माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने घेतलेला आणखी एक निर्णयावर लाल फुली मारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना हिसका दाखविला. कोकणातील (Kokan) सहा प्रकल्पांमधील आधीचे टेंडर (Tender) रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच सत्ताधारी आणि विरोधक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
कोकण विभागातील शिरशिंगे, शाई, सुसरी, चणेरा, जामदा व काळ या सहा प्रकल्पाच्या टेंडरप्रक्रियेत कथित गैरप्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु होती. ती नंतर बंद करण्यात आली होती. ठाकरे सरकारने 30 ऑगस्ट 2016 रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये या प्रकल्पाच्या टेंडरांना स्थगिती देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने विविध याचिकांशी संबंधित 8 जून 2021 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी खालील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वयंस्पष्ट आदेश द्यावेत. प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या विविध टप्प्यांवर झालेल्या अनियमितता गृहित धरता येणार नाही. या प्रकल्पांबाबत चालू असलेल्या अथवा प्रस्तावित विभागीय चौकशीची कार्यवाही पूढे सुरू राहील. या निर्णयामुळे विभागीय चौकशीस बाधा पोहोचणार नाही.
या कार्यपद्धतीनुसार मंजुरीशिवाय अतिरिक्त निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. टेंडरची कामे प्राधान्याने पूर्ण करून पाणी साठ्याचा जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे उर्वरित कामांचे योग्य नियोजन करून अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राहील. तसेच केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाच्या वन (संवर्धन) अधिनियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.