औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद येथील सातारा भागातील शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराचे जतन, संवर्धन, पुनर्वसन व परिसर विकासाची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून ५६ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेले शहराचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर व परिसराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. मंदिर परिसरातील दीपमाळ, सभामंडप, भक्तनिवास, मंदिर परिसरातील व्यापारी स्थापना, दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे, लँडस्केप विकास, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाहनतळ विकास, पथदिवे, हायमास्ट व इतर विकास कामे, विद्युतीकरण करणे आदींसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. ही विकास कामे झाल्यास या अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांनाही या सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.
आमदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य सरकारने खंडोबा मंदिर व परिसराच्या विकासासाठी ५६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मंजूर निधीतून होणारी कामे...
● मंदिराच्या बाहेरच्या व आतील दगड रसायनांनी साफ करून त्यावर संरक्षणात्मक रसायनांचा थर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे दगडांची झीज कमी होण्यास मदत होईल
● दगडांना असणारे तडे हे चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या सह्याने भरून काढण्यात येणार आहे
● गर्भगृहाच्या जेत्याच्या दगडांवरील नक्षीकाम दगड ठिसूळ झाल्याने नष्ट झालेले आहे. ते चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या साहाय्याने पुन्हा बांधण्यात येईल
● मंदिर शिखराच्या पडलेल्या विटांचे संवर्धन, खराब झालेला दर्जा काढून टाकून पुन्हा भरणे, खराब झालेला गिरावा पुन्हा करणे इत्यादी कामे प्रस्तावित आहेत
● मंदिराच्या सभामंडपाची इतर समकालीन मंदीरानुसार पुर्नबांधणी बांधणी करणे
● मंदिरासमोरील दीपमाळेचा जीर्णोद्धार व संवर्धन
● मंदिरासमोरील नगारखान्याचा जीर्णोद्धार व संवर्धन
● मंदिराशेजारील जागेचा विकास संवर्धन
● भक्तनिवास
● मंदिर परिसरातील दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे
● लँडस्केप विकास, पिण्याच्या पाण्याची सोय करणे
● वाहनतळ विकास
● पथदीप, हायमास्ट व इतर विकास कामे विद्युतीकरण करणे, तसेच मंदिरापर्यंतच्या २ किमी रस्त्याचे अपग्रेडेशन, मंदिराजवळील नाल्यावरील कल्व्हर्ट
● मंदिर परिसरात विस्थापनातून रिकाम्या झालेल्या जागेचा विकास करणे