औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या महिन्यात जालनारोड ते कलाग्राम मार्गावरील एपीआय चौकात असलेले वाहतूक बेट एमआयडीसीच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी दुसऱ्यांदा खोदण्यात आले होते. नेहमीप्रमाणे जलवाहिनी दुरूस्तीचे काम करून ठेकेदार अनिल वाकळे यांनी यंत्रणा पसार केली. त्यानंतर ठिकठिकाणी मोडकळीस आलेल्या या वाहतूक बेटाच्या दुरुस्तीबाबत एमआयडीसीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, उपअभियंता सुधीर सुत्रावे, सहाय्यक अभियंता प्रशांत सगर यांना टेंडरनामाकडून सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र अद्यापही अधिकाऱ्यांनी त्या वाहतूक बेटाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले नाही. एकीकडे त्या वाहतूक बेटाची अवकळा झाली असून, दुसरीकडे रस्त्यालगत माती पसरल्याने पावसाळ्यात चिखल झाल्याने वाहने घसरून पडत आहेत. शिवाय चौकाच्या विद्रूपीकरणात देखील भर पडली आहे.
वर्षभरापूर्वी सरकारी अनुदानातील १५२ कोटींच्या योजनेतून जालनारोड-प्रोझोन माॅल ते कलाग्राम या सातशे मीटर रस्त्याचे तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आले होते. रस्ता बांधकामाची जबाबदारी एमआयडीसीकडे होती. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी जळगाव व पुण्याच्या एका कंपनीकडून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
जलवाहिनी स्थलांतराचा विसर
दरम्यान, रस्ता बांधकामाची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीला आपल्या हक्कातील जलवाहिनी रस्ता आणि वाहतूक बेटाखाली असल्याचा विसर पडला. जुन्या जलवाहिनीवर काँक्रिट रस्ता आणि वाहतूक बेट बांधण्यात आले. एपीय चौकात असलेल्या या वाहतूक बेटातील पॅव्हरब्लाॅकमधून जून महिन्यात गळती लागल्याने त्याचे खोदकाम करण्यात आले होते. तेव्हा देखील जलवाहिनी दुरूस्तीनंतर अधिकारी आणि ठेकेदाराने वाहतूक बेटाच्या दुरुस्तीकडे पाठ दाखवली होती. टेंडरनामाने पाठपुरावा करताच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
त्यानंतर जून महिन्यात दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा जलवाहिनी सप्टेंबर महिण्यात फुटली. त्यावर टेंडरनामाने पुन्हा कोरडे ओढताच जलवाहिनीची दुरूस्ती केली. पण नेहमीप्रमाणे पुन्हा मोडकळीस आलेल्या या वाहतूक बेटाची अवस्था जैसे थे ठेवली. परिणामी सहा कोटींचा आदर्श रस्ता विद्रूप करण्यात आला.