मुंबई (Mumbai) : मेल-एक्सप्रेसच्या ट्रॅफिकमुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवेला नेहमी फटका बसत असल्याने रेल्वेने उपनगरात रेल्वे टर्मिनस बांधण्यास प्राधान्य दिले आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे बजेटमध्ये जोगेश्वरी टर्मिनसचा समावेश करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेचे दोन फलाट बांधण्याचे कामही पूर्ण होत आले आहे. जोगेश्वरी टर्मिनसच्या ६९ कोटींच्या वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाने नुकतीच मंजुरी दिल्याने दोन ते अडीच वर्षांत पश्चिम उपनगरात राहणार्या प्रवाशांना थेट जोगेश्वरीतून आपल्या गावी जाता येणार आहे.
मुंबई शहराची लाइफ लाइन असलेल्या लोकलचा प्रवास पिकअवरमध्ये जलद होण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना शहरात न आणता उपनगरातच त्यांचा प्रवास समाप्त करण्याबरोबरच काही नवीन गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी येथे लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे नवे टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी रेल्वे बजेटमध्ये दोन वर्षांपूर्वी 69 कोटी रुपयांची तरतूद केली होती. जोगेश्वरी टर्मिनसच्या 69 कोटींच्या वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाचे संचालक (प्रकल्प निरीक्षण ) पंकज कुमार यांनी मंजूरी देत रेल्वेच्या आर्थिक संचालकांकडे हा विषय पुढील प्रक्रियेसाठी पाठवून दिला आहे.
जोगेश्वरी येथे दोन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम पूर्ण झाले असून प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता 69 कोटींच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी मिळाल्याने तर इतर कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. यात रेल्वेचे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यासह अन्य तांत्रिक कामे केली जाणार आहेत. वांद्रे टर्मिनसच्या कोणत्या गाड्या इथे ट्रान्सफर करायच्या किंवा कोणत्या नवीन गाड्या सोडायच्या याचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल असे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी दिली आहे.