औरंगाबादा (Aurangabad) : सिल्लोड तालुक्यातील सर्वांत मोठे कार्यक्षेत्र असलेल्या अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची धोकादायक इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. इमारतीसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने व इतर अनुषंगिक कामांचा बांधकामात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र, इमारत बांधकाम व विस्तारीकरण या योजनेतून तब्बल सहा कोटी रुपये या नव्या बांधकामासाठी खर्च होत आहेत. नव्या इमारतीच्या बांधकामामुळे अंधारी लगत असलेल्या २४ गावांतील ७० ते ८० हजार लोकसंख्येला दिलासा मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची साठी ओलांडलेली इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे रुग्णासह येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. आयुमर्यादा संपलेल्या या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पावसाळ्यात अनेकदा कोसळले होते.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २४ गावे, आठ उपकेंद्रे व सुमारे ७० ते ८० हजार नागरिकांचा समावेश होतो. या आरोग्य केंद्राची इमारत जवळपास ६० ते ६२ वर्षे जुनी होती. अत्यंत जीर्ण झालेल्या या इमारतीच्या रुग्ण तपासणीच्या ठिकाणचे छत देखील कोसळलेले होते. त्यामुळे हा कक्ष कित्येक वर्षापासून बंद असल्याने छोट्याशा चिंचोळ्या जागेत रुग्ण तपासणीची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आली होती. हे कमी म्हणून की काय चार वर्षांपूर्वी इमारतीचा स्लॅबचा काही भाग पडला होता. नशीब बलवत्तर म्हणून नेमका त्यादिवशी रविवार असल्याने मोठी दुर्घटना टळली होती. विशेष म्हणजे औषध भांडाराच्या छताचे प्लास्टर पडण्याचा धोका निर्माण होऊन त्यात पावसाळ्यात नेहमी गळती लागत असल्याने औषधांचेही नुकसान होत होते.
१० लाखांची डागडुजी पण परिस्थिती 'जैसे थे'
पाच वर्षांपूर्वी १० लाख रूपये खर्च करून इमारतीची फुटकळ डागडुजी करण्यात आली, पण हे काम निकृष्ट झाल्याने स्लॅब, तसेच भिंतींचे प्लास्टर गळून पडणे कमी होत नव्हते. या इमारतीची वयोमर्यादा संपल्याने कितीही डागडुजी केली तरी इमारतीचा धोका कायम असल्याने डागडुजीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा संपूर्ण इमारत नव्याने बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकरिता पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी होती.
सात कोटींचा प्रस्ताव चार वर्ष धुळखात
जीर्ण झालेल्या या इमारतीच्या जागी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मागील चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने शासनाकडे साडेसात कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र कधी आचारसंहिता तर कधी कोरोनाचे दूष्टचक्र, तर कधी निधी नसल्याचे कारण पुढे करत सरकारकडुू नेहमी अपेक्षाभंग होत होता.
तीन वर्षांत १६ पत्रे
या जीर्ण झालेल्या इमारती संदर्भात अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश राजपुत यांनी तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मागील तीन वर्षांत तब्बल १६ पत्र दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पण संबंधित विभागांना वारंवार पत्र पाठवत असतानाही त्या इमारतीत सुधारणा करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते. परिणामी रुग्णालयात काम करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून काम करावे लागत होते. शिवाय रुग्णांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता.
आरोग्य केंद्रात महिलांची कुचंबना
सर्वांत गंभीर बाब म्हणजे मोडकळीस आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रीयेसाठी चक्क दुसऱ्या आरोग्य केंद्रांचा आधार घ्यावा लागत असे. मात्र त्या पर्यायी आरोग्य केंद्रात जाण्या - येण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने १२ ते १३ गावांतील रुग्ण या आरोग्य केंद्राकडे फिरकत नव्हते.
२४ गावातील नागरिकांची फरफट
अंधारी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पळशी, केऱ्हाळा, भवन, लोणवाडी, पिंपळगाव पेठ, निल्लोड, कायगाव अशी सहा उपआरोग्य केंद्रे आहेत. या केंद्राला टाकळी, मांडगाव, म्हसला बुर्द, खुर्द, तांडा बाजार, जिवरग टाकळी, गव्हाली, उपळी, बोरगाव कासारी, गेवराई सेमी, चिंचखेडा, बनकिन्होळा, वरखेडी, तलवाडा बाभूळगाव, भायगाव अशी २४ गावे जोडलेली आहेत. परंतु यातील टाकळी, मांडगाव, म्हसला बुर्द, खुर्द, उपळी व लोणवाडी ही गावे अंधारी आरोग्य केंद्राला लागून आहेत. शिवाय परिसरातील गावांचा दैनंदिन दळणवळणाचा मार्ग या गावाशी निगडित असल्याने साऱ्यांनाच या आरोग्य केंद्राचा फायदा व्हावा यासाठी अनेक ग्रामस्थांची देखील मागणी होती.
२४ गावातील ७० ते ८० हजार नागरिकांचा असंतोष
या आरोग्य केंद्राची फरशी, छताचा स्लॅब जागोजागी निखळल्याचे चित्र होते. इमारत मोडकळीस आल्याने सर्व सुविधा असूनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेणे अनेक वर्षांपासून बंद होते. आरोग्य केंद्राला लागून असलेल्या गावांतील महिलांना या शस्त्रक्रियेसाठी आमठाणा, पालोद, आंळद (ता. फुलंब्री) या आरोग्य केंद्रांच्या आधार घ्यावा लागत असे.
आठवडी बाजाराचे गाव
गावात दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. यामुळे या दिवशी टाकळी, मांडगाव, म्हसला बुर्द, खुर्द, उपळी व लोणवाडी या गावातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. या दिवशी ६०० ते ७०० रुग्णांची 'ओपीडी' असते. इतर दिवशी २०० ते २५० रुग्णांची आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधी दिली जातात. आरोग्य अधिकारी, कर्मचारी, औषधी अशा सुविधा युक्त या रुग्णालयाला सुसज्ज इमारतीची अत्यंत आवश्कता होती.
अशा झाल्या प्रशासकीय हालचाली
येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत बांधण्यासाठी सीईओंच्या प्रशासकीय प्रस्तावाला डिसेंबर २०२१ अखेरीस सर्व साधारण सभेने ५ कोटी ८५ लाख ६८ हजार रूपये खर्चास मान्यता दिल्यानंतर २ जानेवारी २०२१ रोजीटेंडर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर नवीन इमारतीच्या विकास आराखड्यास झेडपीचे सीईओ, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी २ मार्च २०२१ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली होती. मात्र निधीअभावी हे काम गेली कित्येक महिने रखडल्यानंतर अखेर २० जानेवारी २०२२ रोजी वैजापूरचा कंत्राटदार मे. बी.बी.लहामगे कन्सट्रक्शन कंपनीला जुनी इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम करण्याचा ठेका देण्यात आला.