औरंगाबाद (Aurangabad) : महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी माजी शहर सुधार समितीचे सभापती मनोज गांगवे यांच्यासह कार्यकारी अभियंता भागवतराव फड, राजीव संधा, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. ई. पंडीत, उप अभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह प्रभाग अभियंता सुनिल बनकर, राजेश वाघमारे, के.एन. काटकर, बी. के. परदेशी तसेच शाखा आणि कनिष्ठ अभियंता तसेच दुय्यम आवेशक असा बराच मोठा अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन शहरातील नाल्यांची पाहणी केली.
औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तीककुमार पांण्डेय यांनी दरवर्षीप्रमाणे कंत्राटदारामार्फत नालेसफाई न करता यावर्षी महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच पावसाळ्याच्या चार महिन्यांपूर्वीच नाल्यांतून गाळ, कचरा काढायला सुरवात केली होती. यात शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता भागवत फड यांच्या नेत्तृत्वाखाली औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू केली होती. मात्र अधिकार्यांच्या सफाईनंतर नाल्याकाठी राहणार्या काही बेजबाबदार औरंगाबादकरांनी नालेसफाईचा पुन्हा कचरा करून टाकला. यावर महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी सामंजसपणे भुमिका पार पाडत अधिकार्यांना नाले सफाईचे आदेश दिले.
काठावरील गाळ उचला
प्रशासक डॉ. चौधरी आणि शहर अभियंता पानझडे तसेच माजी शहर सुधार समितीचे सभापती मनोज गांगवे यांच्या संयुक्त पाहणीत बर्याच ठिकाणी नाल्यांतून काढलेला गाळ काढावरच ठेवन्यात आल्याने प्रशासकांनी अधिकार्यांच्या कामांबद्दल असमाधान व्यक्त केले असून त्यांनी संबंधित झोन अधिकार्याना पंधरा दिवसाच्या निर्धारित केलेल्या वेळेत आणि गुणवत्ता पूर्णरित्या गाळ उचलण्याचे निर्देश दिले.
नाल्याकाठच्या महाभागांना विनंती
काही परिसरात नाल्याकाठीच मोठ्या प्रमाणात कचर्याचे ढिग आढळुन आले. मनपा प्रशासकांनी पाहणी दरम्यान नाल्याकाठी राहणाऱ्या नागरीकांनी नाल्यात कचरा टाकु नये अन्यथा या परिसरातील नागरीकांनाही अडचणींना सामोरे जावे लागेल अशी तंबी देत त्यामुळे परिसरातील नागरीकांनीही नाल्यात कोणालाही कचरा टाकू देवु नये अशी विनंती देखील केली.
योग्य यंत्राचा वापर करा...
ज्या ठिकाणी जे.सी.पी. जावु शकत नाही त्या ठिकाणी लहान यंत्राच्या किंवा मनुष्य बळाद्वारे नाले साफ करावयाच्या सुचना यावेळी प्रशासकांनी दिल्या. नाल्यात कुठेही पाणी साचनार नाही या दृष्टीने कार्य करण्याच्या सुचना यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कार्यकारी अभियंता भागवत फड यांना दिल्या. नाल्यांच्या पाहणी दरम्यान गणेशोत्सव मिरवणूक मार्गांवरील खड्ड्यांची दर्जेदार दुरूस्ती करण्यात यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. खड्डे बुजवतांना रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. दर्जेदार कामाबरोबरच वेळेत ते काम पूर्ण करावे जेणेकरुन गणेश भक्तांना सुविधा निर्माण होईल अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
एपीआय कॉर्नरला डेमो
नाल्यांची पाहणी करत असताना सिडको टाऊन सेंटर भागात एपीआय क्वार्नर येथे पुण्याच्या केमकॅन अव्हीडा या कंपनीचे नाल्यातील गाळ कचरा आणि पाणी काढण्याच्या जेटींग मशिन वाहनाचा प्रत्यक्ष डेमो घेण्यात आला. या वाहनात नालेसफाईसाठी तीन काॅम्बीनेशन आहेत. मात्र तुर्तास महापालिकेकडे सहा जेटींग मशीन असल्याने प्रशासकांनी खरेदीचा निर्णय पुढे ढकलला.