औरंगाबाद (Aurangabad) : आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिडकोतील जळगाव टी पाॅईंट येथील उड्डाणपूल खड्डेमय झाला आहे. औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर आणि पुलाखालच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलावर वाहने चालवताना अचानक खड्डा समोर येत असल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवस पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यात पुलावरील पाण्याचा निचरा करणारे पाईप आणि पुलाखालील गटारे स्वच्छ नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते आहे.
एमएसआरडीसी, ठेकेदार कोमात अपघात जोमात
सिडकोतील औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी सरकारी तिजोरीतून ५६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपूलाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर संपूर्ण बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आली होती. टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या मुंबईतील रंजन मिश्रा या ठेकेदाराच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा.लि. कंपनीला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. २० जून २०१६ मध्ये त्याने प्रकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर ९ वर्ष पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे होती.
देखभाल दुरुस्ती नाहीच
एकदा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठेकेदाराने पुलाच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला नाही. विशेषतः पावसाळ्यापूर्वी ठेकेदाराने देखभाल दुरूस्तीअंतर्गत रस्त्यांची डागडुजी न केल्याने पुलाखालचे जोड रस्त्यांसह उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलांवरील धावपट्टीचे डांबर निघून गेले आहे. पूर्णतः सरफेस उखडल्याने पुलावरील धावपट्टीच्या चढ - उतारावर खडीच खडी पसरल्याने धावपट्टीची घसरगुंडी झाली आहे. त्यात अशा ठिकाणी वाहनाचे चाके रुततील एवढ्या आकाराचे हे खड्डे पडले आहे. अशा खड्ड्यांतून आणि पसरलेल्या खडीतून वाट काढताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहन चालकांना देखील खड्ड्यांचा त्रास होत आहे. अनेकदा वेगात आलेले वाहन नियंत्रणात न आल्यास खड्ड्यांमध्ये चाके आदळून वाहनांचे स्पेअर पार्टचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वी डागडुजी केल्याचा ठेकेदाराचा दावा
पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात आल्याचा व रस्त्याच्या थरावर डांबरीकरण केल्याचा दावा जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. मुंबईतील वरिष्ठ अभियंता सौरभ जावळीकर यांनी केला आहे. पुलाची धावपट्टी आणि जोड मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम मे महिन्यात हाती घेतले होते. या मार्गावरील उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अद्याप कंपनीच्या खांद्यावर आहे. मागील काही दिवस पावसाची संततधार सुरू असल्यामुळे खड्डे पडतात. पावसाळ्यात काम करण्यास तांत्रिक अडचणी येतात. परंतु पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली जाईल. खडी व वाळुची तीन दिवसांत झाडलोट केली जाईल, असे जावळीकर यांनी सांगितले आहे.
असा आहे पुलाचा तांत्रिक तपशिल
● गाळ्यांची एकूण लांबी : ६८० मीटर
● जोड रस्ते, रॅम्प, रिवेल : ३२५ मीटर
● धावपट्टी : ४ पदरी पूल : १७.२० मीटर रूंद
● पुलाची एकूण लांबी : १११३ मीटर
● प्रकल्पाची किंमत ५६ कोटी २५ लाख
जबाबदार अधिकारी
- एमएसआरडीसीचे अधिकारी
- बी. बी. साळुंखे, मुख्य अभियंता
- अशोक इंगळे, उप अभियंता
- सुरेश अभंग, कार्यकारी अभियंता
ठेकेदार
- सौरभ जावळीकर, विभागीय अभियंता
- अजय मोहंती, व्यवस्थापक
- रंजन मिश्रा, संचालक
- मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. मुंबई