औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील वाहतूक सुरळीत होण्याकरिता वाहतूक शाखेने जास्त वर्दळ असलेल्या विविध चौकात उभे केलेले ट्रॉफिक बूथ केवळ दिखावा बनले आहेत. ज्या संकल्पनेतून हे बूथ उभे करण्यात आले तो उद्देशच संपुष्टात आला आहे. पोलिस बूथ म्हणजे फक्त सांगाडे शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत हे जुनाट ट्रॉफिक बूथ तसेच उभे आहेत. त्यामुळे वाहतूकशाखेची गरिबी समोर येत असून, शहराच्या विद्रूपीकरणात जागोजागी भर पाडते आहे. विदेशी पाहूण्यांच्या स्वागतासाठी मात्र फक्त दिखाऊ कामे काढून जनतेच्या पैशाची लूट करण्यापेक्षा हे 'जखमी बूथ' चौकात न ठेवता, त्याजागी नवे बूथ उभारणी केले तर त्या त्याद्वारे वाहतूक पोलिसांना प्रभावी अंमलबजावणी करता येईल. तरच सुरळीत वाहतुकीची संकल्पना साकार होईल आणि वाहतूक सुरळीतही होईल. हे चित्र पाहूण्यांच्या मनावर देखील राज्य करेल.
कोट्यवधींचा खर्च
भारतात होणाऱ्या जी - २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, तसेच पोलिस आयुक्तांसह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी विविध विभागांच्या प्रमुखांसह बैठकांवर जोर देत आहेत. विदेशी पाहूण्यांचे सर्व मार्ग खड्डेमुक्त करण्यात येत आहेत. वाहतूक नियमानुसार सिंग्नलची रंगरंगोटी होत आहे. पथदिव्यांचे खांब उजळत आहेत. वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करण्यासाठी उद्योजक देखील पुढाकार घेत आहेत. सातत्याने विकासकामात निधीची अडचण सांगणारे महापालिका प्रशासन कोट्यवधीचा खर्च करत आहे. यानिमित्ताने अधिकाऱ्यांचाही नाताळ उत्साहात साजरा होणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्त होणाऱ्या विविध विकासकामांसाठी केंद्र शासनाने ५० कोटीचा निधी देण्याची कबुली दिली आहे.
सगळीकडे रंगरंगोटी, वाहतूक पोलिसांचे काय?
शहरातील रस्ते अतिक्रमण आणि पोस्टरमुक्त करत वाढत्या विद्रूपीकरणाला चाप लावण्यासाठी यंत्रणा देखील रस्त्यावर उतरली आहे. एकीकडे विदेशी पाहूण्यांच्या आगमनाआधीच शहरात नाताळ साजरा केला जात आहे. मात्र वर्षानुवर्ष उन, वारा, पाऊसाचा मारा अंगाखांद्यावर झेलत शहराची कोंडी फोडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित साधनांसह ट्राफीक बूथकडे कुणाचेही लक्ष नाही. फक्त आलेल्या निधीतून दिखाऊ कामगिरी न करता कायमस्वरूपी औरंगाबादकरांना या कामातून दिलासा मिळावा त्यात वाहतूक पोलिसांचा देखील कुठेतरी विचार व्हावा, अशी दबक्या आवाजात औरंगाबादकर चर्चा करत आहेत.
या जखमी ‘ट्रॉफिक बूथ’चे काय?
औरंगाबादेत मुख्य वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवणे जिकिरीचे असते. त्यामुळे वाहतूक शाखेने मेट्रो सिटीच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही ट्रॉफिक बूथ उभे केले. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार व अमितेशकुमार यांच्या काळात या ट्रॉफिक बूथचा पुरेपूर उपयोग करण्यात येत होता. ध्वनिक्षेपकाद्वारे रस्ता चुकीच्या पद्धतीने ओलांडणे, वाहन घेऊन कुठेही उभारणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे आदींवर नजर ठेवून त्यांना सूचना केल्या जात होत्या. बुथ कार्यरत असताना वाहतूक सुरळीत होत होती. अनेक जणांकडून वाहतूक नियम पाळले जात हाते. परंतु, हा प्रयत्न खूप कमी कालावधीपर्यंत टिकून राहिला.
उरले फक्त सांगाडे
वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून शहरातील प्रमुख अशा कॅम्ब्रीज चौक, रामनगर, मुकुंदवाडी, सेव्हनहील, हायकोर्ट, अदालत रोड, महावीर चौक, जळगाव टी पाॅईंट, सुतगिरणी, एकता चौक, क्रांतीचौक, नगरनाका, जवाहर काॅलनी, हर्सूल टी पाॅईंट व अन्य ठिकाणी लहान ट्रॉफिक बूथची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये एक ट्रॉफिक पोलिस उभारण्याचीही सोय करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणीही कायम टिकली नाही. २०१७ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या काळात इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडने वीज, पाणी, तसेच मोबाइल चार्जिंग पॉइंटची व्यवस्था असलेले दहा बंदिस्त ट्राफिक बूथ दिले. मात्र पाच वर्षात त्यांचीही दैना उडाली आहे. दुसरीकडे लहान ट्राफिक बूथही निकामी झाल्याने पोलिस झाडाखाली उभारतात, पावत्या फाडतात. सिग्नल चालू असताना मोबाइलवर बोलतात. त्या बूथमध्ये कोणी उभारत नाही किंवा प्रवाशांना दिशा दर्शवत नाहीत.
बूथचे मेंटेनन्स झाले नाही
नुस्ताच सांगाडा झालेल्या या ट्रॉफिक बूथची छिनविछिन्न अवस्था झाल्याने त्यामधील ध्वनिक्षेपक बंद झाले आहेत. परिणामी या वाहतूक पोलिस बूथचा उपयोग कर्मचाऱ्यांना करता येत नाही. इंडियन ऑईल कार्पोरेशनने दिलेल्या मोठा बूथची देखभाल दुरूस्ती होत नाही. जखमी व विद्रूप लहान बूथ चौकांची शोभा घालवत आहेत. त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी कंपनीची होती. त्यांना अधिकाऱ्यांनी जागे केले नाही. चांगले बूथ खरेदी करण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत नसल्याने पोलिसांनी विदेशी पाहूण्यांच्या ताफ्यादरम्यान कुठे उभे राहून औरंगाबादची बिघडलेली वाहतूक सुरळीत आणतील असा प्रश्न निर्माण होत आहे.
बूथची सध्याची स्थिती
विशेष म्हणजे ज्या मार्गावरून विदेशी पाहूणे येणार आहेत त्या चिकलठाणा विमानतळासमोरच ट्रॉफिक बूथची दयनीय अवस्था झाली आहे. ध्वनिक्षेपक पाहायलाही मिळत नाही. बूथमध्ये अक्षरश: धूळ साचली आहे. याच मार्गावर कॅम्ब्रीज चौक, मुकुंदवाडी चौक, उच्च न्यायालय चौक, अमरप्रीत, हर्सूल टी पाॅईंट, व्हीआयपी मार्ग ते रंगीन दरवाजा, मध्यवर्ती बसस्थानक आदी ठिकाणाच्या लहान बूथपैकी काही बूथ मोडले आहेत. या बूथमध्ये कधीच कुठलाही वाहतूक शाखेचा पोलिस उभारत नाही. येथे उभारण्यापेक्षा ते झाडाखाली शांत बसणे पसंत करत आहेत.