नागपूर (Nagpur) : मध्यप्रदेशातील चौराई धरण बांधल्यानंतर शहरातील पाण्यात कपात झाली होती. भविष्यात शहर वाढणार असल्याने मागील फडणवीस सरकारने मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावातून तोतलाडोहपर्यंत बोगद्यातून पाणी आणण्याचा २ हजार ८०० कोटींचा प्रकल्प मंजूर केला होता. टेंडरपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु आता हा प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा असून राज्य सरकारच्या या कृतीची भविष्यात शहराला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता बळावली आहे.
शहराची सीमा वाढत असून लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी २५० ते ३०० दलघमी वाढणार आहे. याशिवाय सातत्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसातही घट होत असल्याने उन्हाळ्यात नागपूरकरांची 'जलकोंडी' वाढत आहे. सन २०१६-१७ मध्ये मध्यप्रदेशात चौराई बांधण्यात आले. तेव्हापासून शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जास्तच निर्माण झाली. भविष्यात पाण्याची कोंडी होऊ नये, या हेतूने मागील फडणवीस सरकारकडून तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलायशात वळविण्याचा प्रकल्प मंजूर करून घेतला. या प्रकल्पासाठी २ हजार ८६४ कोटी रुपयेही मंजूर करून घेतले. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्धार त्यांनी केला होता. परंतु त्यानंतर राज्यात सरकार बदलली. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. या प्रकल्पाची प्रक्रिया निविदेपर्यंत आली. मात्र राज्य सरकारने निधीसाठी हात आखडता घेतल्याने आता प्रकल्पच गुडाळण्यात आल्याचे दिसून येत आहे.
असा आहे प्रकल्प
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्याचे प्रस्तावित आहे. या बंधाऱ्याची लांबी १६० मीटर राहणार असून बंधाऱ्याची उंची ५.५ मीटर तर बोगद्याची लांबी ६२ किमी आहे. या बोगद्याचा व्यास ६.९ मीटर तर १२.२६ हेक्टर वनजमिनी यासाठी लागणार असून १० टीएमसी पाणी वळवण्याचेही प्रस्तावात नमुद आहे.
असा होणार होता खर्च
वर्ष - प्रस्तावित खर्च
२०१९-२० - ५८५ कोटी
२०२०-२१ - ५७५ कोटी
२०२१-२२ - ५७४ कोटी
२०२२-२३ - ५७४ कोटी
२०२३-२४ - ५५४ कोटी