औरंगाबाद (Aurangabad) : रस्त्यांसाठी आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला भरीव निधी दिला असतानाही भावसिंगपुरा परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही रस्त्यांचे टेंडर काढुनही रस्त्यांची कामे इतरत्र वळवण्यात आली. काही ठिकाणी महापालिका प्रशासकांनी गेल्या पानकळ्यात या भागातील रस्त्यांची अवकळा स्वतः दुचाकीवर फेरफटका मारुन पाहिली होती, पण तो केवळ फार्स ठरला. प्रत्यक्षात या भागातील रस्त्यांची कामे सुरू केली जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
नगरसेविकेचा संताप, अधिकाऱ्यांची आश्वासनांची खैरात
रस्ते करायचे नव्हते तर, टेंडर कशाला काढले, दूचाकीवर पाहणी कशाला, असे प्रश्न यानिमित्ताने या भागातील नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मनिषा विनोद लोखंडे (पाटील) तसेच समाजसेवक गणेश लोखंडे यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे वारंवार केले जात असत. मात्र आश्वासनांची खैरात वाटत प्रशासन दुर्लक्ष करत असे.
टेंडरनामा पोहचला गावात
यासंदर्भात नगरसेविका मनिषा लोखंडे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे कैफियत मांडली होती. त्यावर भावसिंपुऱ्यातील रस्त्यांची वृत्तमालिका टेंडरनामाने प्रकाशित केली. त्यावर नगरसेविका लोखंडे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या ऐतिहासिक नगरीतील चार मुख्य रस्त्यांचा ३१७ कोटींच्या ६४ रस्त्यांच्या यादीत समावेश करण्यात आला.यासाठी महापालिकेने वीस कोटींचे अंदाजपत्रक तयार करून सरकार दरबारी प्रस्ताव पाठवला आहे.
ऐतिहासिक नगरी, खड्ड्यात अडकले रस्ते
भीमनगर भावसिंपुरा वार्ड क्रमांक १६ या वार्डात गंगा बावडी ते महादेव मंदिर व भावसिंपुरा ते पडेगाव असा मुख्य महापालिकेतील विकास आराखड्यातील मुख्य रस्ता आहे. ऐतिहासिक गंगा बावडी आणि महादेव मंदिरात देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. तसेच शहरातील बिबिका मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी आणि सिध्दार्थ उद्यानाला भेट देऊन पर्यटक दौलताबाद आणि वेरुळ लेण्यांकडे भावसिंपुराकडून पडेगाव मार्गे जातात.
सरकारी निधीतून रस्त्यांकडे पाठ
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने महापालिकेला भरघोस निधी दिला आहे. २०१४-१५ यावर्षी २४ कोटींचा निधी सरकारने महापालिकेला दिला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये १५२ कोटींच्या निधीची घोषणा रस्त्यांच्या कामासाठी करण्यात आली आहे. त्यातून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जात आहेत.
५९ रस्त्यांच्या यादीत समावेश केला नाही
पहिल्या टप्प्यात पाच, दुसऱ्या टप्प्यात तीस तर तिसऱ्या टप्प्यात २४ रस्त्यांची कामे केली जात आहेत. आत्तापर्यंत ५९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत, काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्य सरकारचा निधी उपलब्ध असल्याने या भागातील रस्त्यांचे काम जदल गतीने होईल, अशी अपेक्षा होती, परंतु या भागातील एकाही रस्त्याचा समावेश केला गेला नसल्याने कामाला म्हणावी तशी गती नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यात प्रामुख्याने विद्यापीठ साई क्रिडा संकुल ते भीमनगर- भावसिंपुरा ते ग्लोरिया सिटी, महापालिका कत्तलखाना ते पडेगाव , कमल हाऊसिंग सोसायटी ते लालमाती, माऊली चौक ते सांची कमान या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
७५ लाखाचा निधी मंजूर
२०१७ मध्ये महापालिकेने या भागातील भिमनगर-भावसिंपुरा ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्यासाठी ७५ लाखाची निविदा काढली होती. नवीन रस्ता होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या रस्त्याचे काम वंडर कंन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. पण, संपूर्ण रस्ता खोदून काढल्यानंतर या रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात झाली नाही. खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. रस्त्याच्या कामामुळे नागरिक कडेकडेने मार्ग शोधतात. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचते. नागरिक घसरून पडून अपघात वाढले आहेत. लहाण मुले व महिला मार लागुन जखमी होत आहेत.
स्मशानाची वाट बिकट
याच रस्त्याला लागुन ग्लोरिया सिटीसमोर गावाची मोठी स्मशानभूमी असल्याने अंतयात्रा जाताना प्रेताची अवहेलना होते. खांदेकरी घसरून पडतात. प्रेत खाली पडून विटंबना होते.
कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल तरिही....
अनेकदा प्रेताची अशी विटंबना झाल्यामुळे महापालिकेतील अधिकारी के.एन. काटकर यांच्यावर या भागातील मयताच्या नातेवाईकांनी समाजसेवक गणेश लोखंडे यांच्या पुढाकाराने छावनी पोलिस ठाण्यात सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करूनही रस्त्यांची कामे रेंगाळली आहेत. भावसिंपुरा भागातील राजधानीनगर, कत्तलखाना, कचरा प्रकल्प , लालमाती याकडे डोंगरापर्य॔त वसाहती वाढल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली असून, अरुंद रस्ता आणि त्यात खड्डे यात वाहनांची होणारी गर्दी यामुळे या भागात नवीन समस्या निर्माण झाली आहे.
कत्तलखाना ते पडेगाव खड्डेच खड्डे
पडेगाव रस्त्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. या रस्त्याकडुन महापालिकेतील कत्तलखाना आणि कचरा प्रकल्प असल्याने कचरा आणि जनावरांच्या वाहनांची रात्रंदिवस वाहतूक सुरूच असते. आधीच अरूंद रस्ता असलेला हा रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावर कोठेही डांबर शिल्कक नसल्याने वाहनधारक खड्डे वाचविण्यासाठी मिळेल त्या मार्गाने वाहन नेतात. परिणामी हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे.
नगरसेविकाच्या प्रयत्नाला यश
अखेर टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मनिषा विनोद लोखंडे, समाजसेवक गणेश लोखंडे यांनी टेंडरनामाचे दाखले देत वारंवार महापालिका प्रशासकांपासून ते जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांपर्यत पाठपुरावा केल्याने या भागातील रस्त्यांचा समावेश महापालिकेने ३१७ कोटींच्या यादीत केला आहे.
इतक्या निधीतून होणार कामे
- कमल हाऊसिंग सोसायटी ते लालमातीकडे जाणार्या रस्त्यावरील नाल्यावर आरसीसी पुल
- अंदाजपत्रकीय रक्कम - ७१ लाख
- पडेगाव ते कत्तलखाना रस्ता दुरूस्ती
- अंदाजपत्रकीय रक्कम- ९ कोटी ८४ लाख
- साई विद्यापीठ गेट ते भीमनगर - भावसिंपुरा ते कत्तलखाना
- अंदाजपत्रकीय रक्कम- ६ कोटी ९६ लाख
- माऊली चौक ते सांची कमान
- अंदाजपत्रकीय रक्कम- १ कोटी ३४ लाख