औरंगाबाद (Aurangabad) : बीडबायपास येथील संग्रामनगर सदोष उड्डाणपुल (Flyover) बांधकामप्रकरणी उशिरा का होईना यंत्रणेला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमवारी (ता. १६) रोजी थेट पुलाच्या बांधकामाची पाहणी केली.
यावेळी ठेकेदार जीनएनआय इन्फ्रास्ट्रक्चरचे हरमितसिंह बिंन्द्रा याच्यासह PWDचे अधीक्षक अभियंता, PWD अंतर्गत जागतिक बॅंक प्रकल्पातील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांना दानवे यांनी जाब विचारला.
अधिकाऱ्यांडून अद्यापही चुकीवर बोट
यावेळी या पुलाचे कामच चुकीचे झाल्याचा आरोप करत सातारा - देवळाईकरांनी संताप व्यक्त केला. मात्र अधिकारी आणि ठेकेदाराने चूक मान्य न करता दानवे यांना सदोष डिझाईन दाखवत शासनाने मंजूर केलेल्या डिझाईननुसारच पुलाचे बांधकाम करत आहोत, मनमानी पध्दतीने कुठेही रचनेत बदल केले जाणार नसल्याचे सांगत दानवे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आधी अधिकाऱ्यांची तांत्रिक बाजू समजून घेतो, नंतर बीडबायपास पुलाच्या बांधकामासंदर्भात शासनाने मंजूर केलेले आराखडे, टेंडर प्रक्रिया याची माहिती घेतो, सदोष पध्दतीने जर पुलाचे बांधकाम असेल, तर ते तोडून नव्याने पुलाचे बांधकाम पाडू असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा बीडबायपास रोडवर संग्रामनगर चौकात सदोष उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. याच पुलाच्या दक्षिणेला सातारा - देवळाई गावठाणातील गुलमंडी समजल्या जाणाऱ्या आमदार रस्त्याचा बीडबायपासकडे येताना मध्येच लचका तोडण्यात आला. पुलाची रस्त्याच्या टाॅपपासून साडेपाच मीटर उंची न घेता अस्तित्वातील रस्त्यांचे सात ते आठ फुटापर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची त्रेधातिरपीट होणार आहे.
जरी यंत्रणेने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटारीचे काम केले तरी आमदार रस्त्याकडून संग्रामनगर चौकातून वळसा घालूनच लोकांना जावे लागणार आहे. दुसरीकडे दर्गापुलाकडून सातारा गावात जाण्यासाठी नागरिकांना संग्रामनगर पुलाखालून जाताना चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे. यात देवळाई चौकाकडून एमआयटीकडे जाणारी वाहने आणि सातारा गावठाणाकडे जाणारी वाहने एकाच क्राॅसिंगमध्ये येत असल्याने येथे कायम वाहतुकीचा चक्काजाम होणार आहे.
विशेष म्हणजे येथील बहुतेक भागातील नागरिकांना प्रतापगडनगर स्मशानभूमीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहतुकीची कोंडी कायम राहणार आहे. गत दहा वर्षांत संग्रामनगर चौकात ११७ लोकांचा बळी गेला आहे. हा महामार्ग नसून राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, मनपा हद्दीतील सेवा रस्ता मोकळा करून विकास आराखड्यानुसार हा साठ फुटाचा रस्ता व्हावा अशी मागणी पुढे आल्यानंतर मनपाने त्यांच्या हद्दीतील सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त केले, पण सेवा रस्ता कागदावरच ठेवला.
दुसरीकडे बीडबायपासचे तीस मीटर मध्ये सिमेंट रस्ता केला, पण एकाच रस्त्याचे चार तुकडे करत त्यातच सेवा रस्ता समाविष्ट केला. त्यामुळे मुख्य वाहतुकीसाठी केलेल्या रस्त्यावरून एकावेळी एक अवजड वाहन देखील पास होत नाही. त्यात रस्त्याचे बांधकाम करताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी गेला, एका महिलेला दोन महिन्यापासून अंथरूणात खितपत पडावे लागत आहे.
दुसरीकडे अर्धवट छोट्या पुलाच्या बांधकामामुळे एका कारमालकाला मोठा आर्थिक फटका सोसावा त्यात संग्रामनगल चौकातील सदोष उड्डाणपूल बांधल्याच्या तक्रारींवर 'टेंडरनामा'ने चांगलाच प्रहार केला.
विरोधीपक्षनेत्यांकडून दखल
वृत्तमालिकेची दखल घेत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. दरम्यान पुलाखालचे खोलगट रस्ते आणि खड्डा पाहून ते देखील चक्रावले. सदोष बांधकाम सुरू असल्याचा प्रकार त्यांच्यापुढे आला आहे. यात साताराकडून दर्गापुलाकडे उतार असताना रस्ते खोदून पुलाखालुन भुयारी मार्ग करायची शासकीय यंत्रणेने परवानगी दिली कशी, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
सातारा - देवळाईकर संतापले
त्यावर शासनाने उंच रस्ते खोदून भुयारी मार्गासाठी परवानगी दिली नसतानाही ठेकेदार आणि अधिकारी उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. त्यात समाजमाध्यमांना दिलेल्या डिझाईनमध्ये कुणाचाही ठसा नव्हता, मात्र विरोधी पक्षनेत्यांना अधिकारी दाखवत असलेल्या नकाशात एकाच रात्रीत ठसे कुठून आले, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मनपा हद्दीत खोदकाम कसे करणार?
संग्रामनगर चौकात बांधकाम सुरू असलेल्या हद्दीपैकी केवळ ३० मीटर जागा पीडब्लूडीच्या हद्दीत असून, पुढे स्वामी हंसराज तीर्थचौक ते दर्गा उड्डाणपुलाची धावपट्टी मनपा हद्दीत आहे. त्यात पुलाखालच्या रस्त्याची लेव्हल मिळवण्यासाठी मनपा हद्दीत खोदकाम करणार कसे, असा आरोप सातारा - देवळाईकरांनी उपस्थित केला. हा सगळा गोंधळ पुलाचे सदोष डिझाईन केल्यानेच उडाला आहे. याविषयी भाजपचे माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा देखील अधिकाऱ्यांना दिला आहे.
मग उड्डाणपुलावर उधळपट्टी कशासाठी?
ज्या जुन्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे, त्याच्या टेंडर प्रक्रियेत खोदकामाचा समावेश आहे काय, असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला. देवळाई चौकाकडून उंच रस्ते असताना त्यावर जेसीबी आणि पोकलॅन्डचे घाव घालून खाली भुयारी मार्ग आणि वरून उड्डाणपूल उभारण्याचे काम चुकीचेच असल्याचा आरोप करत जर भुयारी मार्गाचे नियोजन होते, तर उड्डाणपुलावर कोट्यवधींचा खर्च ठेकेदाराची तुंबडी भरण्यासाठी केला काय, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
आशीर्वाद कुणाचा कुणासाठी?
ठेकेदाराचा पैसा वाचावा यासाठी अधिकाऱ्यांनी पुलाची उंची कमी केली. यानंतर त्यातून जड वाहन जात नसल्याचा साक्षात्कार झाल्याने भुयारी मार्गाचे काम सुरू केले. ठेकेदाराला आशीर्वाद कुणाचा कुणासाठी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. हे काम चुकीच्या पध्दतीने केले असेल तर यापूर्वीच्या बांधकामाबाबतचे सर्व रेकाॅर्ड तपासू आणि भविष्यात अडचण आल्यास पुलाचे बांधकाम पाडून जबाबदारांच्या खर्चातून बांधू, अशी ग्वाही दानवे यांनी दिली.