औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादकरांना गेल्या ४० वर्षांपासून खड्डेमय रस्ते, अनधिकृत पोस्टरबाजी, चहा-नाष्टा सेंटर, भाजी - फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामधून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांच्या दुरुस्तीसह वाढती पोस्टरबाजी, अतिक्रमणासाठी मनपाकडे वारंवार मागणी होत होती तरी दुर्लक्ष केले गेले. मात्र जी - २० परिषदेनिमित्त शहर व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना विदेशी पाहुणे भेट देणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी ते ज्या मार्गावरून येणार तेवढेच मार्ग चकाचक करण्याचे काम मनपा प्रशासनाने तीन महिन्याअगोदरच सुरू केले आहे. याबाबत औरंगाबादमधून संताप व्यक्त होत असून, विदेशी पाहुण्यांनी वारंवार औरंगाबादेत यावे म्हणजे रस्ते, फुटपाथ, दुभाजक दुरूस्ती, अतिक्रमण आणि फुकट्या भाऊ - दादा-काका-मामा-भाई-भैया यांच्या पासून शहर पोस्टरमुक्त होतील शिवाय खांब देखील अतिक्रमणमुक्त होतील, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने मनपाला भरघोस निधी दिला आहे. २०१४-१५ यावर्षी २४ कोटींचा निधी शासनाने महापालिकेला दिला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये १५२ कोटींचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात पाच, दुसऱ्या टप्प्यात तीस, तर तिसऱ्या टप्प्यात २४ रस्त्यांची कामे केली गेली आहेत. आत्तापर्यंत ५९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत. त्यात मनपाने स्मार्ट सिटीयोजनेतील ३१७ कोटीतील १११ पैकी निधीची आडकाठी घालत पहिल्या टप्प्यात ८८ कोटीतील २२ रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.
तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मनपा फंडातून शंभर कोटींची रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले होते. मात्र आधी या कामांना कैची लावणाऱ्या विद्यमान प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी २०२२ - २३च्या अर्थसंकल्पात २०० कोटींची कामे घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी शंभर कोटीचे टेंडर काढण्याच्या मार्गावर आहे. ही कामे होतील तेव्हा होतील. पण आधीच्या सरकारी अनुदानातून अर्धवट आणि वाट लागलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची दुरुस्ती कधी पूर्ण करणार, असा सवाल करत औरंगाबादेतून संताप व्यक्त केला जात आहे.
जी - २० शिखर परिषद भारतात होणार आहे. त्यानिमित्ताने १३ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध देशांची शिष्टमंडळे औरंगाबादला भेट देण्याची शक्यता वर्तवत या विदेशी पाहुण्यांसमोर शहर अस्वच्छ दिसायला नको म्हणून मनपाने तीन महिन्यांअगोदरच जोरदार जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्या आदेशाने रस्ते, फुटपाथ, दुभाजकांच्या स्वच्छतेसह दुरूस्ती तसेच विविध चौकांचे सुशोभिकरण केले जात आहे. जिथे अतिक्रमण असेल ते हटवून त्या जागी वृक्षारोपन केले जात आहे. विमानतळापासून शहरातील पंचतारांकीत हाॅटेलपर्यंतचे रस्ते चकचकीत ठेवले जात आहेत. तिथूनच पुढे शहर व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या दुभाजकांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. अगदी रस्त्यांच्या कडेला साचलेली माती काढून लगेच विल्हेवाट लावली जात आहे. रस्त्यालगतच्या भिंतींवर हेरिटेज वाॅल पेंटिंग करण्यात येणार आहेत. मकबरा परिसरातील स्वच्छतागृहाबाहेरील भिंतींवर वारसा व पर्यटनस्थळ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखील दुरुस्ती सुरू केली आहे. विशेष म्हणजे विदेशी पाहुण्यांच्या मार्गावर एकही खड्डा राहता कामा नये याची दक्षता घेत दुरुस्तीसाठी आवश्यक कामांचे अंदाजपत्रक सादर करा, आठ दिवसांत मान्यता देऊ, असे फर्मानच प्रशासकांनी काढले आहे. विशेष म्हणजे रस्त्यांलगत अतिक्रमण हटवत पोस्टरमुक्त शहराची वाटचाल सुरू आहे.
विदेशी पाहुणे महत्त्वाचे; औरंगाबादकरांचे काय?
जी - २० शिखर परिषदेनिमित्त औरंगाबादची पाहणी करायला येणाऱ्या या पाचशे विदेशी पाहुण्यांना त्रास होवू नये म्हणून मनपा प्रशासनाने अगदी जलद गतीने हालचाली करत आठ दिवसात खड्डे, दुभाजक, फुटपाथ दुरूस्तीसाठी व इतर कामांसाठीचे अंदाजपत्रके तयार करण्याची कामे सुरू केली आहेत.
मनपा प्रशासनाच्या या जलदगती कारभारावरून विदेशी पाहुणे महत्त्वाचे औरंगाबादकर 'खड्ड्यात' गेले तरी चालतील, हे प्रशासनाने आपल्या कृतीवरून दाखवून दिले आहे.
औरंगाबाद शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. याविषयी न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. नागरिक देखील वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण पावसाळा आल्याची अधिकारी वाट पाहतात. पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात काम करता येणार नाही. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्त्यांची कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र जी - २० शिखर परिषदेची घोषणा झाली आणि तीन महिने अगोदरच प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परता
विशेष म्हणजे स्वतःची प्रशासकीय इमारत वर्षभरापासून दलदलीत अडकलेली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने इकडे तीन महिन्याअगोदरच तत्परता दाखवली. विदेशी पाहुणे चिकलठाणा विमाततळापासून हर्सुल टी पाॅइंटकडून सुभेदारीकडे येणार म्हणून अगदी जळगाव टी पाॅइंटपासून हर्सुल टी पाॅइंटपर्यंत दोनच दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम केले. विशेष म्हणजे उर्वरीत सर्व रस्ते मात्र तसेच ठेवण्यात आले आहेत.
ही तत्परता सर्वसामान्यांसाठी का नाही?
प्रशासनाने कर भरणाऱ्या औरंगाबादकरांना दावणीला बांधत ‘आम्ही विदेशी पाहुण्यांचे सेवेकरी’ म्हणत केवळ त्यांच्या प्रवासाचे मार्ग चकाचक करण्यात धन्यता मानत आहेत. प्रशासन सर्वसामान्यांच्या बाबतीत ही तत्परता का दाखवत नाही, नागरिक खड्ड्यात गेले तरी चालतील परंतु विदेशी पाहुण्यांना त्रास होता कामा नये, ही मानसीकता पुढे आली आहे. यासंदर्भात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.