी करावी, आदी सूचना त्यांनी केल्या.