छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी एक वास्तू असलेल्या आमखास मैदानाला लागून असलेला ऐतिहासिक कमळ तलावाचे लवकरच भाग्य उजळणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने अमृत - २ या योजनेतून दोन कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यात केंद्र सरकारचा २५, राज्य सरकारचा ४५ व महापालिकेचा ३० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.
या तलावाच्या पुनरुज्जीवन व संवर्धनासाठी गुरूवार (ता. २२ जून) महानगरपालिकेच्या जलनि:सारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत तब्बल २ कोटी ३० लाख २६ हजार २०२ रुपयांचे टेंडर प्रसिध्द करण्यात आले आहे. १० जुलै २०२३ या तारखेपर्यंत इच्छुक ठेकेदारांना टेंडर भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या कामांचा आहे समावेश...
कमल तलावातील संपुर्ण गाळ व जलपर्णी काढण्यात येणार आहे. यानंतर गुलाबवाडी , आनंदनगरकडून सुरक्षाभिंत बांधली जाणार आहे. टाऊन हाॅल क्षय रूग्णालय ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्गावर फेंसींग केली जाणार आहे. तलावाच्या चारही बाजुने भारतीय वंशाची झाडे लाऊन मोठा ऑक्सीजन हब उभारला जाणार आहे. तलावाच्या चौफेर आकर्षक पॅथवे , सुशोभिकरण आणि विद्युतरोषणाई केली जाणार आहे. ऐतिहासिक काळाप्रमाणेच तलावात विविध प्रजातीचे कमळ फुलवले जाणार आहेत. याशिवाय सुरक्षा रक्षकांसाठी निवासस्थान, कॅबीन, बालोद्यान व नानानानी पार्कचा देखील समावेश आहे.
यामुळे हा ऐतिहासिक कमल तलाव छत्रपती संभाजीनगरसह देशविदेशच्या पर्यटकांचे आकर्षण ठिकाण होणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून विकासाला चालना मिळणार आहे.
'टेंडरनामा'च्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय , तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तलावालगत असलेले सर्व अतिक्रमण काढून त्यानंतर घरातील कचरा या तलावात कोणी टाकू नये, अशी समज देत कमळ तलावातील कचऱ्याचे ढिग उचलण्यात आले होते. आता कचऱ्याऐवजी कमळाची फूले फुलणार असल्याने तलावातून या फुलांचा सुगंध दरवळणार आहे. महसूल दप्तरी २० एकरांवरील हा तलाव असला तरी पक्क्या घरांचे अतिक्रमण झाल्याने आता केवळ अवघ्या ७ एकरांत तलावाचे पुरुज्जीवन व संवर्धन केले जाणार आहे.
आता विकासाचा मार्ग मोकळा
'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेचा आधार घेत राष्ट्रीय हरित लवादकडे (National Green Tribunal) असीर जयहिंद यांनी कमल तलावाच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ट्रिब्युनलने महापालिका, जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिका, जिल्हाप्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर या ऐतिहासिक कमळ तलावाचे गत सौंदर्य पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांना विकास आराखडा तयार करावयाचे निर्देश दिले होते.
आता असे होऊ नये...
यापूर्वी १९९६-९७च्या दरम्यान माजी नगरसेवक गौतम खरात यांच्या मागणीनंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कृष्णा भोगे यांनी ७ कोटीचे टेंडर काढून चार ठेकेदारांमार्फत कमल तलावाला लागून असलेल्या आमखास मैदानाला सुरक्षा भिंत, अण्णाभाऊ साठे मुलांचे वसतिगृह, व्हीआयपी रोड ते आसेफिया, हिलाल, जलाल ते दिलरस काॅलनीकडे जाणाऱ्या विकास आराखड्यातील पक्का रस्ता आणि त्याच काळात तलावाच्या उत्तरेला टेकडीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान फुलवले होते. तलावाच्या काठावर पश्चिमेला वसलेल्या आनंदनगर, आसेफिया काॅलनी, गुलाबवाडी, जयभिमनगर येथील अतिक्रमण काढून या वसाहतींच्या पाठीमागे सुरक्षाभिंतीचे काम करण्यात आले होते.
एवढेच नव्हेतर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले होते. तलावाच्या चारही बाजुंनी दगडांची पिचिंग करण्यात आली होती. तलावाच्या पूर्वेला मुरुमाचा भराव टाकून चारही बाजूने वृक्षारोपण करून तेथे दिव्यांग व्यक्ती आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी फूड प्लाझाची देखील निर्मिती केली होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा या विकासकामांना चांगलाच फटका बसला.
विकासकामांची सुरक्षा रामभरोसे असल्याने केलेली विकासकामे होत्याची नव्हती झाली. अडीच दशकानंतर पुन्हा जैसे थे झाले. आता अडीच कोटी केवळ तलावावर खर्च केले जात आहेत. मात्र जनतेच्या या पैशाचा चुराडा होऊ नये, यासाठी आधी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करावा.
शहरातील पर्यटनात भर पडणार
आता पुनरुज्जीवन व संवर्धन मोहिमेत कमळ तलावाला आणि परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अजून काही अतिक्रमणे कचरा, जलपर्णी आणि गाळ काढला जाणार असल्याने लवकरच हा ओसाड कमळ तलाव मोठे पर्यटन केंद्र ठरणार आहे.