औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपासवरील संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपूलाचा प्रकाराभाबत 'टेंडरनामाने' सर्वप्रथम वाचा फोडली. पूलाची उंची कमी केल्याने भविष्यात अपघातांसाठी धोकादायक ठिकाण होऊन हा पूल असूण अडचण नसून खोळंबा ठरणार असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीसह औरंगाबादकरांसमोर मांडले. यासंदर्भात केवळ पूलाच्या दोन्ही बाजूने धनदांडग्यांच्या मालमत्तांचे भाव आणि जमिनीचे महत्त्व कमी होऊ नये यासाठीच पीडब्लुडीतील जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीच्या संगनमताने एका राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर पुलाची लांबी आणि उंची कमी केल्याचा सातारा-देवळाईकरांच्या आरोपाची देखील टेंडरनामाने दखल घेतली. आता या सदोष पूलाबाबत थेट कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
असा झाला वृत्तमालिकेचा परिणाम
या सर्व वृत्तमालिकेची शहरभर चर्चा झाली. अत्यंत अभ्यासात्मक वृत्तमालिका म्हणून अनेक तज्ज्ञांचे फोन खणखणले. मनपाचे सेवानिवृत्त अभियंता यांनी देखील पूलाचे डिझाईन चूकल्याची चूक लपविण्यापेक्षा खोदकाम न करता , ड्रेनवर खर्च न करता आमदार रोड समोर पहिला पर्यायी मार्ग आणि संग्रामनगर चौकात दुसरा पर्यायी मार्ग तयार करावा जुन्या रस्त्याच्या टाॅपपासून पूलाची उंची साडेसहा ते सात मीटर वाढवावी, पूलाचे नव्याने स्ट्रक्चर तयार करून बांधकाम करावे, असा सल्ला दिला. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी देखील पूलाची पाहणी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी देखील प्रतिनिधीचे अभिनंदन करत या सदोष बांधकामाबाबत विधान परिषदेत मुद्दा उचलणार असल्येची ग्वाही दिली. यासाठी संबंधित विभागाकडून माहिती मागवली असल्याचे देखील ते म्हणाले. या सदोष पूलाचे बांधकाम तोडून संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून खर्च वसूल करून पूलाचे बांधकाम करावे, अशी मागणी मी करणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
काय म्हणाले आमदार संजय शिरसाट
ज्या मतदारसंघात गजब अभियंत्यांनी असा गजब कारभार केला आहे, त्या पश्चिम मतदार संघाचे शिंदे सरकारच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी पूलाच्या बांधकामाबाबत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पीडब्लुडीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तेथे व्हेईकल अंडरपास योग्य असल्याचा दावा ते करत आहेत.
आता थेट कोर्टाकडून विचारणा
शुक्रवारी (२० जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील रस्ते, उड्डाणपूल, शिवाजीनगर भुयारी मार्गाबाबत दाखल याचिकेवर सुनावणी प्रसंगी न्या. रविंद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी बीड बायफास रस्त्यातील उड्डाणपूलाखाली खोदकाम केले काय, अशी विचारणा सरकारला केली. यावेळी पार्टी इन पर्सन याचिका दाखल करणारे ॲड. रूपेश जैस्वाल यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि छायाचित्र दाखवत कोर्टासमोर सत्यस्थिती लक्षात आणून दिली.
कोर्टाने व्यक्त केला संताप
आता या अभियंत्यांना आता कोणता राष्ट्रीय पुरस्कार द्यायला हवा, असे म्हणत कोर्टाने संताप व्यक्त केला. यावर आता २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी दरम्यान पूलाखालील खोदकामाचे छायाचित्र सादर करा, असे आदेश कोर्टाने दिले. यावेळी रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी पूलाचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी कोर्टापूढे केली. यावर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पूढील आदेश दिले जातील, असे कोर्टाने सांगितले. मृत्युचा सापळा ठरणाऱ्या बीड बायपासवर सेवा रोडसह सहापदरी काँक्रिटचा रस्ता तसेच चार ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला होता. हायब्रीड ॲन्युइटी प्रकल्पांतर्गत या रस्त्याचे सुमारे ३०० कोटी रूपयांचे कंत्राट औरंगाबादेतील जीएनआय कंपनीला देण्यात आले. प्रकल्पाच्या देखभालीसाठी हरियानातील ग्लोबल इन्फोटेक कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सद्यस्थितील देवळाई चौक, एमआयटी व संग्रामनगर उड्डाणपूलासह मार्गावरील आठ छोट्या पुलांचे व जोडरस्त्यांसह काही ठिकाणी मध्येच सेवा रस्त्यांचे काम बाकी आहे. जवळपास ८५ टक्के काम झाल्याचा दावा ग्लोबल इन्फोटेकचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुबडे व कंत्राटदार जीएनआयचे प्रकल्प व्यवस्थापक व्ही. एल. दुबे यांच्यासह पीडब्लुडीचे अभियंते शैलेश सुर्यवंशी यांनी केला आहे.
जागृत नागरिकांची चर्चा, कारभाऱ्यांचे खोदकाम
संग्रामनगर चौकातील मधल्या पूलाचे काम सदोष असल्याची सातारा-देवळाईतील नागरिकांनी जनसेवा नागरी कृती समिती तसेच संघर्ष कृती समितीच्या व्हाॅटसऍपग्रुपवर चर्चा सुरू केली. पूलाचे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या टाॅपपासून पूलाची उंची केवळ ३.८ मीटर ठेवल्याने पूलाखालून अवजड वाहने, शालेय बसेस जात नसल्याचे लक्षात आल्यावर कारभाऱ्यांनी पूलाखालून १.७ मीटरपेक्षा अधीकचे रस्ते खोदून पूलाची तळरस्त्यापासून ५.७६ मीटर उंची वाढवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला.
अशी केली दुसरी चूक
नेमका हा प्रकार सुरू असताना अधिकाऱ्यांना याच पूलानजीक असलेल्या आमदाररोड समोर दुसरा पर्यायी मार्ग ठेवणे आवश्यक होते, अशी चूक लक्षात आल्यावर पून्हा आमदाररोडचा थेट लचका तोडून बीडबायपासचा संपर्कच तोडण्यात आला. हाॅटेल राजकमल नजीक रस्ता दहाफूट खोदून बायपासला उतार देऊन हा रस्ता पूलाखालच्या बोळीपर्यंत जोडण्यासाठी खोदकाम सुरू केले. मात्र हा अजब प्रकार पाहूण आमदार रोडवरील दिलीप काळे या हाॅटेल व्यावसायिकासह सातारा-देवळाईचे माजी सरपंच फिरोज पटेल व अन्य नागरिकांनी आक्षेप घेतल्याने या वादावादीत आपली चूक चव्हाट्यावर येऊ नये, गावभर बोभाटा होऊ नये यासाठी चालबाज कारभाऱ्यांनी पूर्वेकडील खोदकाम अर्धवट ठेऊन पश्चिमेकडील व उत्तरेकडील पूलाखालचे रस्ते खोदण्यास सुरूवात केली.
म्हणे औरंगाबादेत प्रथमच होत आहे व्हेईकल अंडरपास
पूलाखालील खोदकामामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका वाढेल, पावसाळ्याच्या चार महिने बीडबायपास बंद ठेवावा लागेल पूल असून अडचण नसून खोळंबा अशी ओरड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकाला हाताशी धरून पूलाचे काम सदोष नसल्याचा प्रयत्न नागरिकांच्या मनात रूजवण्याचा प्रयत्न केला. यात काही लोक समाजमाध्यमावर विनाकारण अफवा पसरवत असल्याचे म्हणत पीडब्लुडीच्या कारभाऱ्यांनी थेट सातारा-देवळाईकर संभ्रम निर्माण करत असल्याचे म्हणत त्यांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फूलाखालील पाण्याचा निचरा करण्यासाठी संग्रामनगर पूलापासून थेट देवानगरी रेल्वेपूलाखालची धावपट्टी खोदण्याचा निर्णय घेण्यात आला.
धोका कायम, पूल असून अडचण, नसून खोळंबा
मात्र, पूलाची उंची अशीच ठेऊन खालून रस्ते पोखरण्याचा प्रयत्न केला तर ते जड व हलक्या वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण सदोष डिझाईनची झालेली चूक लपविण्यासाठी पीडब्लुडीने हा व्हेईकल अंडरपास असून, शहरात असा भूयारी मार्ग पहिल्यांदाच होत असल्याने औरंगाबादकर संभ्रमात असल्याचा दावा करत वाहतूकीस काहीही अडथळा येणार नाही, पूलाखालील पाण्याचा निचरा करण्याठी भूमिगत ड्रेन टाकणार आहोत, पूलाखाली वाहतूक सिग्नल लावण्याची ग्वाही देत आहेत. पण उड्डाणपूलाखाली भूयारी मार्ग करायचाच होता तर उड्डाणपूल बांधला कशाला? असा सवाल करत सातारा-देवळाईकरच नव्हेतर संपूर्ण औरंगाबादेत चर्चा सुरू आहे. यात पूर्वे-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे अनेक छोटे रस्ते जोडले जाणार आहेत. पुलाखाली ही सर्व वाहने एकाच वेळी एकत्र येतील व कोंडी होईल. ही कोंडी फोडण्यासाठी सिग्नलचा पर्याय ठेवला जाणार आहे. मग वाहतूकीची कोंडी आणि नागरिकांचा वेळ वाचावा म्हणून पूलाची उभारणी केली की अडचणीत वाढ होण्यासाठी, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.