औरंगाबाद (Aurangabad) : हर्सूल ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग-७५३ एफचे काम करताना कंत्राटदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा फटका खुद्द राज्यमंत्र्यांच्या ताफ्याला बसला असून, मंत्रिमहोदयांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. मंत्र्यांच्या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (NHAI) नोटीस बजावली आहे.
हर्सूल ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफचे काम करताना कंत्राटदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हे काम केले आहे. याच मार्गावरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा औरंगाबाद ते सिल्लोड हा प्रवास करत असतो. या प्रवासात राज्यमंत्र्यांच्या ताफ्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे या रस्त्यातील अडथळ्यांबाबतची कैफियत मांडली होती. मंत्र्यांच्या तक्रारीनंतर स्वतः चव्हाण यांनी रस्त्याची पाहणी केली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कंत्राटदारांच्या कामाकडे दुर्लक्ष आणि बांधकामात रस्ता वाहतुकीसंदर्भातील सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडविल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. चार दिवसांचा अल्टिमेटम देत गुन्हे दाखल करण्याची तंबीही दिलेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हर्सुल टी पाॅईंट ते फर्दापूर या महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्यातही कंत्राटदारांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे यामार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या यामार्गाचे काम गत पाच ते सहावर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. चालू असलेल्या कामात कंत्राटदाराकडून रस्ते दुरुस्ती करताना साधे नियमही पाळले जात नसल्याच्या तक्रारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणीत समोर आल्या होत्या. त्यांच्या मतदार संघातील अनेकांच्या याबाबत तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली होती.
चव्हाण यांनी पंधरा दिवसांपूर्वी या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. त्यात सत्तार यांनी माडलेल्या व्यथेप्रमाणे मार्गात अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे सांगणारे सूचनाफलक दिसून आले नाहीत. अनेक ठिकाणी खड्डे असून मध्येच काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने पर्यायी मार्ग देखील दिलेले नाहीत. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असताना पाणी मारले जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात साईन बोर्ड, खड्डे आणि आरपार खोदून ठेवलेल्या चाऱ्यांलगत रेडियम पट्टे ही लावलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरून जाताना प्रवाशांना दिवसा आणि रात्री अपघाताच्या भीतीने जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो आहे.
अधिकारी - कंत्राटदारांची बेपर्वाई
यामार्गाचे काम करताना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांच्या पाहणीत उघड झाले. त्यामुळे त्यांच्या सूचनेवरून उप विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. डी. साळुंखे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे यांना नोटीस बजावली आहे.
या कायद्याचा घेतला आधार
रस्त्याचे काम करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोडगे यांनी अधिकाऱ्यांना कलम १३३ (१) ब नुसार चार दिवसांत सुधारणा करा, नसता गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
हे आहेत जबाबदार...
हे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि याच मार्गा मधून समृध्दी महामार्ग गेल्याने काही भाग एमएसआरडीसीकडे येत असल्याने त्यासाठी लॅन्को रिथविक (जे. व्ही) , आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि, मेघा इंजिनिअरींग हे नियुक्त असलेले कंत्राटदार जबाबदार आहेत.
हर्सूलची कोंडी फूटणार
याच महामार्गाला अडथळा ठरणारी हर्सूलची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यांच्या निर्देशानुसार तीन दिवसापूर्वी उप विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी बाधित होणाऱ्या जागामालकांसोबत तातडीने बैठक घेतली होती. त्यात सर्व १०२ जागामालकांना योग्य तो प्रचलित रेडिरेकनर दरानुसार मोबदला देण्याचे आश्वासन दिल्याने मालमत्ताधारकांनी होकार दिला. पुढील आठवड्यात येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.