औरंगाबाद (Aurangabad) : भावसिंगपुरा, छावणी, विद्यापीठ, बेगमपुरा हा भाग शहराला जोडला जाण्यातील अडथळा ठरलेल्या खाम नदीवरील तीन पुलांपैकी एक बारापुल्ला दरवाजालगत पुलाचे बांधकाम झाले आहे. उर्वरित मकई गेट व महेमूद दरवाजा (पाणचक्की) या ठिकाणच्या दोन पुलांचा प्रश्न कायम आहे. पाणचक्की गेट येथील छोटा पूल बांधण्यास सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची केवळ घोषणाच ठरली आहे. अत्यंत कमकुवत झालेल्या या पुलावरून जड वाहनांची वाहतूक काही वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मकई गेट पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील गुलदस्त्यातच आहे.
औरंगाबाद शहराच्या पश्चिमेकडे छावणी, नंदनवन कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा, पडेगावसह या जुन्या वसाहती आहेत. या भागाची लोकसंख्या अंदाजे दोन ते अडीच लाख आहे. या भागातील वाहनांची संख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त आहे. या भागातील नागरिक शहरात येण्यासाठी प्रामुख्याने बारापुल्ला गेटचा वापर करत असत. या शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा या भागातील रहिवासी मकाई गेट आणि पाणचक्की जवळील पुलाचा वापर करतात. हे पूल अत्यंत जीर्ण झालेले असल्यामुळे ते कधीही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते यावर एकाने जनहित याचिका दाखल केली. त्यावर महापालिका आणि पूरातत्व विभागाची सूनावणी घेतल्यानंतर तत्कालीन आयुक्त भापकर आणि कांबळे यांच्या हालचालीनंतर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू केले होते.
नगरविकास आणि पर्यटन विभागासह तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची घोषणा केली होती. मात्र हे पूल अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या तीन पुलांच्या पलिकडे राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. दहा वर्षांपूर्वी केलेल्या स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमुळे वाहतूक शाखेच्या आदेशाने महापालिकेने अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यामुळे प्रामुख्याने पर्यटक व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
खासदारांच्या प्रयत्नांना यश
इम्तियाज जलील यांनी २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभेत निवड झाल्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला. परिणामी, बारापुल्ला गेट येथील पूल बांधकामासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत येथील बांधकाम देखील पूर्ण करण्यात आल्याने बारापूल्ला दरवाजाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोन कोटीच्या निधीची नुस्तीच घोषणा
येथील पूलाचे काम आटोपल्यानंतर महेमूद दरवाजा (पाणचक्की) येथील पुलाकरिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या पुलाचे बांधकाम लवकर सुरू केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. दूसरीकडे मकाई गेट येथील पर्यायी पुलासाठी अद्याप निधी मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.
न्यायालयीन आदेशाचा विसर
औरंगाबाद शहराचा पश्चिम दिशेकडील वसाहती व गावांशी संपर्क होण्यासाठी खाम नदी ओलांडावी लागते. खाम नदीवरील हे तीन पूल सुमारे तीनशे वर्षे जुने आहेत. दगडी बांधकाम असलेले हे पूल सध्याची वाहतूक व वाहनांचे आकार यांच्या वाहतुकीसाठी सुयोग्य नाहीत. मात्र, या पुलांचे ऐतिहासिक महत्व कायम आहे. काँग्रेस नेते व महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती इकबालसिंग गिल यांनी या ऐतिहासिक पुलांचे जतन करावे, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. त्यावर या पूलांचे व त्यालगत दरवाजांचे जतन करण्याबाबत महापालिका व पूरातन खात्याला सातत्याने न्यायालयाने आदेश दिले. त्यावर एका पूलाचे काम झाले असले तरी दोन पूलांचा प्रश्न कायम आहे.
जैस्वालांच्या प्रयत्नांना खिळ
सुरुवातीला २०११-१२ च्या दरम्यान या तिन्ही पुलांच्या बांधकामासाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पाठपुरावा केला होता. त्यावेळी ते शिवसेनेतून बाहेर पडून शहर प्रगती आघाडीच्या नावे औरंगाबाद मध्य मतदारसंघातून अपक्ष आमदार होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन पुलांच्या बांधकामाला मंजुरी देऊन १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, महापालिकेतील अंतर्गत राजकारणात हे काम रखडले.