Aurangabad: शेकडो अतिक्रमणांनी घोटला जयभवानी नगरातील नाल्याचा गळा

Jaibhavaninagar Nalla
Jaibhavaninagar NallaTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : जयभवानीनगरात नाल्यांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. नाल्यालगत अतिक्रमणे न काढण्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या भागातील नागरिकांना चांगलाच भोवणार आहे. मान्सूमपूर्व कामात या नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून त्यावर रहदारी पूल बांधण्याचे काम करणे अपेक्षित आहे. धक्कादायक म्हणजे मागील तीन वर्षांपूर्वी याच नाल्याने मुसळधार पावसात एकाचा बळी घेतला होता. त्या घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी रविंद्र निकम यांना निलंबित करण्यात आले होते. असे असताना नाल्याचा गळा घोटणाऱ्यांवर आणि अर्धवट काम सोडून पसार झालेल्या कंत्राटदाराला कुणाच्या दबाबाखाली अभय देण्यात येत आहे, असा प्रश्न 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आला आहे.

Jaibhavaninagar Nalla
पेट्रोल-डिझेल भरुनच ठेवा; डिलर्सचा ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे‘

औरंगाबादेतील सिडको एन - पाच टाऊन सेंटरमधील जळगाव रोड ते कॅनाॅट गार्डन ते जालनारोड खालून एन - तीन , एन - चार मधून जयभवानीनगर या गजबजलेल्या वसाहतीतून सदर नाला हा मुकुंदवाडी ते चिकलठाणा हद्दीतील एका ओढ्याला मिळून थेट सुखना नदीला जाऊन मिळतो.
प्रत्येक पावसाळ्यात सिडको - हडकोतील अनेक वसाहतींचे पाणी या उघड्या नाल्याला येऊन मिळत असल्याने पावसाळ्यात नाला दुधडी भरून वाहतो. गेल्या अनेक वर्षापासून याभागातील नागरीक नाल्याच्या सुरक्षाभिंतीचे काम करण्यात यावे, नाल्यावर ढापे किंवा लोखंडी जाळी टाकण्यात यावी, तसेच नाल्यावर पादचारी आणि वाहनांसाठी आरसीसी रहदारी पूल बांधण्यात यावेत यासाठी मागणी करत आहेत. मात्र त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांयचे अद्यापही दुर्लक्ष आहे. जयभवानीनगरात नालीवर ढापे किंवा लोखंडी जाळी न टाकल्याचा महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गत तीन वर्षापूर्वी एका मजुराचा बळी गेलेला असताना अधिकारी अद्यापही लक्ष देत नसल्याने या भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा गळा घोटण्यात आल्याने याच उघड्या नाल्यात पडून भगवान मोरे यांचा जीव गेला होता. पाठोपाठ सिडको एन - सहा, बीडबायपास एमआयटी नाला याठिकाणी देखील अशा घटना घडल्याने जयभवानीनगरासह शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Jaibhavaninagar Nalla
BMC आयुक्तांचा मोठा निर्णय; 1000 कोटींची वादग्रस्त 3 टेंडर्स रद्द

'टेंडरनामा' प्रतिनिधीने गुरूवार ते शुक्रवार सलग दोन दिवस सिडको एन-३, एन-४ व जयभवानीनगरपर्यंतच्या नाल्याची परिक्रमा केली. त्यात अनेक ठिकाणी नाल्याचा गळा घोटण्यात आल्याचे दिसले. सिडको एन ५ एसबीआय चौकातून या नाल्याचा उगम होतो. पुढे कॅनाॅटप्लेस कडुन वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळून हा नाला जालना रोड खालून पुढे एन-३ , एन - ४ मध्ये जातो.

Jaibhavaninagar Nalla
Good News! 7 हजार जागांसाठी पोलिस भरती; जाणून घ्या तारीख...

अशी आहेत अतिक्रमणे...

● अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून त्यातून नाल्याचे पाणी पुढे काढण्यात आले आहे.

● एन-३, वॉर्ड नं. ७२ येथील सद्गुरूकृपा मल्टी सर्व्हिसेसच्या समोर वाहणारा नाला भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आल्याने बुजविण्यात आला.

● पुढे टॉडलर नर्सरीमधूनही नाल्यावर सिमेंटचे ढापे टाकून बंदिस्त केला आहे. पुढे हा नाला थेट १९९-बी-३ प्लॉटवरील इमारतीच्या बाजूलाच मोकळा दिसतो.

● केटली गार्डनच्या पश्चिम-दक्षिण कोपऱ्यातून हा नाला पुढे गेला आहे. येथे नाल्यावर सिमेंटचे ढापे टाकण्यात आले आहे; पण कॉर्नरवर नाला उघडा आहे.

● पुढे नाल्यावर अतिक्रमण केलेले आहे. यामुळे नाला दिसतच नाही. थेट एन-४ येथील संकटमोचन वीर हनुमान मंडळाच्या रस्त्यावर डाव्या बाजूने नाला दृष्टीस पडतो. येथे त्याच्यावर सिमेंटचे ढापे बसविण्यात आले.

● मंदिराच्या तेथून नाला एमआयटी कॉलेजच्या पूर्व बाजूला वाहतो. येथे नाल्याची खोली ७ ते १० फुटांपर्यंत करण्यात आली आहे. नाल्याचा एवढा भाग मोकळा आहे. त्यावर चक्क स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे.

● मात्र, पुन्हा बी-७ एच प्लॉटच्या समोरील बाजूस पुलाखालून नाला पुढे गेला. येथे नाल्यावर काँक्रीट स्लॅब टाकला आहे. मात्र, विजय लताड यांच्या बंगल्याच्या बाजूला नाल्याचे अस्तित्व दिसून येते. येथेही उघड्या नाल्यावर लोखंडी जाळी टाकण्याची आवश्यकता आहे. येथे ९०० एम.एम.व्यासाचे पाईप टाकण्यात आले आहे.

● पाऊस पडताना वाहत्या पाण्याची ताकद पाहता येथे १२०० एम.एम.व्यासाची पाईपलाईन आवश्यक होती. पाईप अरुंद असल्याने नाल्यातून जोरात पाणी आल्यावर ते पुन्हा मागे फेकले जाते. येथील प्रभाकर वाघ यांच्या बंगल्याच्या दक्षिण बाजूने उघडा नाला दिसून येतो. याच भागातील ड्रेनेजचे पाणी याच नाल्यात सोडण्यात आले आहे. सर्व दुर्गंधीयुक्त पाणी लताड व वाघ यांच्या बंगल्यात शिरते. विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोलमडलेली सुरक्षाभिंतीचे काम करावे यासाठी शंभरवेळा महापालिकेकडे दिलेल्या निवेदनाचा गठ्ठाच या भागातील नागरिकांनी टेंडरनामा प्रतिनिधीच्या हाती टेकवला.

● पुढे या नाल्याची दिशाच बदलून टाकण्यात आल्याचे निदर्शनात आले. पुढे हाच नाला कृष्णराज मंगल कार्यालयाच्या बाजूने एन-४ मधून जयभवानीनगरात पोहोचतो. याच उघड्या नाल्यावर जयभवानीनगरात अतिक्रमण करून इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.

● पुढे या नाल्याची संपूर्ण परिक्रमा करत असताना प्रतिनिधी शिवाजी चौकात आला. तेथे हरी बॅग हाऊस दुकानासमोर अर्धवट उघड्या नाल्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करताना लोक म्हणाले याच खिंडारात २०१८ च्या मुसळधार पावसात भगवान मोरे पडले व त्यांचा मृत्यू झाला. पुढे सर्वत्र नाल्यावर अतिक्रमण करून नाल्याची दिशाच वळविण्यात आली आहे.

Jaibhavaninagar Nalla
आयटीयन्स होणार निश्चिंत; हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला...

नाल्यावरील अतिक्रमणांना अभय
मागील सहा ते सात वर्षांपूर्वी नाल्यातून भूमिगत गटारीचे काम करताना ज्या - ज्या ठिकाणी अडथळा येत होता. त्यासाठी महापालिकेने अतिक्रमण पाडण्याची मोहीम हाती घेत अनेकांची घरे पाडण्यात आल्याने आता नाला दिसतो. पण, काही बड्यांना अभय देत अनेकांची अतिक्रमणे जैसे थे ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत जयभवानीनगर चौकात रस्त्याचे काम चालू असताना नाल्यालगत एकाला महापालिकेनेच रसवंतीसाठी परवाना दिल्याने सध्या येथे काम अडले आहे.

Jaibhavaninagar Nalla
मध्य रेल्वेवर 'घारीची नजर' होणार आणखी अचूक; 900 कॅमेऱ्यांसाठी...

कधी टाकणार नाल्यावर ढापे
जयभवानीनगरकडून हा नाला मुकूंदवाडी रेल्वेस्टेशनच्या पुढे निघतो. एन-३ ते जयभवानीनगर दरम्यान दाट वसाहतीतून जाणारा हा नाला अनेक ठिकाणी उघडा आहे; पण काही ठिकाणी नाल्यात सिमेंटचे पाईप टाकल्याने नाला बंदिस्त झाला आहे. त्यात याच नाल्यावर काही ठिकाणी अतिक्रमण करून इमारती बांधल्या आहेत. यामुळे अधूनमधून नाला गायब होतो. जयभवानीनगरात तर नाल्यावर मोठे अतिक्रमण करून नाल्याची दिशा बदलण्यात आली आहे. नैसर्गिक प्रवाहाला जागोजागी अडविण्यात आल्याने येथे थोड्या पावसाने नाले, ड्रेनेजलाईन भरून जातात व रस्त्यावर पाणी साठते. त्यात नाल्यावर जाळ्या नसल्याने दुर्घटना घडते. यामुळे नाल्यावर ढापे अथवा सुरक्षाजाळी टाकण्यासाठी या भागातील नागरिकांच्यावतीने नगरसेवक बालाजी मुंढे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत असताना अद्याप अधिकाऱ्यांनी या कामाकडे कानाडोळा केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com