औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डे विरहित, गुळगुळीत असावेत यासाठी महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून ३१७ कोटी रूपये मंजुर केले आहेत. या योजनेतून शहरात ८९ किलोमीटरचे १०१ रस्ते चकाचक होणार आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांच्या बांधकामासाठी शंभर कोटींचे तीन टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गुरूवारी टेंडर भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर टेंडरमध्ये यशस्वी ठरणाऱ्या ठेकेदारांमार्फत एकाच वेळी शहरातील रस्त्यांचे काम सुरू करून त्यांचे रूपडे पालटवण्याचा मानस पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादकरांची खड्ड्यातून सूटका
पाण्डेय यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या रस्त्यांचे काम सुरू केल्याने ८९ किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त होऊन प्रवास लवकर सुखमय होईल अशा प्रतिक्रीया सर्व स्तरातून उमटत आहेत.
चाळीस वर्षानंतर तीनशे कोटीला मान्यता
१९८२ पासून अर्थात गेल्या ४० वर्षांपासून मराठवाड्यातील ऐतिहासिक राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या तसेच मराठवाड्याचे विभागीय स्थान असलेल्या खड्डेमय औरंगाबादेत वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रस्तावाला तब्बल तीनशे कोटी रूपयांना मान्यता दिली आहे. हा महापालिकेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा योग असल्याची चर्चा औरंगाबादेत होत आहे.
चाळीस वर्षांपासून ओरड
औरंगाबादेत महापालिका निवडणुक असो की लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांना मतदारसंघात फिरताना औरंगाबादकर रस्ते कोंडीत पकडत असत. त्यामुळे रस्त्यांचा विषय अगदी कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे उमेदवार पदयात्रेत केवळ विजयी झाल्यानंतर तूमच्या भागातील रस्त्यांची कामे आपल्या प्राधान्य यादीत असतील असे आश्वासन देत फिरत असत. मात्र उमेदवार विजयी झाल्यानंतर देखील प्रश्न कायम राहत असे.
औरंगाबादकरांचा टाहो
शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत औरंगाबादकरांचा संताप अनावर झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या प्रयत्नाने २०१४ यावर्षी २४ कोटीचा सरकारने महापालिकेला दिला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्या प्रयत्नाने २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यानंतर प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्याच प्रयत्नाने २०२० मध्ये १५२ कोटींच्या निधी मिळाला. त्यातून महापालिका, एमआयडीसी, एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात पाच, दुसऱ्या टप्प्यात तीस तर तिसऱ्या टप्प्यात २४ रस्त्यांची कामे केली जात आहेत. ५९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत, काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
आता औरंगाबादकरांना पावले पाण्डेय
महापालिकेने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पालिका फंडातून शंभर कोटींची रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले आहे. ही कामे डांबरीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. रस्तेदेखील गुळगुळीत झाले असून, पाण्डेय यांच्या प्रयत्नांना यश आल्याने स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील तब्बल ३१७ कोटीतून ८९ किमीचे १०१ रस्ते गुळगुळीत होणार असल्याने पाण्डेय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.