औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या वॉटर प्युरिफायर, इनव्हर्टर खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत या वस्तू उपलब्ध असतानाही खरेदी करण्यात आली. एवढेच नाही तर जास्तीचे दर दाखवून लाखोंचा गैरव्यवहार केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केली आहे.
बॅटरीसह इनव्हर्टरसाठी २० प्राथमिक आरोग्य केंद्रांची मागणी असताना, ४० केंद्रांसाठी खरेदी केली. २० केंद्रांची मागणी नसतानाही, त्यांना या वस्तू पुरविल्या. बीड येथील पुरवठादाराने ३१ मार्च २०२१ रोजी हे साहित्य संबंधित केंद्रांवर पाठवून पोहोच पावती व योग्यता प्रमाणपत्रांसह १९,५९,९६० रुपयांचे बिल सादर केले. वित्त विभागाने ३१ मार्च रोजीच पुरवठाधारकाला हे बिल अदा केले. हे साहित्य जेम पोर्टलवरूनच खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. जेम पोर्टलवर बॅटरीचे दर ७,९०० रुपये तर इनव्हर्टरचे दर १२,४५० रुपये आहे. यावरून बॅटरीसह इनव्हर्टर खरेदीत ८,२९,९६० रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज नसतानाही ही खरेदी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तीन हजारांचे वॉटर प्युरिफायर घेतले २७,४५० रुपयांना
वॉटर प्युरिफायरच्या खरेदीतही अशाच प्रकारे अपहार केला आहे. १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांची मागणी असताना ३६ संच खरेदी केले. अनेक ठिकाणी सुस्थितीतील संच बंद दाखविले. जेम पोर्टलवर एका संचची किंमत ३०५० रुपये असताना, २७,४५० रुपये दर दाखवून ठेकेदाराचे ९,८८,२०० रुपयांचे बिल अदा केले. या खरेदीतही पावणेनऊ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.