Aurangabad : 3 कोटी खर्चून 'कमल' फुलणार; पण संवर्धनाचे काय?

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी एक वास्तू म्हणजे आमखास मैदानाला लागून असलेला कमल तलाव (Kamal Talav). या तलावात काही वर्षांपूर्वी कमळ फुलत होते. पर्यटकांचे ते एक आकर्षणही होते. मात्र शहराच्या विकासादरम्यान औरंगाबादकरांनी या तलावाच्या चारही बाजूंनी अतिक्रमणे करून पक्की घरे बांधली. त्यानंतर घरातील कचरा या तलावात टाकण्यास सुरुवात केली. परिणामी कमल फुलण्याऐवजी कचर्‍याची दुर्गंधी पसरू लागली. २० एकरांवरील हा तलाव आज अवघ्या ७ एकरांत मर्यादित झाला आहे.

Aurangabad
Nashik: साक्री-शिर्डी मार्गाच्या उप कंत्राटदाराविरोधात बॅनरबाजी

शहरातील एका पत्रकाराने ११ वर्षांपूर्वी यावर वाचा फोडताच प्रशासनाचे धाबे दणाणले होते. त्यानंतर तत्कालीन तत्कालीन विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी या तलावाची पाहणी केली होती. तलावाचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून दिला होता. विकासाचे काम करण्यापूर्वी तलावात भर टाकून केलेले अतिक्रमण काढण्यात आले होते. तलावाचे सुशोभिकरण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने तलावातील गाळ आणि जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले होते.

हे विकासकार्य सुरू असतानाच तलावाच्या जागेच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला
जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव महापालिका शेजारीच असल्याने मालकी पालिकेकडे असेल असे गृहीत धरत विकासकामे सुरू ठेवले होते. मात्र, तलावाची मालकी आमच्याकडे नाही, असे महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांना सांगितले.

त्यानंतर पालिका तसेच जिल्हा प्रशासनाने आपापले लेखे तपासले शेवटी तलावाच्या मालकी हक्क अभिलेखात जिल्हा प्रशासनाची नोंद असल्याची कागदपत्रे मिळाली. त्यानंतर विकासाचा मार्ग लागला. मात्र महापालिकेच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी तलावातील गाळ घोटाळा केला आणि जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ५० लाख गाळ काढण्यात खर्च झाल्याचे दाखवत तलाव विकासाचा मुद्दा चौकशीच्या फेऱ्यातच अडकला.

Aurangabad
Nagpur : वेकोलित सुरु आहे ओव्हरलोड  कोळसा वाहतूक

औरंगाबादेत औरंगजेबाचे वास्तव्य असण्यापूर्वीचा हा तलाव आहे. तलावाच्या बाजूला राणीचा तलाव, एक पोर्तुगीज चर्च असे वैभव होते. सलीम अली सरोवरातील ओव्हरफ्लो पाणी यात येत असे. तेथे मोठ्या प्रमाणावर कमळ होते. त्यामुळे याचे नाव ‘कमल तलाव’ असे झाले. हा तलाव रोजाबागपर्यंत पसरला होता. कालौघात अतिक्रमण होत आता तो डबक्यासारखा झाला आहे.

यापूर्वी माजी नगरसेवक गौतम खरात यांच्या काळात महापालिका फंडातून तलावातील अतिक्रमणे काढून तलावाच्या चारही बाजूने दगडी भितीं बांधण्यात आल्या होत्या, तत्कालीन महापालिका आयुक्त डी. एन. वैद्य यांनी व्यवस्थित आराखडा तयार करून  येथे पूर्वीप्रमाणेच कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बदलीनंतर कारभाऱ्यांनी विकास आराखडाच गाळात टाकला.

आता सुशोभिकरणाचा तिसरा प्रयोग

आता केंद्र सरकारच्या अमृत योजनेत तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धनाचा तिसरा प्रयोग केला जात आहे. यासाठी दोन कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. अद्याप तो महापालिकेच्या तिजोरीत पडलेला नाही. केवळ ९ फेब्रुवारी रोजी त्यावर प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी यंत्रणा म्हणून महापालिकेवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. सलीम अली सरोवराच्या धर्तीवर तलावाचा विकास होणार आहे.

Aurangabad
Nashik ZP : मिशन भागिरथीमधून होणार 100 कोटींची जलसंधारणाची कामे

मागचे प्रयोग पाहता....

औरंगाबाद महापालिकेचे याच तलावासह शहरातील ज्योतीनगर येथील काव्यबाग, टिळकनगरातील भारतमाता मंदीर, महापालिकेच्या शेजारीच टाउनहाॅल आणि सहकारनगरातील लोककला उद्यान, सिडको एन - आठ मधील बाॅटनीकल गार्डन, जटवाडा रोड हर्सूल तलावानजीक असलेले स्मृतीवन, सलीम अली सरोवरासमोरील रोजगार्डन इत्यादी  कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प तयार केले. मोठ्या थाटामाटात त्यांचे उद्घाटन सोहळे पार पडले. कंत्राटदार सुरक्षा अनामत रक्कम काढण्यासाठी दिलेल्या मुदतीपर्यंत देखभाल ठेवतात. मात्र एकदा रक्कम खिशात पडली की, प्रकल्पच चोरीला जातात आणि बकालावस्था होते. यानंतर महापालिका कारभारी मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करत देखभाल - दुरुस्तीकडे कानाडोळा करतात. परिणामी प्रकल्पांची वाट लागते.

कोट्यवधीच्या या प्रकल्पाचे काय ?

आता जवळपास तीन कोटीतून या तलावाचा विकास होणार आहे. मात्र याआधी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या विकासकामांचे झालेले वाटोळे पाहता या तलावाच्या सुशोभिकरणानंतर संवर्धनाचे काय, असा सवाल करत काही जाणकारांनी याबाबत राज्य सरकारने तब्बल तीन कोटीचा हा प्रकल्प पीपीपी तत्वावर अर्थात पब्लिक प्रायव्हेट प्रापर्टी या तत्वावर राबविल्यास काही वर्षे तलावाचे सुशोभिकरण न्याहाळता येईल. पण याची देखभाल आणि विकासकार्य महापालिकेकडे असल्यास 'चवन्नी खर्चा, रुपया का हिसाब' अशी भिती औरंगाबादकर व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com