छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : 'टेंडरनामा'ची सडेतोड वृत्तमालिका त्यानंतर तहसिलदारांच्या कानउघडणीनंतर मंडळ अधिकारी, तलाठी चांगलाच ताळ्यावर आला. दरम्यान शुक्रवारी (ता. १५) रोजी शेक्टा येथील गट क्रमांक - ११८ मधील एका शेतकऱ्याने अडवलेला शेकडो शेतकऱ्यांचा पानंद रस्ता मोकळा करण्यासाठी तहसिलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी रमेश मुंडलोड यांनी "टेंडरनामा"च्या वृत्तानंतर ७ मार्च रोजी मंडळ अधिकाऱ्याला रस्ता मोकळा करण्यासाठी नव्याने आदेशित केले. दरम्यान वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच धास्तावलेल्या मंडळ अधिकारी गोरे आणि तलाठी कृष्णा घुगे यांनी संबंधित शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करावयाचा असल्याने नोटीस बजावण्यात आली.
गोरेचे पुन्हा काळेबेरे
मात्र, गोरे यांनी या प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसात पुन्हा सक्षम न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यास सादर करावे, अशी दिशाभूल करणारी टिपणी जोडल्याने प्रकरणात पुन्हा गोरेंच्या कार्यवाहीवर संशय निर्माण होत आहे.
तहसिलदारांकडून शेतकऱ्यांना दिलासा
दरम्यान प्रतिनिधिने मुंडलोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकरणात संबंधित शेतकऱ्याचा स्थगिती आदेश सक्षम न्यायालयाने फेटाळला आहे, येत्या दोन दिवसांत रस्ता मोकळा करण्यासाठी विभागीय पोलिस अधिकार्यांनी पोलिस बंदोबस्त देखील दिला आहे, उप अधीक्षक, भुमीअभिलेख कार्यालयाने मोजणी अहवाल व नकाशा सादर केला आहे, जर संबंधित शेतकऱ्यांचा दावा फेटाळला नसता तर पुढील कार्यवाही कोणीच केली नसती, या प्रकरणात विभागीय पोलिस अधिकार्यांच्या आदेशाने चौकशी नेमली जाते. त्यांच्या चौकशीत स्थगिती आदेश फेटाळल्याचे समोर आले तरच बंदोबस्त दिला जातो, असे म्हणत त्यांनी दोन दिवसात रस्ता मोकळा होणारच, जर या प्रकरणात कुणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आणि दोन दिवसात गोरे आणि घुगे यांना दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुंडलोड यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांच्या रस्त्यासाठी एकीचे घडले दर्शन
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेक्टा शिवारातील गट क्रमांक ११८ मधून गट क्रमांक ११९, ६८,६५,,६७,६४ या शेतजमिनींकडे जाणार्या पानंद रस्त्यावर गट क्रमांक -११८ च्या एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून वापरात असलेला वहिवाटीचा रस्ता गिळंकृत केल्याचा "टेंडरनामा " ने पर्दाफाश केला.शेतजमिनीत जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळावा यासाठी त्रस्त शेतकरी गत १५ वर्षांपासून महसुल दरबाराच्या पायर्या झिजवत होते. मात्र कुणीही त्यांना साद घालत नव्हते. गत १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रहदारीसाठी आता शेतकर्यांचा रस्ता मोकळा होणार आहे.
"टेंडरनामा"ने काढला १५ वर्षाचा लेखाजोखा
अधिकृत व हक्काच्या वहिवाटीचा रस्ताच बंद केल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना संबंधित शेतकर्यांना करावा लागत होता. "सरकारी काम तब्बल १५ वर्ष थांब " अशी गत झाल्याने शेतकर्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीपुढे कैफियत मांडली. आधीच शेतरस्ता अडवल्याने गत १५ वर्षांपासून जमीन कसताच येत नसल्याने कर्जाच्या डोहात बुडालेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रतिनिधीने शेतकर्यांच्या या गंभीर समंस्येवर तोडगा काढण्यासाठी सलगदोन आठवडे काम केले. महसुल अभिलेखातून या संपूर्ण प्रकरणाचा १५ वर्षाचा लेखाजोगा काढला, असता त्यात गैर अर्जदार शेतकर्याचा दावा फेटाळल्याचे समोर आले. दुसरीकडे तहसिलदारांनी एकदा नव्हे दोनदा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिल्यानंतरही मंडळ अधिकारी व तलाठी रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची टिपणी पुढे आली. अखेर शेक्टा येथील अनेक शेतकर्यांची प्रतीक्षा संपली असून हा रस्ता अखेर १५ मार्च रोज अधिकृतपणे रहदारीस मोकळा होणार असल्याची ग्वाही मुंडलोड यांनी दिली.
नुकसान भरपाईचा दावा ठोकणार
शेक्टा शिवारातील गट क्रमांक ११८ मधून गट क्रमांक ११९, ६८,६५,,६७,६४ या शेतजमिनींकडे जाणार्या पानंद रस्त्यावर गट क्रमांक -११८ चा जमीनधारकाने अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून वापरात असलेला अधिकृत रस्ता बंद केल्याने अनेक शेतकर्यांना जमिनीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गत १५ वर्षांपासून जमिनी पडीक ठेवण्याची वेळ अनेकदा आली होती यामुळे आता अर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यावर सक्षम न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा ठोकणार असल्याचा निर्णय घेतला आहे. इतर पर्यायी रस्ते खाजगी व योग्य नसल्याने मोठी अडचण या परिसरात निर्माण झाली होती. यावर अनेकदा तोडगा काढण्यासाठी चर्चा, मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र सदर शेतकरी कुणालाही बधत नव्हता. अशातच शेतकर्यांनी एकत्र येत दळणवळणाच्या या महत्त्वाच्या रस्त्यावर सखोल चर्चा व कायमचा तोडगा काढण्यासाठी "टेंडरनामा" प्रतिनिधीची भेट घेतली. प्रतिनिधीच्या पाठपुराव्याने रस्त्याचा वर्षानुवर्ष रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लावला. यासाठी रस्त्याची गरज असलेल्या शेतकर्यांनी तहसिल रमेश मुंडलोड, विभागीय पोलिस अधिकारी महेश कलवानिया, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विभागीय आयुक्त मधुकर आर्दंड यांचे ऋण व्यक्त केले. रस्ता मोकळा करणे कामी मुंडलोड यांनी पुढाकार घेतला व येत्या दोन दिवसांत गट क्रमांक - ११८ च्या जमिनीतून रस्ता तयार होणार असून १५ वर्षांपासून भिजत पडलेला शेतजमीन रस्ता प्रश्न मिटल्याने अखेर सर्व लाभधारक शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.