औरंगाबाद (Auranganad) : एका टोकाला कॅनाॅट प्लेससारखी मोठी बाजारपेठ, गजबजलेल्या बहुमजली इमारती, सरकारी-निमसरकारी, खाजगी कार्यालये, महाविद्यालये आणि दुसऱ्या टोकाला जालनारोड असलेल्या सिडकोतील वार्ड क्रमांक ६५ सुराणानगरमधील अग्रसेनभवन ते जालनारोड (Agrasenbhavan to Jalna Road) हा जोडरस्ता चकाचक होण्यासाठी तब्बल ४० वर्षे लागली.
पहिल्यांदाच अग्रसेन भवन ते जालनारोडपर्यंत वाहनधारक आणि पादचाऱ्यांची खड्ड्यापासून सुटका झाल्याने या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. रस्त्याची अत्यंत खड्डेमय अवस्था असल्याने सिडकोच्या विकास आराखड्यातून हा रस्ता गायब होतो की, काय अशी शंका या भागातील नागरिक उपस्थित करत होते. चांगल्या रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत असे. आता ती गैरसोय थांबणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत येथील पक्का रस्ता देण्याचे आश्वासन राजकीय पक्ष देत होते. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत निधी नसल्याने कार्यवाही शून्य होती. यावर गत आठवड्यात टेंडरनामाने वृत्त प्रकाशित करताच औरंगाबाद पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांनी वृत्ताची दखल घेत आमदार निधीतून १० लाखांचा निधी दिला. या भागातील माजी नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रशांत देसरडा , राखी देसरडा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनीही या रस्त्यासाठी योगदान दिले त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार निधीतील १० लाखांच्या निधीमुळे तब्बल ४० वर्षानंतर अग्रसेन भवन ते जालनारोडपर्यंत रस्ता पोहचला.
टेंडरनामाच्या वृत्तानंतर आमदार सावे यांनी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर तसेच कंत्राटदार प्रशांत नांदेडकर यांच्या समवेत या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ निधी देत दोनच दिवसात जालनारोड पर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे नशीब पालटले. यामुळे नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. सिडको कॅनाटकडून सरिताराज अपार्टमेंट ते अग्रसेन भवन ते जालनारोड हा साडेचार मीटरचा जोड रस्ता जातो. पण गत ४० वर्षापासून पक्क्या रस्त्यासाठी या भागातील नागरिक महापालिकेकडे तक्रारी करत होते. पण महापालिकेसमोर निधीचा अडथळा येत होता.
सावे यांनी पुढाकार घेत शासनाच्या नगरविकास विभागातून निधीला मान्यता मिळवत, तसेच महापालिकेतील शहर अभियंता कार्यालयाची परवानगी मिळवत रस्त्याच्या कामातील मुख्य अडसर दूर केला. पक्क्या रस्त्याअभावी या भागातील नागरिकांना खाच खळगे आणि खड्ड्यातून तसेच दगड - विटा - मातीतून, तर पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत होती. आता ही कसरत थांबणार आहे.