औरंगाबादेत वर्षभरातच ५० कोटींच्या ९ रस्त्यांचे वाटोळे

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०२० मध्ये  १५२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. या निधीतून  पालिकेच्या माध्यमातून नऊ रस्त्यांची कामे करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांसाठी ५० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. गेल्या दिवाळीनंतर अर्थात ११ डिसेंबर २०२० रोजी संबंधित ठेकेदारांना या रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी वर्कऑर्डर दिली होती. मात्र, सरकारी  अनुदानांतर्गत झालेल्या या  रस्त्यांचे काम अल्पावधीत उखडले. टेंडरनामाने सोमवारी व  मंगळवारी सलग दोन दिवस या रस्त्यांची पाहणी केली. यासंदर्भात थेट पालिका प्रशासक आणि कार्यकारी अभियंता  यांना व्हाॅटसपवर फोटो पाठवत जाब विचारला. मात्र वृत्त प्रकाशित करेपर्यंत त्यांचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या दिवाळीनंतर तयार केलेले अनेक रस्ते वर्षाच्या अवधी आधीच उखडले आहेत. याचे पुरावे देत त्या-त्या भागातील नागरिकांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे चांगलाच संताप व्यक्त केला.

Aurangabad
अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; पुणे-नाशिक औद्योगिक मार्गाला

टेंडरनामा पाहणी : कुठे काय आढळले

● शिवसेना शहर प्रमुख मधुकर डिडोरे यांनी महालक्ष्मी चौक ते लोकशाही काॅलनी मार्गावरील साचणार्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. 

●  विशेष म्हणजे कॅनाट गार्डन परिसरातील जळगाव रोड ते अजंता अंबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदलेले खड्ड्यात अपघाताचे सत्र वाढले आहे.  धक्कादायक म्हणजे या मार्गावरील निकृष्ट दुभाजकावर टेंडरनामाने प्रहार करताच प्रकल्प सल्लागार यश एनोव्हॅटीव्ह सोल्युशन एल.एल.पी.चे समीर जोशी , श्रीकांत हटकर आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता भागवत फड यांनी तातडीने दुभाजक दुरूस्ती करण्याचे आश्वासन अद्याद पाळले नाही. विशेष म्हणजे जी.एन.आय. इन्फ्रास्टक्चर कंपनीचे अभियंता किरण पाटील यांना देखील प्रतिनिधीने कोथळा निघालेला दुभाजक दाखवला होता. मात्र परिणाम शुन्य. 

● यानंतर प्रतिनिधीने जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याकडे मोर्चा वळवला. फलकावर ॲपेक्सचा उल्लेख असला तरी अलीकडेच  काँक्रिटीकरण करण्यात आलेले दिसले. महेशनगर ते ॲपेक्स हाॅस्पीटल ते जुना बायजीपुरा किमान ३०० मीटर रस्ता पार खड्ड्यात गेला आहे. दरम्यान पुलाचे काम देखील रखडलेले आहे.धक्कादायक म्हणजे दुभाजकात क्राॅक्रिटची भरती केल्याने झाडांचे नुकसान होत आहे.

●  यानंतर प्रतिनिधीने  दीपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. जळगाव टी पाॅईंट पासून जोडणार्या या रस्त्याच्या मधल्या पट्यातच खड्डे आहेत. खड्ड्यावरून पुढे गेल्यास रस्त्यावर जागोजागी पाणी साचलेले दिसते. त्यात निकृष्ट दुभाजकाने या रस्त्याला विद्रूपीकरणाची झालर चढलेली आहे. पुढे जयभवानीनगरात रस्त्याच्या मधोमध डीपी व खांब न हटवल्याने रस्ता असून अडचन नसून खोळंबा झाला आहे. विशेष म्हणजे धनदांडग्यांच्या इमारती वाचवण्यासाठी गोरगरीब मजुरांच्या घरांवर भूसंपादनाचे खापर फोडल्याने रस्ता नागमोडी केल्याचे पालिका अधिकार्यांचे  पाप उघड - उघड दिसत आहे.

● वोक्‌हर्ट ते जयभवानी चौक, नारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. वोक्हार्ट ते महावितरणच्या ग्रामीण  कार्यापर्यंत रस्त्याच्या मधोमध स्मार्ट सिटी कार्यालयामार्फत टाकलेले पाॅली इथेनाॅलचे बीलार्डस् तुटून पडले आहेत. उर्वरीतांवर वाहनाच्या धुराने काजळी चढल्याने नव्या कोर्या रस्त्याची शोभा वाढलेली दिसत आहे. रस्ता दुतर्फा मरूमाने  शोल्डर फिलींग न केल्याने खटकी पडलेली आहे. यातून वाहन डांबरी रस्त्यावर आणताना मोठी कसरत करावी लागत आहे.

●  रेल्वेस्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह येथील रस्त्याचे फेरडांबरीकरण पहिल्याच पावसात उखडल्याने निधी वाया गेल्याचे दिसत आहे.

● पुंडलिकनगर जलकुंभ ते सिडको एन-तीन, एन-४मधील हायकोर्ट ते कामगार चौक मुख्य रस्त्याचे  काँक्रिटीकरणाची ऊंची वाढवल्याने नागरिकांच्या घरात पाणी साचत आहे.बहुतांश चेंबरवरील ढापे फुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

● भवानी पेट्रोलपंप एन-दोन ते सी-सेक्टर मुख्य रस्ता ठाकरेनगर सिडको एन-दोन या रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना व्हायब्रेटरमशीनचा पुरेपूर वापर करून रेडिमिक्स काॅक्रीटची दबाई न केल्याने रस्ता वरखाली झाल्याने जागोजागी पावसाचे पाणी तूंबत आहे. काम झाले पण काही नागरिकांच्या दारात जुनाट पाईप उचलायची ठेकेदाराने तसदी घेतलेली दिसत नाहीए.

● महर्षि दयानंद चौक ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण करताना बीएसएनएल तसेच महापालिकेचे भूमिगत गटारीचे व काही खाजगी कंपन्यांचे केबल डंक्टचे ढापे खोल गेल्याने जागोजागी खड्ड्यातून वाहने पार करावी लागत आहेत. विशेष म्हणजे सन २००६ - ०७ मध्ये औरंगाबाद एकात्मिक विकास प्रकल्पातून  या रस्त्याचे डांबरीकरण करताना एमएसआरडीसीने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी  रस्त्याच्या दुतर्फा दिड मीटरची  स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा (भूमिगत आर.सी.सी. गटार )केली तयार केली होती. त्यावर पादचार्यांसाठी फुटपाथ तयार केला होता. मात्र नव्याने या रस्त्याचे डांबरीकरण करताना महापालिका अधिकारी आणि प्रकल्प सल्लागाराने गवतात बुजलेल्या या यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसात सिलकोट उखडून आतल्या सरफेसची खडी उघडी पडायला सुरूवात झाली आहे.

● अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साइज कार्यालय रस्त्याचे डांबरीकरणाचा सरफेस देखील उखडताना दिसत आहे. पादचार्यांसाठी केलेल्या फूटपाथवर विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. रस्ता तयार करताना सेंट्रल एक्साइज ते अग्रसेन चौक गटारीच्या दुरूस्तीकडे कानाडोळा करण्यात आला आहे.

Aurangabad
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

वर्षभरात दिसू लागले नऊ रस्त्यांचे 'नव' अवतार

विशेष म्हणचे काही महिन्यांपूर्वीच या रस्त्यांचे काम झाल्यावर वाहतूक नियमाप्रमाणे काही रस्त्यांवर थर्माप्लाॅस्टीकचे पांढरे पट्टे व दुभासकावरील काळे पिवळे पट्टे दिसेनासे झाले आहेत. रात्रीच्या वेळी चमकणारे कॅट ऑईजची (रेडियम दिवे) चमकणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे यातील पाच रस्त्यांची कामे जी.एन.आय.इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. व इतर ३  रस्त्यांची कामे के.बी.पाथ्रीकर व दोन रस्त्ते व्ही.बी.ए.इन्फ्रास्ट्रक्चर व मस्कट कंन्सट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांच्या तोंडाला कुलुप

सरकारी अनुदानांतर्गत केलेले हे रस्ते देखभाल दुरुस्तीच्या ६ वर्षांच्या कालमर्यादेत येतात. मात्र, या रस्त्यांना वर्षभराचा अवधी होण्यापूर्वीच जर रस्ते खराब होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे टेंडरनामाने कार्यकारी अभियंता भागवत फड, पालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी, पीएमसीचे समीर जोशी यांच्या निदर्शनास आणून दिली. खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्तीचे निर्देश देणे अपेक्षित असताना त्यावर प्रतिक्रीया देन्याची तसदी देखील हे अधिकारी घेत नाहीत. परिणामी यामुळे संबंधित ठेकेदारांना पाठबळ मिळत असल्याची शंका उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com